मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि'मेलो मार्गाला जोडणा-या कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम नियोजित कालावधीत म्हणजेच दिनांक १० जून २०२५ रोजी पूर्ण झाले आहे. आता वाहतुकीच्या अनुषंगाने मार्ग रेषा आखणी (Lane Marking), पथदिवे (Street light), रंगरंगोटी (Painting), दिशादर्शक फलक (Signboard) उभारणी कामे प्रगतिपथावर असून ती येत्या चार दिवसात पूर्ण होत आहेत. सद्यस्थितीत कर्नाक रेल्वे पूल वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याकामी सज्ज आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी १० जून रोजी कर्नाक पुलाची उभारणी, स्थापत्य कामे व अनुषंगिक कामांची पाहणी केली. प्रमुख अभियंता (पूल). उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता राजेश मुळे यांच्यासह संबंधित अभियंते यावेळी उपस्थित होते.
दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. १२५ वर्ष जुना कर्नाक पूल धोकादायक झाल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने घोषित केले. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने ऑगस्ट २०२२ मध्ये पुलाचे निष्कासन केले. मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग (Connectivity) कायम ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. मध्य रेल्वे प्राधिकरणाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार कर्नाक पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे.सद्यस्थितीत आर.सी.सी. डेक स्लॅब, डांबरीकरण, महानगरपालिकेच्या हद्दीतील पूर्व आणि पश्चिम बाजूचे पोहोच रस्ते इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत.
या पुलाची एकूण लांबी ३२८ मीटर असून रेल्वेच्या हद्दीत ७० मीटर इतकी आहे. महानगरपालिका हद्दीतील पोहोच रस्त्याची एकूण लांबी २३० मीटर असून पूर्वेस १३० मीटर व पश्चिमेस १०० मीटर इतकी आहे. लोहमार्गावरील पुलाच्या उभारणीकामी आरसीसी (Reinforced Cement Concrete) आधारस्तंभ यावर (Pier) प्रत्येकी ५५० मेट्रिक टन वजनी ७० मीटर लांब, २६.५० मीटर रूंद आणि १०.८ मीटर उंचीच्या दोन तुळया (Girder) स्थापित करण्यात आल्या आहेत.
या प्रकल्प अंतर्गत ५५० मेट्रिक टन वजनाची दक्षिण बाजूची लोखंडी तुळई दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ रोजी आणि उत्तर बाजूची लोखंडी तुळई दिनांक २६ आणि ३० जानेवारी २०२५ रोजी रेल्वे भागात सरकविण्याची कार्यवाही यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने वाहतूक व वीज पुरवठा या दोन्ही घटकांमध्ये घेतलेल्या विशेष खंड (स्पेशल ब्लॉक) दरम्यान तुळई सुरक्षितरित्या व यशस्वीपणे सरकवण्यात आली आहे. ५५० मेट्रिक टन वजनाच्या लोखंडी तुळईची जुळवणी जमिनीपासून ८ ते ९ मीटर उंचीवर पूर्ण करून, रेल्वे भागावर ५८ मीटर अधांतरी सरकविणे, सुमारे २ मीटर उंचीवरुन खाली उतरविणे, आर.सी.सी. आधारस्तंभावर स्थानापन्न करणे अशाप्रकारचे स्थापत्य अभियांत्रिकीदृष्ट्या हे काम अत्यंत आव्हानात्मक, जोखमीचे काम होते. त्यासाठी विशेष तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे.
तुळई स्थापित करण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पुढील कामकाजाचे सूक्ष्म नियोजन करून टप्पानिहाय किती कालावधी लागेल, याची निश्चिती महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत करण्यात आली. दिनांक २ फेब्रुवारी २०२५ पासून पूर्वेकडील संपूर्ण कामे म्हणजेच पायाभरणीपासून ते डांबरीकरणापर्यंतची कार्यवाही अवघ्या ४ महिन्यात पूर्ण करण्यात आली आहे. ही कामे कमी वेळेत पूर्ण करणे स्थापत्य अभियांत्रिकीदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक, कौशल्याचे व जोखमीचे होते. या प्रकल्पाचे पर्यवेक्षण सल्लागार मेसर्स राईट्स लिमिटेड यांनी पुलासाठी संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र (structural stability certificate) दिले आहे.
पूर्व आणि पश्चिमेकडील आरसीसी डेक स्लॅबचे काम देखील पूर्ण झाले आहे. मार्गिकेवरील काँक्रिट, मास्टिक, ध्वनी रोधक (Noise Barriers) आदी सर्व कामे पूर्ण झाली आहेत. रेल्वे हद्दीत अपघातरोधक अडथळा (Anti Crash Barriers) बसवण्यात आले आहेत. एकूणच पुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित कामे जसे की, रंगरंगोटी, दिशादर्शक फलक, पथदिवे, थर्मोप्लास्ट, कॅट आईज आदी कामे दिनांक १४ जून २०२५ पर्यंत पूर्ण केली जातील. पुलाची भारक्षमता, स्थिरता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी दिनांक १३ जून २०२५ रोजी भार चाचणी (Load Test) घेण्यात येणार आहे. त्याचे परिणाम ४८ तासानंतर म्हणजेच दिनांक १५ जून २०२५ रोजी प्राप्त होणे अपेक्षित आहे.
या पार्श्वभूमीवर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) . अभिजीत बांगर म्हणाले की, वाहतूक पोलिस विभागाच्या विशेष परवानगीने, महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत मागील दोन महिने दररोज २४ तास पुलाचे काम सुरू होते. त्यामुळे विक्रमी वेळेत पुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण करणे झाले आहे. भार चाचणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (VJTI) च्या तज्ज्ञांशी सल्लामसलत करून आणि वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून पूल वाहतुकीस खुला करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे बांगर यांनी नमूद केले.
बांगर पुढे म्हणाले की, दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ रोजी ५५० मेट्रिक टन वजनाची पहिली तुळई स्थापित करण्यात आली त्यावेळी उर्वरित सर्व कामे पावसाळ्यापूर्वी करणे आव्हानात्मक होते. मात्र, पूल विभागाच्या अभियंत्यांनी आटोकाट प्रयत्न करुन आणि अनेक आव्हानांवर मात करत पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण केली आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्येच कर्नाक पुलाच्या पूर्णत्वाची तारीख दिनांक १० जून २०२५ जाहीर करण्यात आली होती. हे उद्दिष्ट गाठण्यात पूल विभागाला यश आले आहे. त्यानुसार, पावसाळ्यापूर्वी पूर्व - पश्चिम मुख्य वाहतूक मार्ग (Carriage Way) नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे. पदपथाचे काम पूर्ण झाले असले तरी पश्चिम दिशेकडील रस्त्याचे (Sleep Road) काम पावसाळ्यानंतर केले जाणार आहे. त्यामुळे जिन्याचे (Staircase) काम पावसाळ्यानंतर केले जाईल, असे बांगर यांनी स्पष्ट केले.
- *कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणीचे फायदे -*
- - मुंबई शहराच्या दक्षिणेतील पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा
- - पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी सुरक्षित व वाढीव सुविधा उपलब्ध होणार
- - पूर्व मुक्तमार्गावरून येणारी वाहतूक, तसेच पी. डि'मेलो मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत
- - पी. डि'मेलो मार्गावरून गिरगाव, चर्चगेट, मंत्रालय, काळबादेवी, धोबी तलाव परिसरात वाहतूक सुविधा
- - युसूफ मेहरअली मार्ग, मोहम्मद अली मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, काझी सय्यद मार्ग या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार
0 टिप्पण्या