मुंबई मराठी पत्रकार संघाचे क्रिडा पत्रकार पुरस्कार सोहळा आज 19 मे रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कोविड काळापासून विविध कारणांमुळे रखडलेले हे पुरस्कार भारताचे माजी हॉकी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले, ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे आणि महाराष्ट्राचे पहिले मिस्टर इंडिया विजू पेणकर यांच्या हस्ते मान्यवरांना प्रदान करण्यात आले. कै.आत्माराम मोरे युवा क्रीडा पत्रकार पुरस्कार ७ हजार रुपये धनादेश शाल ट्रॉफी असा हा पुरस्कार २०२० सालचा मंगेश वरवडेकर यांना, २०२१ चा पुरस्कार तुषार वैती,२०२२ चा पुरस्कार प्रसाद लाड,२०२३ चा पुरस्कार जयेंद्र लोंढे,२०२४ चा पुरस्कार रोहित नाईक यांना देण्यात आला
तसेच कै. महेश बोभाटे क्रीडा पत्रकार २०२० चा १० हजार चा धनादेश शाल श्रीफळ ट्रॉफी असणारा हा पुरस्कार द्वारकानाथ संझगिरी (मरणोत्तर) पुरस्कार त्यांच्या चिरंजीव सुनिलने स्वीकारला. २०२१ चा पुरस्कार शरद कद्रेकर,२०२२ चा पुरस्कार संजय परब,२०२३ चा पुरस्कार विजय साळवी तर २०२४ चा पुरस्कार सुभाष हरचेकर यांना देण्यात आला. यावेळी ८० वर्षाचे क्रिडा पत्रकार सुभाष हरचेकर म्हणाले, धनराज पिल्ले मैदानात उतरतात तेव्हा त्यांच्या अंगात वीज चमकते. शरीर साथ देईल तोपर्यंत लिहित राहणार असे त्यांनी सांगितले. यावेळी कै.आत्माराम मोरे युवा क्रीडा पत्रकार पुरस्कारकर्ते अश्विनीकुमार आत्माराम मोरे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.पुरस्कार विजेते संजय परब यांनी त्यांना मिळालेला दहा हजाराचा धनादेश प्रभाकर नारकर यांच्या कोकण जनविकास समिती या संस्थेला दिला.
महाराष्ट्रातील मराठी वृत्तपत्रात जे क्रिडा पत्रकार आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या कामाची डॉक्युमेंट्री बनवणे आपल्यासारख्या खेळाडूंचे कर्तव्य आहे. असे सांगत महाराष्ट्राच्या क्रिडा पत्रकारांच्या बातमीदारीचे कौतुक खूप कौतुक केलं पाहिजे. महाराष्ट्रातील वृत्तपत्रात माझी हेडलाईन येणे म्हणजे खूप मोठी गोष्टी होती. असे उद्गार मुख्य अतिथी भारताचे माजी हॉकी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले यांनी काढले. माझ्या विजयाची एक पत्रकार परिषद स्वर्गीय हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्री बंगल्यावर घेतली होती. यावेळी दुसऱ्या दिवशी सर्व वृत्तपत्रात जे आलेली हेडलाईन " धनराज पिल्ले यांना ४८ तासात मुंबईत घर " होती ती खूप मला भावली. अशा अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या.
सोहळ्याचे अतिथी ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे म्हणाले, आम्ही खेळ खेळत होतो मात्र बातमीतून लिखाणातून हे पत्रकार आमच्या मनातले लिहित होते ही खूप मोठी गोष्ट आहे.खेळाडू घडविण्यासाठी मराठी प्रिंट पत्रकारांनी मोठी कामगिरी केली आहे.
महाराष्ट्राचे पहिले मिस्टर इंडिया कबड्डीपटू विजू पेणकर म्हणाले की ,ज्या माणसाचा मी चाहता आहे त्याच्या मांडीला मांडी लाँच सोहळा पाहतोय खूप भाग्याची गोष्ट आहे.संघात मला घेतले नाही त्यापेक्षा देश हरला याचे दुख जास्त असणारा धनराज खरोखर सच्चा देशभक्त आहे. त्याच्यावर अन्याय झाला खरा मात्र त्याने जगाला दाखवले की अन्याय सहन करणारा किती मोठा होऊ शकतो. पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांचे कार्य खूप कौतुकास्पद आहे.लोणावळ्यात त्यांनी संघाच्या विश्राम गृहाचे जे काम हाती घेतले आहे ते अभिमानास्पद आहे. त्याने जे टीम वर्क करुन जो विजय मिळवला आहे त्याला तोड नाही.
पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण म्हणाले, माझ्या ३० वर्षाच्या क्रिडा पत्रकारितेतील सर्व आठवणी आज जाग्या झाल्या.आजचा हा सोहळा गेट टुगेदर म्हणावे लागेल, सोहळ्यास आलेले काहीजण १० ते १५ वर्षानंतर भेटत आहेत.कोरोनानंतर दोन तीन वर्ष घडी बसायला वेळ लागला असल्याने पुरस्कार देण्यास वेळ लागत आहे. धनराज पिल्ले यांचे कर्तृत्व भावी पिढीसाठी मार्गदर्शन ठरेल. धनराज यांनी विमानतळावर केलेले हॉकी खेळाडू यांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी केलेले आंदोलन आज हॉकी व इतर खेळाडूंना विमानतळावर व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जाते.अशा आठवणी त्यांनी सांगितल्या.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे कार्यवाह व पुरस्कार समितीचे उपाध्यक्ष शैलेंद्र शिर्के यांनी केले, पुरस्कार समिती उपाध्यक्ष व संघाच्या उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विश्वस्त देवदास मटाले, सुरेश वडवलकर, प्रा.हेमंत सामंत, दिवाकर शेजवळ, आदी पदाधिकारी यांच्यासह पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळ्याचे निवेदन अश्विन बापट यांनी तर आभार प्रदर्शन स्वाती घोसाळकर यांनी केले.
0 टिप्पण्या