मुंबई महानगरपालिका एक श्रीमंत महापालिका असूनही मुंबईकरांना चांगल्या सोयीसुविधा मिळत नाहीत, महापालिकेच्या विविध विभागात भ्रष्टाचार बोकाळला आहे. नालेसफाईच्या नावाखाली भ्रष्टाचार होत आहे, रस्ते क्रांक्रीकरणात भ्रष्टाचार, घनकचरा व्यवस्थापनातही भ्रष्टाचार होत असून या सर्व भ्रष्टचारांची सखोल चौकशी करा व मुंबईकरांना चांगल्या सोयीसुविधा द्या, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे. मुंबई काँग्रेस शिष्टमंडळाने आज महापालिका आयुक्त यांची भेट घेतली. यावेळी आमदार अस्लम शेख, आमदार अमीन पटेल, आमदार ज्योती गायकवाड, यांच्यासह काँग्रेसचे माजी नगरसेवक उपस्थित होते.
मुंबईतील मालमत्ता कराचा प्रश्न, शिक्षण, आरोग्य, मुस्लिम कब्रस्तान, घनकचऱ्याचा नियोजन यासह विविध मुद्द्यावर चर्चा केली. घनकचऱ्याचे नियोजन दिसत नाही, अनेक भागात कचरा तसाच पडून असतो, त्यासंदर्भात अनेक तक्रारी येत आहेत. मुंबईकरांना कोणत्याच सुविधा व्यवस्थित मिळत नाहीत. MTNL, BSNL, BEST या संस्थांमध्ये तोटा दाखवायचा व नंतर या संस्था एखाद्या खाजगी उद्योगपतीला द्यायचा असे षडयंत्र सुरु आहे. बेस्टचे खच्चीकरण चालू आहे आणि स्मार्ट मीटरच्या नावाखाली बेस्टचा हा विभाग अदानीला देण्याचे घाटत आहे. परिवहन विभागही तोट्यात दाखवून तिकीट दर वाढवले पण त्याचा परिणाम प्रवासी संख्या घटण्यात झाला आहे. मुंबईतील सर्वसामान्य लोकांची बेस्ट ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच मोडीत काढली जात आहे. बेस्टला सक्षम करण्याची गरज असून त्यासाठी राज्य सरकार व बीएमने एक हजार कोटी रुपये दिले पाहिजेत. देवनारच्या कत्तल खान्याच्या मुद्द्यावरही यावेळी चर्चा करण्यात आली. आज उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर राज्य सरकारशी चर्चा करण्याचे आश्वासन पालिका आयुक्त गगराणी यांनी दिले आहे, अशी माहिती खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली.
0 टिप्पण्या