सखल भागामध्ये साचणा-या पाण्याचा निचरा लवकर व्हावा, यासाठी महानगरपालिकेतर्फे उदंचन संच बसविण्यात येतात. मात्र, विविध कारणांमुळे हे उदंचन पंप कार्यान्वित न झाल्यास सखल भागामध्ये पाणी साचून राहते. त्यामुळे नागरिांना असुविधेचा सामना करावा लागतो. या समस्येवर मात करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने या वर्षी पहिल्यांदाच वाहनांवर आरूढ १० फिरते उदंचन संच ( Vehicle Mounted Mobile Pumps) तयार ठेवले आहेत. या वाहनात २ पंप बसवण्यात आले असून, प्रत्येक पंपाची क्षमता २५० घनमीटर प्रति तास इतकी आहे.
पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे दरवर्षी विविध उपाययोजना राबविण्यात येतात. त्यात सखल भागांमध्ये ५१४ ठिकाणी पाणी उपसा करणारे उदंचन संच तैनात केल्याचा समावेश आहे. हे उदंचन पंप पावसाळ्यात बंद पडता कामा नये. उदंचन पंपांची यंत्रणा व पर्यायी यंत्रणा पूर्ण क्षमतेने (Full proof) कार्यान्वित राहिली पाहिजे, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. त्यानुसार, पर्जन्य जलवाहिन्या विभागाने उदंचन पंप बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून वाहनावर आरूढ १० फिरते उदंचन संच (Vehicle Mounted Mobile Pump ) उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. सन २०२५, २०२६, २०२७ आणि २०२८ या चार वर्षांसाठी भाडेतत्वावर वाहनावर आरूढ फिरते उदंचन संच घेतले जाणार आहेत.
प्रत्येक परिमंडळ उपायुक्त कार्यालयासाठी एक, (एकूण ७) आणि पर्जन्य जलवाहिनी विभागाचे उपप्रमुख अभियंता (परिचालन व परिरक्षण), उपप्रमुख अभियंता (पूर्व उपनगरे), उपप्रमुख अभियंता (पश्चिम उपनगरे) यांच्या कार्यालयासाठी प्रत्येकी एक (एकूण ३) अशी त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रत्येक वाहनावर २ पंप बसविण्यात येणार असून, प्रत्येक पंपाची क्षमता २५० घनमीटर प्रति तास इतकी आहे.या उपाययोजनेंतर्गत वाहन आरूढ फिरत्या उदंचन संचांची तात्काळ उपलब्धता सुनिश्चित होऊन उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीवर वेळीच उपाय करणे शक्य होणार आहे. तातडीच्या प्रसंगी या पर्यायी व्यवस्थेचा प्रतिसाद कालावधी (Response Time) कमी असला पाहिजे. जेणेकरून फिरते उदंचन संच तातडीने घटनास्थळी पोहचवता आले पाहिजेत. या वाहनांवर तीन सत्रांमध्ये म्हणजे २४ तास मनुष्यबळ उपलब्ध हवे, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
गेल्या काही वर्षात वातावरणीय बदलांमुळे पर्जन्यमानावर परिणाम झाला आहे. हे आता ठळकपणे दिसू लागले आहेत. गेल्या काही वर्षात मुंबईतील काही ठराविक भागात कमी कालावधीत २५० ते ३०० मिलीमीटर पाऊस कोसळल्याची नोंद आहे. यंदा तर मे महिन्यातच पावासाचे आगमन होत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईची भौगोलिक रचना विचारात घेऊन महानगरपालिका दरवर्षी पूर व्यवस्थापन उपाययोजना करते. त्यात कमीत कमी वेळेत पावसाळी पाण्याचा निचरा व्हावा आणि मुंबईकर नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेतली जाते.
0 टिप्पण्या