मध्य रेल्वेमार्गावर आज 9 जून रोजी सकाळी मोठा अपघात झाला ज्यामध्ये पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कसाऱ्याच्या दिशेने जात असताना train मधून 10,ते 12 प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. या प्रवाशांना तातडीने रुग्णावाहिका आणून कळव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईजवळ दिवा-मुंब्रा रेल्वेस्थानकांच्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल रेल्वेगाडीतून पडून हा अपघात झाला आहे. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी डब्याच्या दरवाजाला लटकून प्रवास करत होते. एक लोकल ट्रेन या ट्रेनच्या बाजूने डाऊन दिशेने (सीएसएमटीहून) जात होती. त्यावेळी दरवाजात उभे असलेले प्रवासी बाजूने जाणाऱ्या लोकलला घासले गेले आणि खाली पडले, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा गेल्या काही दिवासांतील मोठा अपघात असून रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या दुर्घटनेची नेमकी व्याप्ती अद्याप कळू शकलेली नाही.
1 ) राहुल संतोष गुप्ता (28 ) रा. दिवा, 2) सरोज केतन (23 ) रा. उल्हासनगर, 3) मयूर शाह (44 ), 4) मच्छीद्र मधुकर गोतरणे, वय-31 (पोलीस कॉन्स्टेबल) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. तर 1) श्री. शिवा गवळी (पुरुष २३ वर्ष/यांची प्रकृती चिंताजनक असल्याने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथून ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.) 2) आदेश भोईर (पु/26 वर्ष, राहणार: आढगाव, कसारा, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.) 3) रिहान शेख (पु/२६ वर्ष, राहणार: भिवंडी, प्रवास: कल्याण ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत) 4) अनिल मोरे (पुरुष ४० वर्ष, यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.) 5) तुषार भगत (पु/२२ वर्ष, प्रवास: टिटवाळा ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.) 6) मनीष सरोज (पु/२६ वर्ष, पत्ता: दिवा साबेगाव, दिवा यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत) 7) मच्छिंद्र गोतारणे (पु/३९ वर्ष, राहणार: वाशिंद, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत) 8) स्नेहा धोंडे (स्त्री/२१वर्ष, राहणार: टिटवाळा, प्रवास: टिटवाळा ते ठाणे यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत) 9) प्रियंका भाटिया (स्त्री/२६ वर्ष, राहणार: शहाड, कल्याण (यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
एका ट्रॅकवरुन सीएसएमटीकडे लोकल जात होती. तर दुसऱ्या ट्रॅकवरुन कसाराच्या दिशेने लोकल जात होती. मुंब्रा आणि दिवा दरम्यान ही घटना घडली. अप आणि डाऊन दरम्यानच्या लोकल दरम्यान प्रवासी फूटओव्हरवरुन प्रवास करत होते. अशात त्यांची टक्कर झाली किंवा बॅग लागला आणि धक्का लागला त्यामुळे ही 8 लोकं खाली पडलीत. रेल्वेने उपाययोजना करण्यासंदर्भातच नव्या लाईनचे नियोजन केले आहेत. ठाणे ते सीएसएमटी सहाव्या लाईनपर्यंत अपग्रेड करणार आहोत. कार्यालयांना देखील विनंती केली होती की कार्यालयातील वेळेमध्ये केले तर चांगलं होईल. लोकांचा देखील सहयोग गरजेचा आहे, उपाययोजना आपण करत आहोत.. - स्वप्नील निला (मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी)
झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे, - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
मुंबईतील रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी आहे. या देशात माणसांची किंमत नाही. मुंबईतील रेल्वे कशी चालते हेच जगाला आश्चर्य आहे, केवळ रेल्वेपुरता हा विषय नसून शहरांचा विचका झाला आहे, मुंबईसह मेट्रो शहरात उंच इमारती उभ्या राहत आहेत, रस्ते नाहीत, लोकं वाढल्याने पार्किंगची व्यवस्था नाही. आग लागली तर बंब जायला वेळ नाही, बाहेरून येणारे लोंढे आहेत. कोण येतंय, कोण जातंय हे कळत नाही. मुंबईत मोनोरेल, मेट्रो आहे. कोण काय वापरताय हे कोणी बघत नाही. शहर म्हणून कोणी बघायला नाही. त्यामुळे, केंद्र सरकारने रेल्वेच्या स्थितीकडे लक्ष दिलं पाहिजे, - राज ठाकरे
दिवा, मुंब्रा, कळव्याची लोकसंख्या प्रचंड वाढली, त्या तुलनेत रेल्वे आणि रेल्वे फेऱ्या वाढल्या का वाढल्या नाहीत? एसी लोकलमुळे साध्या लोकल फेऱ्यांवर परिणाम, मरणारे हे सर्वाधिक नियमित लोकलमधले आहेत. दिवा लोकल टर्मिनेट का नाही? पहिली दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरु करा. पारसिक बोगद्यात तीन पोल अतिशय चिकटून, त्याला चिकटून हजार लोक मेले असतील पण तो पोल हटवला जात नाही. ऑटोमेटिक दरवाजे नियमित लोकल ट्रेन्सना शक्य नाही, लोक गुदमरतील, श्वास घेता येणार नाही- आमदार जितेंद्र आव्हाड
मुंबई रेल्वे प्रवासी संघाने यापूर्वी अनेक वेळा विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM), महाव्यवस्थापक (GM) आणि रेल्वे बोर्डकडे दिवा ते कळवा या जीवघेण्या मार्गाबाबत तक्रार केली आहे. या मार्गावर यापूर्वीही अनेक प्रवाशांनी प्राण गमावले आहेत. कल्याण ते ठाणे दरम्यानच्या दोन नवीन मार्गांचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना अधिक लोकल सेवा मिळेल अशी अपेक्षा होती. पंतप्रधान. नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन प्रसंगी अधिक लोकल सेवेचे आश्वासन दिले होते. मात्र, DRM यांनी हा निर्णय उलटवून या मार्गांवर मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य दिले.आजची दुर्घटना ही मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या विलंबामुळे लोकल थांबवण्याच्या धोरणामुळे घडली आहे. गर्दी आणि असुरक्षित प्रवास हे या धोरणाचे थेट परिणाम आहेत. आम्ही या प्रशासनाच्या तीव्र निषेध करतो. या अपघाताची जबाबदारी DRM ने स्वीकारावी. रेल्वे बोर्डाने मुंबई लोकल रेल्वे व्यवस्थापनात हस्तक्षेप करणे थांबवावे आणि स्वतंत्र मुंबई लोकल प्रशासन निर्माण करावे. जखमींना तातडीने वैद्यकीय आणि आर्थिक मदत द्यावी. कल्याण ते कुर्ला दरम्यान केवळ लोकलसाठी चार मार्ग राखून ठेवावेत. गर्दीच्या वेळेत मेल/एक्सप्रेस गाड्यांना या मार्गांवर चालवले जाऊ नये.. मुंबई लोकलसाठी स्वतंत्र आणि स्वायत्त संस्था निर्माण करावी. प्रवाशांच्या जीवाशी खेळ थांबवावा. अशा मागण्या मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष: मधु कोटियन, उपाध्यक्ष: सिद्धेश देसाई यांनी केली आहे.
0 टिप्पण्या