खरं तर हे शिर्षक चुकीचे आहे. मला कवितेने काय दिले? असं शिर्षक देण्याऐवजी 'मला कवितेने काय नाही दिले?' असं शिर्षक द्यायला हवं होतं. कारण कवितेने मला खुप काही दिलं. राजकीय क्षेत्रातील रामदास आठवले, कवाडे सर, नामदेव ढसाळ, भाई संगारे, राजाभाऊ ढाले, ज.वि.पवार, प्रा.अरुण कांबळे, मनोजभाई संसारे, डाॅ.सुरेश माने यासारख्या दिग्गज नेत्यांची जवळून ओळख झाली. यातील बर्याच जणांबरोबर मैत्रीचे घनिष्ठ संबंध झाले.
साहित्य
क्षेत्रातील प्र.श्री.नेरुरकर, नारायण सुर्वे, दया पवार, केशव मेश्राम, प्रल्हाद चेंदवणकर, भिमसेन देठे, बबन कांबळे, दया हिवराळे, भगवान निळे, सायमन मार्टिन, संभाजी भगत, अशोक बागवे, अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, प्रा.आशालता कांबळे, आकाश सोनावणे, बबन सरवदे, प्रशांत मोरे, बाळ हरि झेंडे, रमेश भवार, रेश्मा राणे, विजय मोहिते, भिमराव गवळी, महादू पवार, कविता मोरवणकर, जित्या जाली, सागर काकडे, नितीन चंदनशिवे, सुमित गुणवंत, रवी कांबळे, रमणी सोनावणे यासारखे अनेक प्रतिभावंत मित्र, मैत्रीणी लाभल्या. खरं तर ही यादी खुपच लांबलचक आहे. पण सगळ्यांचीच नावे लिहणे शक्य नाही. मी जर कविता लिहण्याच्या फंदात पडलो नसतो तर ही सोन्यासारखी प्रतिभावंत माणसे माझ्या आयुष्यात कधीच आली नसती.
खरं तर मला कवितेने काय दिले, हे जर सविस्तर सांगायला लागलो तर त्यावर एक मोठ्ठी कादंबरी होऊ शकते. त्यामुळेच मी इथे फक्त एकच घटना सांगतो. मी बेरोजगार असताना माझ्या कवितेमुळे हैराण झालेले माझे वडील माझ्या आईला नेहमी ऐकवायचे की, त्या विवेकला सांग त्या कवितेचा नाद सोड. ही भिकेची लक्षणे आहेत. त्याने पोट भरणार नाही. त्यापेक्षा नोकरी शोध म्हणाव! बाबा ऑफिसला गेले की हे सर्व आई मला सांगायची. म्हणायची, अरे यक त्या कविता, बिवीता सोड अन् कुठेतरी कामधंदा बघ.
मग मीही हे मनावर घेतले. मनावर घेतले म्हणजे कविता चालूच ठेवल्या. आणि तसेही कविसंमेलने काही रोज नसायची. मग मी सकाळीच उठून झोळीत माझी प्रमाणपत्रांची फाईल टाकायचो. चाळीतल्या लायब्ररीत जाऊन सर्व वर्तमानपत्र चाळायचो. मला योग्य वाटणार्या व्हॅकन्सीचे पत्ते लिहून घ्यायचो. खिशात आईने वाटखर्चाला दिलेले पैसे आणि कागदात लपेटून दिलेली भाजी भाकरी सोबत असायची. तीन, चार ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन मी थेट संध्याकाळी चाळीत पोहोचायचो. हे पाहून माळ्यावरची अरुण त्रिभुवनची आई सिताबाय, म्हणायची, यक कामाला लागला वाटतं. तसं माझं नाव विवेक. पण चाळीतल्या सगळ्या मायमावल्या अगदी माझी आईसुध्दा मला यकच म्हणायच्या.
असा हा माझा दररोजचा दिनक्रम सुरु झाला. एके दिवशी दोन जाहिराती मी लिहून घेतल्या. त्यातली पहिली दादरच्या पिंगेज क्लासची होती आणि दुसरी विलेपार्ल्यातील एका शाळेची होती. मी सातरस्त्यावरुन चालत, चालत दादरला आलो. तसे आईने प्रवासासाठी पैसे दिले होते. पण ते पैसे मी मावा खाण्यासाठी ठेवले होते. दुपारी साडेअकरापर्यंत दादरच्या पिंगेज क्लासेसच्या ऑफिसात पोहोचलो. तिथे मुलाखत देईपर्यंत एक वाजला. मग मी दादरच्या प्लाझा गार्डनमध्ये बसून आईने दिलेली भाजी भाकर खाल्ली. झोळीतून पाण्याची बाटली काढून पोटभर पाणी प्यालो. थोडा ताजातवाना झाल्यावर मी पार्ल्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली.
संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत मी विलेपार्ल्यातील त्या शाळेसमोर उभा होतो. शाळेचं नाव होतं, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय. तिथे पार्क असलेल्या कारच्या बोनेटवर मी मराठीत अर्ज खरडला. शाळेत प्रवेश केला. तिथल्या शिपायाला सांगीतले की, मी इंटरव्ह्युला आलोय. शिपाई एका कॅबिनमध्ये गेला. थोड्याच वेळात त्याने मला आत जाण्यास सांगीतले. मी आत गेलो. आतमध्ये एक उंच, धिप्पाड अशी स्त्री बसली होती. त्यांच्या टेबलावर श्रीमती एस्.एन्.पाटील, मुख्याध्यापिका असे लिहलेला ठोकळा होता. मी त्यांना नमस्कार केला व माझा अर्ज त्यांच्यासमोर ठेवला. माझा अर्ज पाहून पाटील बाई त्या अर्जाकडे पाहतच राहिल्या. इथे मला हे आवर्जून सांगावेसे वाटते की, माझं मराठी हस्ताक्षर अत्यंत सुंदर आहे. अगदी रामदास आठवलेंपेक्षाही. अर्ज बघितल्यावर त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यावेळेस मी अगदी पाप्याचं पितर होतो. म्हणजे अगदी डिट्टो नामदेव ढसाळच जणू. पाटील बाईंनी अगदी संशय घेतल्यासारखं मला विचारलं, हा अर्ज तुम्ही लिहलाय? मी हो म्हणताच त्याने बाहेर उभा असणाऱ्या तानाजी नावाच्या शिपायाला हाक मारली व त्याला एक फुलस्केप आणायला सांगीतला. तानाजीने फुलस्केप आणल्यावर पाटील बाईंनी मला पुन्हा अर्ज लिहायला सांगीतला. मी अगोदरचा अर्ज भर उन्हात उभा राहून कारच्या टपावर लिहला होता. आणि आता तर मी खुर्चीवर बसलो होतो, डोक्यावर पंखा होता आणि समोर टेबल होता. त्यामुळे मी अगदीच आरामशीर अवस्थेत होतो. मी माझ्या खिशातला पेन काढला आणि अगदी सहजपणे झरझर अर्ज लिहून काढला. तो अर्ज पाहून पाटील बाई खुपच खुष झाल्या. पण तरीही पाटील बाईंनी एक अट घातली. त्या म्हणाल्या, तुम्हाला कोणत्या तरी एका अराजकीय अशा सन्माननीय व्यक्तीची शिफारस आणावी लागेल तरच आम्ही तुम्हाला नोकरीवर ठेऊ. तुम्हाला ओळखणारा असा कोणी व्यक्ती आहे का? मी चटकन प्र.श्री.नेरुरकरांचे नाव ठोकून दिले. मी हे नांव घेताच पाटील बाई आश्चर्यचकित झाल्या. मला म्हणाल्या, तुम्ही नेरुरकर सरांना ओळखता? मी म्हटलं, हो! पाटील बाई म्हणाल्या, चला तर मग ठरलं तर. तुमची नोकरी पक्की झाली. उद्या येताना नेरुरकर सरांची शिफारस घेऊन या.
मी शाळेतून बाहेर पडलो. पण माझ्यासमोर प्रश्न पडला की, आता नेरुरकर सरांची शिफारस कशी आणायची? कारण माझी सरांची तशी ओळख नव्हती. मी फक्त एकदाच त्यांच्यासमोर कविता म्हटली होती. म्हणूनच मी ते नाव ठोकून दिले होते. म्हणजे गेल्या रविवारी राजा गायंगीने दादरच्या गार्डनमध्ये एक कविसंमेलन आयोजित केले होते. अध्यक्ष आम्ही वडाच्या झाडाला केले होते. या कार्यक्रमात प्र.श्री.नेरुरकर प्रमुख पाहुणे होते. त्यांच्यासमोर मी गाडगे बाबांची कविता म्हटली होती आणि ही कविता सरांना खुप आवडली आणि त्यांनी त्यावेळेस माझे भरभरुन कौतुकही केले होते. पण केवळ एवढ्या बळावर मी नेरुरकर सरांना ओळखतो, असं म्हणणं खुपच धाडसाचं होतं. पण आता बोललोच आहे तर सरांना जाऊन भेटू. असा विचार करुन मी चालतच पार्ल्यावरुन बांद्र्याच्या कलानगरमधील सरांच्या साहित्य सहवासमध्ये पोहोचलो. मला सरांचे घर माहित होते. कारण एकदा मी झेंडे साहेबांबरोबर त्यांच्या घरी आलो होतो. बेल वाजवली. दरवाजात सरांच्या पत्नी उभ्या होत्या. मी त्यांना सरांविषयी विचारले. त्या म्हणाल्या, सर डोंबिवलीला एका कार्यक्रमाला गेलेत. त्यावेळेस मोबाईल नव्हता. मग मी सरांची वाट पाहत साहित्य सहवासच्या गेटवर रात्री नऊ वाजेपर्यंत बसून होतो. शेवटी मच्छर जास्तच चावायला लागले म्हणून नाईलाजास्तव घरी जायला निघालो.
