Top Post Ad

विक्रोळी उड्डाणपूल वाहतुकीस खुला*

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱया विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण झाले आहे. त्यामुळे, पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता,  नागरिकांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने कोणत्‍याही औपचारिक समारंभाची वाट न पाहता विक्रोळी पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे.  शनिवार, दिनांक १४ जून २०२५ सायंकाळी ४ वाजेपासून विक्रोळी पूल वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.


महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्‍या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. अभिजीत बांगर यांच्‍या नेतृत्‍वाखाली विक्रोळी उड्डाणपुलाची उभारणी विहित कालमर्यादेत म्‍हणजेच दिनांक ३१ मे २०२५ रोजी पूर्ण करण्‍यात आली आहे. पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील रेल्वे मार्गावरून जाणाऱया उड्डाणपुलामुळे पूर्व - पश्चिम बाजू जोडली जाणार आहे. या पुलामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि विक्रोळी पूर्व बाजूस पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले जाणार आहेत. परिणामी, प्रवास वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होणार आहे.

महानगरपालिकेच्या पूल विभागाच्या समन्वयाने विक्रोळी पुलाची उभारणी, स्थापत्य कामे व अनुषंगिक कामे देखील पूर्ण झाली आहेत. विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर उभारण्यात आलेल्या पुलाची एकूण रुंदी १२ मीटर तर लांबी ६१५ मीटर इतकी आहे. त्यापैकी ५६५ मीटरची उभारणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली आहे. तसेच उर्वरित ५० मीटर लांबीपर्यंतची उभारणी मध्ये रेल्वेकडून करण्यात आली आहे. रेल्वे विभागाकडून एकूण ७ तुळया स्थापित करण्यात आल्या असून त्यांचे एकूण वजन ६५५ टन आहे. या पुलावर महानगरपालिकेने टाकलेल्या तुळया सुमारे २१४२ टन इतक्या वजनाच्या आहेत. तसेच या तुळयांची लांबी २५ ते ३० मीटर इतकी आहे. पुलाच्या तीन टप्प्यांत एकूण १८ तुळया टाकण्यात आल्या आहेत.

या पुलाच्या एकूण १९ स्तंभांपैकी पूर्वकडील बाजूस १२ तर पश्चिमेकडील बाजूस ७ स्तंभ उभारले आहेत.  पुलाच्या दोन्ही बाजूचे पोहोच रस्ते (Approach Roads), मार्गिकांवरील कॉंक्रिट, मास्टिक, ध्वनी रोधक, अपघातरोधक अडथळा (Anti Crash Barriers),  रंगकाम आणि मार्ग रेषा आखणी आदी सर्व कामे पूर्ण होऊन पूल वाहतुकीसाठी उपलब्‍ध झाला आहे.  महानगरपालिकेच्‍या रस्ते आणि वाहतूक विभागाने पश्चिमेकडील बाजूवर वाहतूक थांबा क्षेत्र (Bay) तयार केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com