कोणे एके काळी मुंबईतून गोव्यापर्यंत म्हणजे पणजी बंदरापर्यंत बोटीनं प्रवास करता यायचा असं आजच्या पिढीला सांगितलं तर त्यांचा विश्वास नाही बसणार. पण होय, ही गोष्ट खरी आहे ! रत्नागिरीनंतर जैतापूर, मालवण, वेंगुर्ला अशी बंदरं घेत घेत ती बोट गोव्याला जायची. आता साठीकडे आलेल्या पिढीकडे त्या प्रवासाच्या रम्य आठवणी आहेत. अशाच आठवणींवर आधारित असलेला एक लेख ‘मालवण नगर परिषदे’ने आपल्या शतक महोत्सवी वर्षानिमित्तानं प्रकाशित केलेल्या स्मरणिकेत प्रसिद्ध केला होता. 23 डिसेंबर 2024, बरोबर 52 वर्ष झाली रोहिणी बोटीला अपघात झाल्याला.
कोकण बोटीचा प्रवास फारच मजेदार. ज्यांनी अनुभवला ते सारेच भाग्यवान. त्याकाळी हा फक्
त प्रवास नसे, कोकणातील हजारो तरुण कोकण बोटीकडे आपली भाग्यविधाती म्हणून पाहत असत. कधीतरी या बोटीत बसेन आणि मुंबईला जाऊन नशिब आजमावेन असं प्रत्येकास वाटायचे. आणि पोटापाण्यासाठी मुंबईला आलेल्या चाकरमान्याला त्याच्या प्रियजनांना भेटवणारी ती देवदूत वाटे. या जलप्रवास सेवेमुळे कोकणातील सर्व बंदरे गजबजलेली असायची. देश – विदेशातून व्यापार – उद्दीम होत होता. या बोटसेवा बंद झाल्या आणि सर्व बंदरात शुकशुकाट झाला. कारभार थंड झाला आणि अर्थव्यवस्था बिघडली. या बोटसेवेशी कोकणवासियांचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. आजही या प्रवासाची चर्चा सुरु झाली की आठवणी दाटून येतात आणि उर भरुन येतो.
आज मालवणसाठी अनेक प्रवासी सुविधा उपलब्ध असल्या तरी ७० वर्षांपूर्वी मालवणवासीयांची पसंती कोकण बोटीलाच असायची. मालवणचा चाकरमानी आणि मालवणचा धक्का यांचे एक शतकाचे अतूट भावनिक नाते आहे. कोकणवासियांचा प्रवास सुलभ व्हावा म्हणून मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकरशेठ यांच्या मागणीवरुन ब्रिटिशांनी १८४५ मध्ये बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना केली. ब्रिटिश गेल्यावर या सेवेला घरघर लागली. १९६४ साली म्हणजे १२५ वर्षाच्या अविरत कालखंडानंतर तोटा सहन न झाल्याने ही सेवा बंद झाली.
कोकणवासीयांची मोठीच पंचाईत झाल्याने महाराष्ट्राचे भाग्यविधाते मा. यशवंतराव चव्हाण यांनी गोव्यातील मराठी उद्योजक श्री. विश्वासराव चौगुलेंना गळ घालून १९६५ साली चौगुले स्टीमशिप मार्फत बोटसेवा पुन्हा सुरु केली. पण चौगुले स्टीमशिपला कोकण बोटीचे आर्थिक गणित काही जमेना. त्यातच १९७२ साली मालवण बंदरात रोहिणी बोट बुडाल्यामुळे कंपनीला जबरदस्त तोटा सहन करावा लागला. यानंतर मुंबई – मालवण बोटसेवा कायमची बंद झाली. कोणीच खासगी उद्योजक पुढे येत नसल्याने या बोटसेवेचे सरकारीकरण करण्यात आले. मुंबई – गोवा सागरी वाहतूक मोगल लाईन्सच्या अधिपत्याखाली आली. कोकणातील प्रमुख बंदरे वगळल्याने कोकणी माणसाला या सेवेत स्वारस्य नव्हते. १९९१ साली मोगल लाईनची बोटसेवाही गायब झाली. नंतर कळाले की श्रीलंकेत शांतीसैनिकांसाठी या बोटी नेल्या. तेव्हा पासून कोकण बोटसेवा बंद झाली ती झालीच.
कोकण बोटीतून मालवणच्या धक्क्यावर उतरलेला मी शेवटचा प्रवासी असल्याने कोकण बोट सेवा ५० वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा चालू होणार ही बातमी ऐकल्यावर माझे मन भूतकाळात गेले. आठवल्या त्या बालपणाच्या रम्य आठवणी. आमच्या शाळेची वार्षिक परीक्षा कालच संपली आहे. आणि कोकणात जाण्यासाठी आम्ही भाऊच्या धक्क्यावर आलो आहोत. सकाळी ९ ची वेळ. भाऊचा धक्का मालवणी / बाणकोटी मंडळींनी फुलून गेला आहे. ट्रंका व सामानासकट सर्व प्रवासी भाऊच्या धक्क्यावर धावपळ करीत आहेत. कोकण बोट सुटण्याच्यावेळी ३ भोंगे व्हायचे. दुसर्या भोंग्याला सर्व चाकरमानी बोटीत चढायचे व तिसर्या भोंग्याला शिडी उचलायचे.
