आज दि.११ व १२ एप्रिल ला महात्मा फुले जयंती दिनी आमचे " फुले - आंबेडकरी विचारांचे मित्र, कवी व दलित पँथरचे एक संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ" महाराष्ट्र शासन व अन्य संस्थांच्या सहकार्याने " समष्टी" चा सांस्कृतिक उत्सवाचा कार्यक्रम मंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत घेत आहेत. ज्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पुरोगामी शायर, पटकथाकार,संवाद लेखक जावेद अख्तर पासून , संपादक, पत्रकार ज्ञानेश महाराव, राजू परुळेकर ते आंबेडकरी कवयित्री लेखिका डॉ श्यामल गरुड पर्यंत अनेक सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. जे सेन्सॉर बोर्ड कोण नामदेव ढसाळ असा सवाल विचारते, त्या नामदेव ढसाळ यांच्या कवितांचे वाचन आमचे मित्र, कलावंत अक्षय शिंपी, चिन्मयी सुमित,निरजा, प्रज्ञा दया पवार, युवराज मोहिते आदी करणार आहेत. या कार्यक्रमातील अन्य सत्रातही सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत.
माझा या सर्व मान्यवरांना व समष्टी च्या मूख्य आयोजकांना हा जाहीर सवाल आहे की , ते या कार्यक्रमात ज्यां शासनाने नेमलेल्या सेन्सॉर बोर्डाने , नामदेव ढसाळ यांची कविता असलेल्या दलित अत्याचारा वरील महेश बनसोडे यांच्या" चल हल्ला बोल" या चित्रपटाला प्रमाणपत्र देणे नाकारले व सार्वजनिक प्रदर्शना पासून रोखले, ज्या बाबतीत विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला असता, त्याबाबत सांस्कृतिक मंत्र्यांनीही समाधानकारक खुलासा केला नाही.दुसरीकडे आता भारतीय सामाजिक क्रांती चे जनक महात्मा जोतीराव फुले यांच्या आदर्श जीवन चरित्रा वरील चित्रपट जो त्यांच्या जयंतीनिमित्त प्रदर्शित होणार होता.त्यालाही शासनाच्या याच सेन्सॉर बोर्डाने कुणा पुण्यातील,( ब्राह्मण सभेच्या)पेशव्यांच्या जातीय,धर्मांध पुरस्कर्त्याच्या, तक्रारीवरून प्रदर्शन करण्या पासून रोखण्याचा नीचपणा केला आहे. आणि सेन्सॉर बोर्डानेही त्याला कुठलाही विचार न करता माना डोलाऊन संमती दिली आहे.
माझा सवाल या मान्यवरांना व कार्यक्रम आयोजकांना आहे की जे स्वतःला पुरोगामी,फुले - आंबेडकरी म्हणवितात ते तरी वरील कार्यक्रमात शासनाचा व सेन्सॉर बोर्डाचा जाहीर निषेध करणारा ठराव मांडणार का?
का नुसत्याच,
" हाण सख्या हाण, तुझीच बारी, लोकशाही मेली तर डेंगण्या मारी...."
अशा टाळ्या घेणाऱ्या नामदेव ढसाळ च्या कविता वाचून वा त्याचं चित्र प्रदर्शन भरवून स्वतःची पाठ थोपटून घेणार?
अर्थात माझा वरील सवाल या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या लोकां पुरताच मर्यादीत नाही तर, आज महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे जयंती उत्सव साजरे करणारे जे पुरोगामी समतावादी, फुले - आंबेडकरी, लोकशाही विचारांचे म्हणविणाऱ्या सर्वाना आहे.. ते जाहीरपणे शासनाचा, सेन्सॉर बोर्डाचा वरील संदर्भात जाहीर निषेध करणार का?
सुबोध मोरे,-
लोक सांस्कृतिक मंच, जनवादी लेखक संघ, प्रगतिशील लेखक संघ, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, दलित पँथर सुवर्ण महोत्सव समन्वय समिती.
0 टिप्पण्या