Top Post Ad

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ठाण्यात ५ ते ८ जून, उत्सव वसुंधरेचा

ठाणे महानगरपालिकेतर्फे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने गुरुवार, ०५ जून ते रविवार, ०८ जून या काळात नौपाडा येथील गावदेवी मैदानात 'उत्सव वसुंधरेचा, संकल्प हरित ठाण्याचा' या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिक, विद्यार्थी, गृहसंकुलांचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था यांच्यासाठी या उत्सवात प्रदर्शन, कार्यशाळा, स्पर्धा आणि परिसंवाद यांनी अनोखी पर्वणी मिळणार आहे. पर्यावरणाविषयी जागृती करणाऱ्या या उपक्रमात ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.


         पर्यावरणाविषयी जागृती करण्याबरोबरच, घरगुती कचऱ्याचे व्यवस्थापन, पर्यावरणपूरक जीवनशैली यांच्याविषयी उपलब्ध असलेले पर्याय नागरिकांना माहिती व्हावेत, यासाठी या उत्सवाचे आयोजन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात येत आहे. त्याचा लाभ सगळ्यांनाच होईल, असा विश्वास आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला आहे.

         *शून्य कचरा आणि पर्यावरण प्रदर्शन २०२५*       'शून्य कचरा आणि पर्यावरण प्रदर्शन २०२५' अशी या उत्सवाची संकल्पना आहे. त्यातील, पर्यावरण संवर्धन भव्य प्रदर्शनात पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिकला पर्यायी वस्तू, सौर ऊर्जा, मलनि:सारण प्रकल्प, हवा सर्वेक्षण उपकरणे यांच्याशी निगडित दालने असतील. गुरूवार, ०५ जून रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. त्याच समारंभात, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या जिंगलचेही प्रथमच प्रसारण करण्यात येईल. तसेच, वर्षभरातील विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या गृहसंकुलांना पारितोषिकांचे वितरणही करण्यात येईल. 

         *कार्यशाळा आणि परिसंवाद*       शुक्रवार, ०६ जून रोजी ऋषिकेश पानकर यांच्या मार्गदर्शनात 'कचऱ्यातून कला' आणि आदित्य हिंदलकर यांच्या मार्गदर्शनात 'शाडू मातीपासून मूर्ती घडविणे' या दोन कार्यशाळा होतील. तसेच, 'पर्यावरणपूरक जीवनशैली' ही परिसंवाद होणार असून त्यात, लता मेनन (शाडू मातीचा पूनर्वापर), रोहित जोशी (पर्यावरणपूरक गणेशोत्सव), दिलीप काकवीपुरे (जैवविविधता आणि आपण), अपर्णा कुलकर्णी (पर्यावरण शाश्वततेचे भारतीय प्रारुप), प्राचिन्मय (शाश्वत पर्यावरण आणि शाश्वत सेवार) हे तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.

        शनिवार, ०७ जून रोजी 'कबाड बॅण्ड' ही श्रीपाद भालेराव यांच्या मार्गदर्शनात, पौर्णिमा शिरगावकर यांच्या मार्गदर्शनात 'कुंडीत रोपे लावणे', तसेच, 'कागदी पिशव्या बनवणे' ही प्रिया कणसे यांच्या मार्गदर्शनात कार्यशाळा होईल. त्याचबरोबर, 'घरगुती कचरा व्यवस्थापन' या परिसंवादात सुरभी ठोसर (आपल्या कचऱ्याचे आपण व्यवस्थापक), सुनिलीमा (पर्यावरणपूरक घरगुती स्वच्छता संसाधने), लता घनश्यामानी (सॅनिटरी वेस्ट व्यवस्थापन) हे तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. त्याच दिवशी, 'होम मिनिस्टर - खेळ पैठणीचा' हा मनोरंजनपर कार्यक्रमही होईल.

       रविवार, ०८ जून रोजी या उत्सवाची सांगता होईल. त्या दिवशी, 'शाश्वत पर्यावरण' या विषयावर परिसंवाद होणार असून त्यात, संदीप अध्यापक (शाश्वत इमारत व्यवस्थापन), प्रदीप घैसास (निसर्गावर आधारित पर्याय), शरद पुस्तके (ऊर्जा व्यवस्थापन) हे तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. तसेच, सुरेश पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली 'नैसर्गिक रंग प्रशिक्षण' कार्यशाळा होईल. समारोप, सर्व स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभाने होणार आहे.

      *विनामूल्य प्रवेश*     'शून्य कचरा आणि पर्यावरण प्रदर्शन २०२५' हे प्रदर्शन ०५ ते ०८ जून या काळात स. १० ते रा. १० पर्यंत सगळ्यांसाठी विनामूल्य खुले आहे. तसेच, या उत्सवातील सर्व कार्यशाळा, परिसंवादही सगळ्यांसाठी विनामूल्य खुले आहेत. त्याबाबत अधिक माहिती प्रदर्शनस्थळी मिळेल. कार्यशाळा आणि परिसंवाद हे उपक्रम दुपारी तीननंतर सुरू होतील, अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली.

.................................................................................

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com