Top Post Ad

महानगरपालिकेच्या वतीने टाकाऊ साहित्य संकलनासाठी विशेष स्वच्छता मोहीम

  • *पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दिनांक २९ मे ते १५ जून २०२५ दरम्यान टाकाऊ साहित्य संकलनासाठी विशेष स्वच्छता मोहीम*
  • *टाकाऊ वस्तुंप्रमाणेच रस्ते व पदपथांच्या कडेला पडून असणारे दगड (कर्बस्टोन), पेव्हर ब्लॉक, प्रकल्प स्थळांवरील राडारोडा, राहिलेले इतर साहित्य यांचे संकलन करण्याचे निर्देश*
  • *नदी, नाल्यांच्या परिसरात विशेष लक्ष केंद्रीत करुन कार्यवाही*
  • *दररोज सकाळी १० वाजेपूर्वी स्वच्छता तसेच गरजेनुसार दुसऱ्यांदा झाडलोट (सेकंड स्विपिंग) करणार*

मुंबईतील पावसाळासंदर्भातील कामकाजाच्या अनुषंगाने, मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने मुंबई शहर आणि उपनगरात दिनांक २९ मे ते १५ जून २०२५ दरम्यान टाकाऊ साहित्य संकलनासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासोबतच, मोहिमेत दररोज सकाळी १० वाजेपूर्वी स्वच्छता तसेच गरजेनुसार दुसऱ्यांदा झाडलोट अर्थात स्वच्छता (सेकंड स्विपिंग) करण्यात येणार आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध उपाययोजनांसोबतच निरनिराळे उपक्रमही राबविले जात आहेत.  पावसाळ्याच्या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरातील विविध भागांत स्वच्छता अबाधित राहावी, या उद्देशाने नियमित स्वच्छतेसोबत विशेष पुढाकार घेण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, पावसाळ्यात नियमित अंतराने कचरा संकलन व स्वच्छता करून स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेषतः सार्वजनिक ठिकाणांवर टाकून देण्यात आलेल्या वस्तू, साहित्य यांचे संकलन करण्यावर भर देण्यात येणार आहे. जेणेकरुन पावसाच्या पाण्यासोबत वाहून येणाऱया या टाकाऊ वस्तुंमुळे पाणी निचरा करताना अडथळा होवू नये, हा या मागील प्रमुख उद्देश आहे. 

टाकाऊ वस्तुंप्रमाणेच रस्ते व पदपथांच्या कडेला पडून असणारे दगड (कर्बस्टोन), पेव्हर ब्लॉक, प्रकल्प स्थळांवरील राडारोडा, इतर राहिलेले साहित्य यांचे संकलन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नदी, नाल्यांच्या परिसरातील स्वच्छतेवर या मोहिमेत विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे, जेणेकरुन पावसाळी पाण्याच्या वहनामध्ये उद्भवणारे संभाव्य अडथळे दूर करता येतील. या अंतर्गत, दिनांक २९ मे ते १५ जून २०२५ दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभाग (वॉर्ड) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सर्वाधिक कचरा जमा होणारी ठिकाणे शोधून त्याठिकाणी सखोल स्वच्छता केली जाईल. यामध्ये रस्ते, गल्ली–बोळ यांची स्वच्छता, पेव्हर ब्लॉक, कडेचे दगड (कर्बस्टोन), नाले व जलवाहिनीच्या इनलेट पॉईंट्सवरील जाळ्यांची स्वच्छता करण्यात येईल.  पादचारी मार्ग, रस्त्यावरील कचरा, टाकाऊ सामग्री, राडारोडा, बेवारस साहित्य हटवण्यासाठी आवश्यकतेनुसार यंत्रसामग्रीचा वापर करून कचऱ्याचे संकलन करण्यात येईल. यासोबतच, नाल्यांलगतच्या भूखंडांवरून आणि प्रकल्पांच्या ठिकाणी शिल्लक राहिलेला राडारोडा तसेच कचरा उचलून स्वच्छता करण्यात येईल. मालकी हक्क काहीही असला तरी सर्व भूखंडांवरून (राडारोडा वगळून) कचरा संकलित करण्यात येईल.  दरम्यान, घरे, गृहनिर्माण संस्था तसेच अन्य आस्थापनांच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आपापल्या परिसरात स्वच्छता ठेवावी. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा, राडारोडा टाकू नये आणि स्वच्छतेसंदर्भातील प्रशासनाच्या प्रयत्नांत सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com