मागील महिन्यात पडलेल्या पावसामुळे भूयारी मेट्रो स्टेशनला गळती लागली आणि संपूर्ण स्टेशन जलमय झाल्याच्या घटनेनंतर पुन्हा एकदा सकाळपासून पडलेल्या पावसामुळे मुंबईतील गिरगाव परिसरात मेट्रो स्टेशनजवळ बेस्ट बस खड्डयात पडली. ही बेस्ट बस सुमारे पाच फूट खोल खड्ड्यात गेली आणि त्यामुळे रस्ताही मोठ्या प्रमाणात खचल्याचे पाहायला मिळाले. सोमवार दिनांक 16 जुन रोजी सकाळी नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गिरगाव चौपाटीजवळील मेट्रोच्या कामासाठी रस्त्याखाली खोदकाम सुरू असताना बेस्ट बस त्या मार्गावरून जात होती. मेट्रोच्या कामामुळे रस्त्याचा काही भाग खचला होता. याच खड्ड्यात बसचा मागील भाग अडकला आणि हा अपघात झाला. दरम्यान, सकाळी रस्ता खचून जिथे अपघात झाला, त्याठिकाणी गेल्या वर्षी मेट्रोच्या कामासाठी असलेली अवजड क्रेन उभी होती. ती क्रेन खाली रस्त्यावर पडली होती. त्यावेळी हा आता अपघात झालेला मार्ग तीन दिवस बंद होता. कुचकामी अधिकाऱ्यांमुळे आज घडलेली बस अपघाताची परिस्थिती उद्भवल्याची संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
सिमेंटचे रस्ते जे बांधले गेले त्या रस्त्याला बेस द्यायचं असतो. पण टेक्निकली गोष्टी घाईघाईत झाल्यात. रस्त्यांचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. कंत्राटदाराला घाईघाईत काम करायला लावले आणि निकृष्ट दर्जाचं काम झालं. मे महिन्यात पाऊस पडला आणि तरीही कंत्राटदाराला पटापट काम करा असे सांगण्यात आलेले आहे, असे मनसे नेते यशंवत किल्लेदार यांनी सांगितले.

0 टिप्पण्या