बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध रूग्णालयांमध्ये केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, रूग्णांना आवश्यक ती औषधे उपलब्ध व्हावीत तसेच राष्ट्रीय आरोग्य निधी, धर्मादाय रूग्णालयांच्या ठिकाणी रुग्णांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, सर्वसामान्य रूग्णांचे हित पाहून केंद्रीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी उद्दिष्ट निश्चित करावे, असे निर्देश केंद्रीय आयुष राज्यमंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील विविध विषयांचा तसेच कामकाजाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज ५ मार्च रोजी बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱयांना विविध निर्देश दिले.
या बैठकीला खासदार रवींद्र वायकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा तसेच वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, उपधर्मादाय आयुक्त वैभव जाधव, महानगरपालिकेचे विशेष कार्य अधिकारी (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रूग्णालये) डॉ. (श्रीमती) नीलम अंद्राडे, अधिष्ठाता मोहन जोशी, अधिष्ठाता डॉ. (श्रीमती) संगीता रावत, अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) दक्षा शाह यांच्यासह सर्व संबंधित वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. हानगरपालिकेसह विविध आरोग्य संस्था तसेच यंत्रणांनी संगणकीय सादरीकरणातून आपापल्या अखत्यारितील सार्वजनिक आरोग्य विषयक कामकाजाची माहिती सादर केली. तसेच प्रगतिपथावर असलेल्या योजना, प्रकल्प यांची संक्षिप्त माहिती देखील दिली.सर्व आढावा घेतल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, केंद्र शासनाच्या योजनांच्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सर्व रुग्णांना विशेषतः गरजू रूग्णांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य असायला हवे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अधिक प्रयत्न व्हायला हवेत. रूग्णालयांच्या ठिकाणी जेनेरिक औषधांच्या योजनेचा फायदाही रूग्णांसाठी उपलब्ध व्हावा, जेणेकरून वाजवी दरामध्ये योग्य औषधे उपलब्ध होतील. प्रमुख रूग्णालये तसेच उपनगरीय रूग्णालयांच्या ठिकाणी अमृत योजनेअंतर्गत औषधे मिळावीत, यासाठी गाळे / जागा उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा, अशी सूचना जाधव यांनी याप्रसंगी केली.
धर्मादाय रुग्णालयामध्ये निर्धन रुग्णांना मोफत उपचार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांसाठी ५० टक्के सवलतीच्या दरात उपचार मिळावेत. तसेच एकूण रुग्णांपैकी धर्मादाय रुग्णांसाठी उपलब्ध रुग्णशय्या, व्याप्त रुग्णशय्या व रिकामे रुग्णशय्या आदी माहितीचा फलकही असावा, असेही निर्देश केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी संबंधितांना दिले. केंद्राच्या आयुषमान भारत योजनेच्या अनुषंगाने रूग्णांचा वैद्यकीय इतिहास, चाचण्यांचे अहवाल हे एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. येत्या कालावधीत या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, यासाठीच्या तांत्रिक अडचणी सोडवून त्या शासनाने मार्गी लावल्या आहेत, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
खासदार रवींद्र वायकर म्हणाले की, धर्मादाय रूग्णालयांच्या ठिकाणी रूग्णांसाठी लागू असलेल्या सवलतींची माहिती दर्शनी भागात प्रदर्शित करणे आवश्यक आहे. तसेच रिक्त रुग्णशय्यांची आकडेवारी डिजीटल व अद्ययावत स्वरूपात दर्शनी भागात लावावी. तक्रार निवारण आणि रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी धर्मादाय विभागाच्या अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांकही उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना देखील वायकर यांनी यावेळी केली.
0 टिप्पण्या