सकाळी १० वाजता काळेकुट्ट धुराचे लोट आकाशात सोडत बोट मुंबई बंदर सोडायची. सर्व प्रवासी बोटीच्या डेकवरुन आपल्या नातेवाईकांना हात हलवून निरोप द्यायचे. बोट मार्गस्थ झाल्यावर चादर – वळकंडी घालून जागा पकडण्यावरुन बोटीत मालवण्यांत भांडणे व्हायची. त्यानंतरची फेरी म्हणजे ओळख परेड. यात प्रत्येक जण बोटीभर फिरुन ओळखीचे कोणी दिसते का याचा शोध घ्यायचे. बोटीवर तीन डेक होते. लोअर डेक (१२रु.), अप्पर डेक (१८ रु.) व केबिन (४० रु.). ओळख – पाळख काढून मालवण्यांचा गप्पांचा अड्डा जमायचा.
देवगडपासून वेंगुर्ल्यापर्यंतची मंडळी एकमेकांना भेटायची. स्नेह वृद्धिंगत व्हायचा. बोटीच्या चारही बाजूला समुद्र असल्याने गजाली आणि फकाणा जोरात रंगात यायचे.
दुपारचे जेवण वा संध्याकाळचा चहा, सर्वजण एकत्र बसून त्याची मजा लुटायचे. बोटीच्या डेकवरुन दिसणारा देखणा सूर्यास्त वा रात्रीचे मोहक चांदणे हे सारेच अवर्णनीय. ज्यांनी हे अनुभवले ते भाग्यवान. रात्री अंधार होताच अंथरूण घालून सर्वजण झोपी जायचे. पहाटे जाग यायची ती देवगडकरांच्या धावपळीने. पहाटे पाचला बोट विजयदुर्गला लागायची. सहाला देवगड बंदर व सात वाजता मालवण बंदर गाठायची. शेवटचा टप्पा म्हणजे वेंगुर्ल्याला पोहोचेपर्यंत आठ वाजायचे. प्रत्येक बंदरात सहप्रवाशांना भावपूर्ण निरोप दिला जायचा.
या कोकण बोटीच्या भूतकाळात जातो तेव्हा दुसर्या महायुध्दाच्या आधी म्हणजे १९४० च्या सुमारास संत तुकाराम, संत रामदास व अँथनी अशी बोटींची नावे चटकन ओठावर येतात. प्रवाशांची क्षमता अडीजशे होती व तिकिटही फक्त अडिज रुपये. पुढे बॉम्बे स्टीम नेव्हिगेशने रत्नागिरी, चंद्रावती, इरावती व चंद्रावती अशा ३ बोटी आपल्या ताफ्यात सामील करुन प्रवाशांना उत्तम सेवा देण्याची व्यवस्था केली. ग्राहकांना खुश करण्यासाठी मोफत जेवणाची व्यवस्था त्यावेळी सर्वप्रथम करण्यात आली. कोकणवासीयांची उत्तम सोय होण्यासाठी आचरा, मुसाकाजी, रनपार, जयगड, बोरया अशा लहान बंदरांना समाविष्ट करुन ग्राहक सेवेचे व्रत कायम राखले.
पुढे १९६४ साली चौगुले स्टीमशिपने रोहिणी, सरीता व कोकण सेवक अशा तीन बोटी सुरु केल्या. ब्रिटीशांनी १०० वर्षे अत्यंत शिस्तबध्द चालविलेली कोकण बोट सेवा अचानक तोट्यात का गेली याबाबत अनेक दावे करतात. कोणी म्हणतात, तिकिटाचे दर योग्य नव्हते तर कोणी म्हणतात अनेक फुकटे प्रवासी प्रवास करायचे म्हणून.
माझे मन पुन्हा जागे झाले ते सहाला बोटीने दिलेल्या भोंग्याने. बोटीच्या डेकवर गार वारा सुटला आहे. दूरवर दिसणारा काळा ठिपका म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला याची खात्री करुन मायेची माणसे पुन्हा भेटणार म्हणून मन सुखावते. हळूहळू आचरा, सर्जेकोट, कोळंब अशी गावे दिसू लागतात. सर्वांनाच ओढ असते ती धक्क्यावर पाऊल ठेवायची. जसजशी मेढा, दांडी दिसू लागे तसतशी चुळबूळ वाढत जायची. शेवटी मोठ्ठा भोंगा देत बोट सर्वांना शांत करायची. नांगर टाकून बोट स्थिरावल्यावर दोन्ही बाजूने पडाव बोटीला बिलगायचे. म्हाद्या, रामा, गण्या असे खलाशी सराईतपणे कोकण बोटीवर चढून मुंबईकरांचे सामान पडावावर उतरवायचे. पडाव मालवणच्या धक्क्याकडे जाताना बोट नांगर उचलून वेंगुर्ल्याकडे प्रयाण करायची. हात हलवून बोटीतील सहप्रवाशांना अलविदा करायचो. मालवणच्या धक्क्याकडे जाण्यासाठी पडावांची शर्यत लागायची. जो तो धक्क्यावर आलेल्या आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रथम उतरण्यासाठी धडपडायचा. कोणी आपल्या नातेवाईकास कडकडून मिठी मारतोय, कोणी नातू आपल्या आजीच्या कुशीत बिलगला आहे तर कोणी कारभारीण गिरणगावातल्या आपल्या कारभाऱ्याला बर्याच महिन्याने भेटून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन देत आहे. असे अनेक प्रसंग मालवणच्या धक्क्यावर बघायला मिळायचे.
माहिती साभार
श्री. आनंद हुले
0 टिप्पण्या