Top Post Ad

लक्ष्मीदास बोरकर जन्मशताब्दी सोहळा मुंबई मराठी पत्रकार संघात उत्साहात संपन्न

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार लक्ष्मीदास बोरकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शनिवार दि. ५ एप्रिल  रोजी  मुंबई मराठी पत्रकार संघात एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . गोवा मुक्तीसंग्रामाच्या प्रारंभ काळात या लढ्याचे प्रणेते डॉ. राम मनोहर लोहिया यांना, पोर्तुगीज सोजिरांच्या कडेकोट बंदोबस्ताची कडी तोडून मडगावच्या आझाद मैदानात घेऊन येण्याची किमया लक्ष्मीदास बोरकर यांनी केली होती. मडगावच्या त्याच जाहीर सभेत डॉ. लोहियांनी गोवा मुक्ती लढ्याचे रणशिंग फुंकले होते. पत्रकार म्हणून जवळ जवळ अर्धशतकभर कार्यरत असलेल्या बोरकर यांनी जनसामान्यांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. बोरकर यांनी मुंबईच्या दै.लोकसत्तामधून तसेच पणजी गोवा येथील दै.नवप्रभाचे संपादक म्हणून ध्येयवादी पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला. ते मुंबई मराठी पत्रकार संघाचे सक्रिय कार्यकर्ते होते.


   मुंबई मराठी पत्रकार संघ आणि लक्ष्मीदास बोरकर शताब्दी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी झालेल्या या सोहळ्याला केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दै.नवशक्तिचे माजी संपादक प्रकाश कुलकर्णी आणि दै.नवप्रभाचे माजी संपादक सुरेश वाळवे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना बहुमानाने स्मरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन आणि आयोजन मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. 

केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, ‘देवभूमी गोव्यात अनेक रत्ने जन्माला आली, त्यापैकी एक तेजस्वी तारा म्हणजे स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक लक्ष्मीदास बोरकर,’ असे गौरवोद्गार  त्यांनी  व्यक्त केले ‘बोरकरांनी समाजासाठी आपल्या लेखणीतून आणि कृतीतून दिलेली सेवा अमूल्य आहे. पोर्तुगीज सत्तेविरोधात लढा देत असताना त्यांनी डॉ. राम मनोहर लोहिया यांना गोव्यात आणले, अटक सहन केली पण तडजोड केली नाही. त्यांच्या लेखनात गोडवा होता, पण तो आवाज दुर्बलांचा होता.’ ‘त्यांचा आदर्श आणि सत्यप्रिय वृत्ती आजच्या पिढीने जपणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल,’ असेही त्यांनी नमूद केले.

‘बोरकर हे एक उत्कृष्ट पत्रकार, लेखक तर होतेच पण त्याचबरोबर एक उत्कृष्ट कुटुंबप्रमुखही होते. त्यामुळे समाजामध्ये सगळ्या स्तरावर काम करत असतानासुद्धा कुटुंबावरही योग्य संस्कार केले आणि अशा व्यक्तिमत्त्वाचा जन्मशताब्दी सोहळा आयोजित करताना आम्हाला आनंद होत आहे,’ असे उद्गार संदीप चव्हाण यांनी काढले.  कार्यक्रमात उपस्थित दै. नवप्रभाचे माजी संपादक सुरेश वाळवे भावुक होऊन म्हणाले, ‘मी बोरकरांच्या हाताखाली घडलो. त्यांनी मला पितृवत प्रेम दिलं. एकदा चूक केल्यावर मी राजीनामा दिला होता, पण त्यांनी तो फाडून टाकला. गोव्यासाठी त्यांचं योगदान अतुलनीय आहे.’ लोकसत्तामधील माजी सहकारी प्रकाश कुलकर्णी म्हणाले, ‘बोरकर स्वत: बातम्या तयार करत. त्यांच्या उपस्थितीने कार्यालयात ऊर्जा संचारत असे. ते साक्षात पत्रकारितेचे चैतन्य होते.’ त्यांनी हेही सांगितले की, ‘ते 'न्यूज एडिटर' झाले, पण ‘लोकसत्ता’चे संपादक होऊ शकले नाहीत, ही खंत आजही राहते.’

कार्यक्रमाच्या प्रारंभी बोरकरांच्या जीवनावर आधारित माहितीपट दाखविण्यात आला, तसेच त्यांच्या तीन पुस्तकांच्या नव्या आवृत्त्यांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत मुंबई मराठी पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष जगदीश भोवड, सूत्रसंचालन उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, तर आभार प्रदर्शन संजय चांदेकर यांनी केले. हा कार्यक्रम बोरकर यांच्या कार्याचे स्मरण करत पत्रकारितेतील मूल्ये, सामाजिक जाणिवा आणि तळमळीने काम करण्याच्या वृत्तीची प्रेरणा देणारा ठरला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com