दुसर्या दिवशी सकाळी शाळेत जायला धीरच होत नव्हता. कसातरी रडत खडत ट्रेन पकडली. विलेपार्ल्याला पोहोचलो. आणि अगदी मान खाली घालून चोरासारखा शाळेत प्रवेश केला. माझ्या हातात शिफारस नाही म्हटल्यावर पाटील बाई मला कामावर ठेवणार नव्हत्याच. शाळेत पोहोचल्याबरोबर शिपायाने मला पाटील बाईंना लगेच भेटावयास सांगीतले. मी अगदीच धास्तावल्यागत पाटील बाईंच्या कॅबिनमध्ये पाय ठेवला. मला पाहताच पाटील बाई म्हणाल्या, अरे मोरे या, या बसा. मी अगदीच संकोचाने खुर्चीवर टेकलो. पाटील बाई म्हणाल्या, मोरे तुम्ही कविता करता हे मला सांगीतलं का नाही?
मला काय बोलावे हेच कळत नव्हतं. पाटील बाई म्हणाल्या, मला तुमची गाडगे बाबांची कविता ऐकवा. बाकी काही नाही, पण कविता म्हटली की मी भलताच उत्साहात येतो. पाटील बाईंनी म्हण म्हटल्याबरोबर मी धाडधाड गाडगेबाबांची कविता म्हणून मोकळा झालो. कविता संपल्यावर पाटील बाईंनी माझा हात हातात घेऊन माझे अभिनंदन केले व म्हणाल्या, आजपासून तुमची नोकरी पक्की. चला कामाला लागा. आणि मी कामाला सुरू झालो.
नंतर कळलं की, नेरुरकर सर हे पाटील बाईंचेही सर होते. कालच्या रात्री कधी तरी पाटील बाईंनी नेरुरकर सरांना फोन करुन माझ्याविषयी चौकशी केली. तेंव्हा सर पाटील बाईंना म्हणाले, सरोज तू गाडगे बाबांना पाह्यलस काय? पाटील बाई म्हणाल्या नाही. मग तू विवेकची गाडगे बाबांची कविता ऐक. तुझ्यासमोर तो मुर्तिमंत गाडगे बाबा उभा करतो की नाही बघ! हे नंतर मला पाटील बाईंनीच सांगीतले. नंतर कळलं की, पाटील बाई ह्या शरद पवारांच्या सख्ख्या मोठ्या बहीण आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयीचा आदर आणखीनच वाढला.
सगळ्यात कमाल म्हणजे आयुष्यात फक्त एकदाच ज्यांच्यापुढे कविता म्हटली त्या प्र.श्री. नेरुरकर सरांनी मला लक्षात ठेवणं. दुसरी कमाल म्हणजे हल्ली लाच घेतल्याशिवाय कोणीही नोकरी देत नाही, अशा काळात माझी फक्त एक कविता ऐकून पाटील बाईंचं मला नोकरी देणं. नेरुरकर सर काय किंवा पाटील बाई काय, ही जगावेगळी माणसे होय. पण आमचे वडील म्हणायचे, कविता करणं हे भिकारीपणाचं लक्षण आहे. त्याच कवितेमुळे मला नोकरी लागली, माझं लग्न झालं, मुलं झाली, संसार झाला. त्या कवितेने मला काय दिले? असं म्हणण्याचा कृतघ्नपणा मी करुच शकत नाही. या कवितेने मला आभाळाच्या उंचीची माणसे दिली, मला आयुष्यभराची रोजीरोटी दिली आणि माझ्या कवितेवर उदंड प्रेम करणारे तुमच्यासारखे दिलदार रसिक दिले. कवितेने मला खुप काही भरभरुन दिले. माझा उठाव कवितासंग्रह प्रकाशित झाला तेंव्हा नवशक्तीच्या पत्रकाराने माझी मुलाखत घेतली होती. त्यावेळेस त्याने मला विचारले होते की, तुम्हाला हा कवितेचा छंद केव्हापासून आहे? त्यावर मी त्याला म्हटलं की श्वास घेण्याचा छंद तुम्हाला केव्हापासून आहे. तो पत्रकार म्हणाला, सर श्वास घेणं हा छंद नाही. ती तर जगण्याची गरज आहे. जर मी श्वासच घेतला नाही तर मरुन जाईल. मी त्याला म्हटलं, मग कवितेचंही तसच आहे. कविता हा माझा छंद नाही तर ती माझ्या जगण्याची गरज आहे. मी जर कविता केली नाही तर मी गुदमरून जाऊ शकतो, माझा ब्रेन हॅमरेज होऊ शकतो. तो होऊ नये म्हणून मला कविता लिहावीच लागते.
अशी ही माझ्या जगण्याचा आधार असलेली ही कविता. जीने मला जे द्यायचं ते भरभरुन दिलय. मग आणखीन काय हवं?
0 टिप्पण्या