मुंबई महानगरपालिका स्वच्छता आणि आरोग्य उपविधी २०२५ चा मसुदा महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या मसुद्याबाबत नागरिकांनी दिनांक १ एप्रिल २०२५ ते दिनांक ३१ मे २०२५ या दोन महिन्यांच्या कालावधीत सूचना व हरकती bmc.swmbyelaws2025@gmail.com या ईमेलवर किंवा घनकचरा व्यवस्थापन मुख्य कार्यालयात लेखी सूचना व हरकती पाठवाव्यात., असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छता आणि आरोग्य उपविधी २००६ हे सध्या लागू आहेत. या उपविधीमध्ये कालसुसंगत तसेच विविध शासकीय, प्रशासकीय बदलानुसार योग्य तो आढावा घेऊन नवीन मसुदा तयार करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे मसुदा उपविधी घनकचरा व्यवस्थापन विभागाने तयार केले आहे.बृहन्मुंबई महानगरपालिका स्वच्छता आणि आरोग्य उपविधी २०२५ या शीर्षकाखालील या मसुदा उपविधीची प्रत बृहन्मुंबई महानगरपालिका संकेतस्थळावर (https://portal.mcgm.gov.in >> नवीन) दिनांक १ एप्रिल २०२५ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सर्व धोरणनिर्माते, हितधारक, भागधारक आणि नागरिकांनी कृपया बृहन्मुंबई महानगरपालिका स्वच्छता आणि आरोग्य उपविधी २०२५ चा आढावा घ्यावा. या मसुदा उपविधीबाबत आपल्या सूचना व हरकती दिनांक ३१ मे २०२५ पूर्वी ई-मेलद्वारे bmc.swmbyelaws2025@gmail.com यावर पाठवता येतील.ज्यांना लेखी स्वरूपात सूचना अथवा हरकती पाठवावयाच्या असतील त्यांनी, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (शासकीय व सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस वगळता) सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत - प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) यांचे कार्यालय, तिसरा मजला, महानगरपालिका खटाव मंडई इमारत, अविष्कार इमारतीसमोर, स्लेटर रोड, ग्रँट रोड (पश्चिम), मुंबई-४००००७ या कार्यालयीन पत्त्यावर सूचना / हरकती पाठवाव्यात, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर यांनी आवाहन केले आहे
0 टिप्पण्या