'राबोडी परिसरातील नाल्यावरील पुलाच्या बांधकामांचा राडारोडा नाल्यात टाकल्यामुळे खाडी आणि नाल्यामधील सामायिक ओढा बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे आढळून आले. ठाणे महापालिका अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या भ्रष्टाचारामुळेच नालेसफाईचे तीनतेरा वाजले असून ठाणेकरांचा कराचा पैसा कळव्याच्या खाडीत वाहून जात आहे, इंदीरानगर, सावरकरनगर येथील डोंगर भागातून येणारे पाणी हे राबोडी भागातील नाल्यातून वाहते आणि ते पुढे खाडीला जाऊन मिळते. अवकाळी पाऊस झाला, हे सर्वांना मान्य आहे. पण, राबोडी नाल्याच्या कामात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे नाल्यात अवकाळी पावसाचे पाणी तुंबून ते परिसरातील घरांमध्ये शिरून येथील नागरिकांचे नुकसान झाले. त्याची भरपाई पालिका देणार आहे का, विकास सर्वांनाच हवा आहे. पण, त्याचा मार्ग भ्रष्टाचाराच्या गटारगंगेतून जाणारा नसावा, नालेसफाईच्या नावाखाली ठाण्याचे वाटोळे झाले आहे. हा नाला म्हणजे महानगर पालिकेतील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे उदाहरण आहे असे म्हणत, 138 कोटीचा असलेल्या या नाल्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केली. इतकेच नव्हे तर या नाल्यामुळे विस्थापित झालेल्यांना देण्यात आलेल्या घरांमध्येही प्रचंड भ्रष्टाचार झाला असून एकेका व्यक्तीला पाच पाच घरे देण्यात आल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला.
प्रसार माध्यमांशी बोलतांना नजीब मुल्ला म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून येथे नाल्याच्या निर्माणाचे काम सुरू आहे. दरवर्षी पावसाळ्यापुर्वी नाल्यातील माती काढण्यात येते. त्यामुळे घरांमध्ये पाणी शिरले नव्हते. परंतु यंदा नालेसफाईची कामे उशीराने सुरू झाली आणि त्यात अवकाळी पाऊस झाला. यामुळे घरांमध्ये पाणी शिरले, ही वस्तुस्थिती आहे. त्याबाबत नागरिकांची दिलगीरी व्यक्त केली. या नाल्याची रुंदी ३ मीटरने वाढविण्याबरोबरच नाल्यावर रस्ता तयार करण्यात येत आहे. खाडीच्या मुखाशी नाल्याची खोली वाढविण्याबरोबर फ्लड गेट बसविण्यात येणार आहे, असे नजीब मुल्ला यांनी सांगितले. तसेच नशीबाने निवडुण आलेल्या आमदारांनी आम्हाला तांत्रिक गोष्टी शिकवू नयेत, असा टोलाही मुल्ला यांनी आव्हाड यांना लगावला.
0 टिप्पण्या