Top Post Ad

नाल्यातून गाळ काढण्याच्या कार्यवाहीत यंदा अधिक पारदर्शकता!

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरु आहेत. गाळ काढण्याची कामे योग्यरित्या होण्यासह त्यावर देखरेख करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने कंत्राटांमध्ये यंदा अधिक सक्त अटी व शर्तींचा समावेश केला आहे. नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांसाठी प्रशासनाने छायाचित्रण समवेत ३० सेकंदाचे चित्रीकरण (व्हिडिओ) बंधनकारक केले आहे. तर लहान नाल्यांमधून गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.  गाळ उपसा संदर्भात प्राप्त होणाऱ्या सर्व व्हिडिओंचे महानगरपालिका प्रशासनाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) प्रणालीच्या मदतीने विश्लेषण केले जाणार आहे. त्याद्वारे नाल्यातून  गाळ उपसा करण्याच्या कामांची योग्य देखरेख करणे, कामांमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखणे यासाठी प्रशासनाला मदत होणार आहे. तसेच,  महानगरपालिकेने नागरिकांसाठी  'https://swd.mcgm.gov.in/wms2025'  या संकेतस्थळावर छायाचित्र /व्हिडिओ उपलब्ध करून दिली आहेत. जेणेकरून नागरिकांना त्यांच्या परिसरातील नाल्याच्या स्वच्छतेचे तपशील पाहता येतील.

 मुंबई महानगरातील नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे ठरवलेल्या वेळेत पूर्ण करावीत, आवश्यक तेथे अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री नेमून कामांना गती द्यावी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कामांची पारदर्शकता आणि गुणवत्ता तपासावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी यंत्रणेला दिले आहेत. आखलेल्या नियोजनानुसार शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या सर्व विभागांतील नाल्यांमधून गाळ उपसा कामे विहित मुदतीत आणि पारदर्शकरित्या पूर्ण केली जातील, असा विश्वास देखील महानगरपालिका आयुक्त श्री. गगराणी यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून मोठ्या नाल्यांमधील गाळ काढते, तर लहान नाल्यांमधील गाळ काढण्याची जबाबदारी विभागीय कार्यालयांवर (वॉर्ड) असते. नाल्यांमधून गाळ काढल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा जलद होतो. प्रत्येक वर्षी नाल्यांमधून किती गाळ काढणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करून उद्दिष्ट निश्चित केले जाते.

 दरवर्षी नाल्यांमध्ये साचणारा गाळ हा वर्षभरात तीन टप्प्यांमध्ये काढला जातो. त्यात प्रामुख्याने पावसाळ्यापूर्वी सर्वाधिक गाळ उपसा केला जातो. या प्रचलित पद्धतीनुसार, यावर्षी एप्रिल व मे २०२५ या दोन महिन्यांत नाल्यांमधील एकूण गाळाच्या ८० टक्के गाळ काढण्यात येईल, तर पावसाळ्यादरम्यान १० टक्के आणि पावसाळ्यानंतर उर्वरित १० टक्के गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे काम सुयोग्य नियोजन आखून आणि जास्तीत जास्त पारदर्शकतेने करण्यासाठी महानगरपालिकेने उपाययोजना केल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे छोट्या व मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी निविदा प्रक्रियेने शहर आणि उपनगरांसाठी २३ कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. लहान नाल्यांमधून गाळ उपसा करण्याचे कार्यादेश दिनांक १९ मार्च २०२५ रोजी तर, मोठ्या नाल्यांमधून गाळ काढण्याचे कार्यादेश दिनांक २२ मार्च २०२५ रोजी देण्यात आले आहेत. त्यानुसार, मार्च अखेरपासून गाळ काढण्याची कामे सुरू आहेत. तसेच मिठी नदीतून गाळ काढण्याची कामे दिनांक २ एप्रिल २०२५ आणि दिनांक १६ एप्रिल २०२५ पासून सुरु करण्यात आली आहेत.

 गाळ काढण्याच्या कामावर योग्य प्रकारे देखरेख ठेवण्यासाठी, गाळ उपसा करण्याच्या कामांमध्ये संपूर्ण पारदर्शकता ठेवण्यासाठी यंदा कंत्राटांमध्ये अधिक कठोर अटी व शर्तींचा समावेश करण्यात आला आहे. नाल्यांमधून गाळ उपसा करण्यापूर्वी आणि गाळ उपसा केल्यानंतरची छायाचित्रे सादर करणे बंधनकारक तर आहेच. त्यापुढे जाऊन आता प्रत्येक कामासाठी ३० सेकंदांचे चित्रीकरण सादर करणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. लहान नाल्यांच्या बाबतीत गाळ काढण्यापूर्वीचे आणि गाळ काढल्यानंतरचे सीसीटीव्ही द्वारे चित्रीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. लहान नाल्याच्या उगमापासून पातमुखापर्यंत (एन्ड टू एन्ड) हे चित्रीकरण करावयाचे आहे. मोठ्या आणि लहान नाल्यांमधून गाळ उपसा केलेल्या कामांच्या या सर्व चित्रफिती कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) प्रणालीचा वापर करून तपासण्यात येणार आहेत.

 गाळ काढण्याच्या कामाच्या तीन टप्प्यांत—(१) काम सुरू होण्यापूर्वी, (२) प्रत्यक्ष काम सुरू असताना आणि (३) काम पूर्ण झाल्यानंतर—दिनांक, वेळ, अक्षांश, रेखांश (रिअलटाइम जिओ-टॅग) यासह चित्रफीत आणि छायाचित्रे तयार करून ती संबंधित सॉफ्टवेअरवर अपलोड करणे कंत्राटदारांना अनिवार्य असेल. त्याचप्रमाणे, दररोज नाल्यांमधून काढलेला गाळ ठेवण्याची जागा, गाळ भरण्यापूर्वी रिकामा असलेला डंपर, डंपरमध्ये गाळ भरल्यानंतरचे दृश्य, गाळ भरलेले वाहन क्षेपणभूमीवर जाण्यापूर्वी वजन काट्यावर केलेल्या वजनाची कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय म्हणजेच फेरफार करायला वाव न देता थेट प्रणाली (सॉफ्टवेअर) मध्ये होणारी नोंद, गाळ वाहून नेल्यानंतर क्षेपणभूमीवर पोहोचलेल्या वाहनांची माहिती, त्या वाहनांचे क्रमांक आणि वेळ यांची नोंद करणे आवश्यक असेल. समवेत, क्षेपणभूमीवर येणाऱया-जाणाऱया वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारली जाणार आहे.

मुंबईकर नागरिकांना आपल्‍या परिसरातील नाल्‍याची स्‍वच्‍छता केली जात आहे की नाही, याबाबतची छायाचित्रे, चलचित्रे दररोज अद्ययावत स्थितीमध्‍ये महानगरपालिकेच्‍या संकेतस्‍थळावर पाहता येतील. संकेतस्‍थळावरील लिंकद्वारे ही प्रणाली नागरिकांना पाहता येतील. नालेस्‍वच्‍छता प्रक्रियेची अत्‍युच्‍च स्‍तरावरील पारदर्शकता राहिल, यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रयत्‍नशील आहे. त्‍यादृष्‍टीने स्‍वयं प्रकटन (Volunteer Discloser) या तत्‍त्‍वानुसार, सर्व माहिती सार्वजनिकरित्‍या उपलब्‍ध (Public Domain) उपलब्‍ध करून दिली जात आहे.

  • *गाळनिर्मूलन कार्यामध्ये पुढील घटकांचा समावेश:*
  • ** संकलन:* नाल्यांमधून गाळ उपसून तो नाल्याच्या काठावर ४८ तास वाळवणे, त्यानंतर वाहतूक करणे.
  • ** वाहतूक:* वाहनामध्ये गाळ भरून नामनिर्दिष्ट वजन काट्यावर तौलणी करणे आणि त्यानंतर तो निर्दिष्ट विल्हेवाट स्थळी पोहोचवणे.
  • ** विल्हेवाट:*  निर्दिष्ट विल्हेवाट स्थळी वाहन रिकामे करून, रिकाम्या वाहनाचे पुन्हा वजन काट्यावर वजन करणे.
 *वजन व्यवस्थापन प्रणालीची वैशिष्ट्ये:*
* सर्व प्रमुख नाले भू-स्थानिक संदर्भित (georeferenced) केलेले आहेत , जेणेकरून वाहने केवळ ठराविक परिघातच गाळ भरू शकतील. लहान नाल्यांसाठी विभागाला (ward) भू-कोडीकरण (geo-coding) केले आहे.
* प्रत्येक अभियंत्यासाठी विशिष्ट लॉगिन असलेले ॲप
* गाळ भरण्याच्या आधी, भरण्याच्या वेळी आणि भरण्यानंतर छायाचित्र व व्हिडिओ घेण्याची सुविधा, जेणेकरून केवळ गाळच वाहतूक केला जात आहे याची खात्री होईल
* हे मोबाईल ॲप नाल्याच्या सीमेपासून २० मीटरच्या आतच कार्य करेल
* ॲप लॉगिन विशिष्ट उपकरणाशी संलग्न असेल, त्यामुळे एका लॉगिनने दुसऱया डिव्हाइसवर लॉग इन  करता येणार नाही
* इमेज घोस्टिंग शोधण्याची सुविधा: अस्पष्ट किंवा पिक्सेलयुक्त प्रतिमा टाळण्यासाठी मोबाईल ॲपमध्ये इमेज घोस्टिंग शोधण्याची प्रणाली आहे.
* प्रत्येक वाहनासाठी स्वयंचलित लॉग-शीट / ट्रिप क्रमांक: वाहनाच्या संपूर्ण प्रवासाचा मागोवा ठेवण्यासाठी प्रत्येक ट्रिपसाठी वेगळा क्रमांक आहे
* वजन काट्यावर स्वयंचलित वजन मापन प्रणाली
* युनिक ट्रिप क्रमांकाच्या आधारे वाहनाचे वजन आपोआप नोंदवले जाते.
* ताडपत्री (tarpaulin) काढल्यानंतर वाहनाचे समोरून आणि वरून एकाच वेळी छायाचित्र घेतले जाते.
* वजन मापन करताना ३० सेकंदांचा व्हिडिओ नोंदवला जातो
* या कामासाठी विकसित केलेल्या मोबाईल ॲपद्वारे हा व्हिडिओ घेण्याची सुविधा
* प्रत्येक कंत्राटदारास स्वतंत्र लॉगिन क्रेडेन्शियल
* वाहन रिकामे करताना ॲपद्वारे ३० सेकंदांचे छायाचित्र आणि व्हिडिओ घेण्याची सुविधा
* ॲपद्वारे डंपिंग साईटचे भौगोलिक स्थान (geolocation) आणि वेळ नोंदवली जाते.
* रिकामे वाहन पुन्हा वजन काट्यावर तौलणीसाठी परत येते
* जर वाहन भारित स्थितीतील वजन मापनानंतर ३० मिनिटांच्या आत परत आले, तर त्याला तौलणीस परवानगी दिली जाणार नाही.
* वाहन ट्रॅकिंग प्रणालीशी समाकलित (Integrated) प्रणाली
* वाहन अनावश्यक थांबे करत नाही आणि फक्त निर्दिष्ट विल्हेवाटस्थळावरच पोहोचते याची खात्री केली जाते.
* नाला स्वच्छतेची तारीख आणि व्हिडिओ *'https://swd.mcgm.gov.in/wms2025'* संकेतस्थळावर अपलोड करता येतील

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com