नव-रुझ: बहाई समाजासाठी नव-रुझ (बहाई नवीन वर्ष) हा एक पवित्र आणि आनंदाचा सण आहे, जो वैयक्तिक नूतनीकरण आणि मानवजातीच्या आध्यात्मिक पुनरुज्जीवनाचे प्रतीक मानला जातो. हा सण वसंत ऋतूच्या आगमनासोबत साजरा केला जातो आणि तो केवळ निसर्गातील बदलांचे प्रतिनिधित्व करत नाही, तर मानवी आत्म्यातील नवचैतन्य आणि आध्यात्मिक जागृतीचा संदेश देतो. हा दिवस आज हर्षोल्हासात मुंबईतील बहाई सेन्टर मध्ये साजरा करण्यात आला. यावेळी समाजातील अनेक मान्यवर आपल्या कुटुंबासह उपस्थित होते.
या दिवसाचे महत्त्व विषद करताना बहाई सेंटरच्या सेक्रेटरी नर्गिस गौर म्हणाल्या, दिव्यात्मा बाब यांनी सादर केलेल्या दिनदर्शिकेत प्रत्येकी १९ दिवसांचे १९ महिने आहेत. या नव्या दिनदर्शिकेचा पहिला दिवस “परमेश्वराचा दिवस” म्हणून ओळखला जातो. यानंतरचे अठरा दिवस त्या १८ जीवित अक्षरांशी (पहिल्या १८ अनुयायी ज्यांनी दिव्यात्मा बाब यांचे स्थान ओळखले) संबंधित आहेत. दिव्यात्मा बाब यांनी या नव्या दिनदर्शिकेचे महत्त्व अधोरेखित केले आणि बहाउल्लाह यांनी या दिनदर्शिकेला मान्यता देत उपवास संपल्यानंतर नव-रुझ साजरा करण्याची परंपरा सुरु केली. उपवासाच्या शेवटच्या दिवसाच्या सूर्यास्तानंतर नव-रुझचा उत्सव सुरु होतो, जो आनंद, प्रार्थना आणि कृतज्ञतेचा काळ मानला जातो. अब्दुल-बहा यांनी नव-रुझच्या आध्यात्मिक महत्त्वाची सखोल व्याख्या केली आहे. त्यांनी नव-रुझची तुलना वसंत ऋतूच्या आगमनाशी केली आहे, जिथे निसर्ग शिशिराच्या निस्तेजतेनंतर नव्या हिरवाईने नटतो. तशाच प्रकारे, नव-रुझ मानवजातीच्या आत्म्याला नवीन चेतना आणि जागृती देतो.“लवकरच संपूर्ण जग, जसे वसंत ऋतूमध्ये होते, त्याप्रमाणे आपले परिधान परिवर्तित करणार आहे. शिशिर ऋतूतील पानांचा रंगबदल व पानगळी भूतकाळाची बाब झाली आहे आणि हिवाळ्यातील काळसरपणा संपुष्टात आला आहे. नूतन वर्षाचे पदार्पण आले आहे आणि आध्यात्मिक वसंत ऋतूचे आगमन झाले आहे. पृथ्वीवरील काळी माती हिरव्यागार टवटवीत बागेत परिवर्तित होत आहे; वाळवंट व डोंगर कसे लाल लाल फुलांनी बहरून आले आहेत; पक्षी गुलाबांच्या फांद्यांमध्ये उच्च स्वर्गातील देवदूतांप्रमाणे गात आहेत, त्या आध्यात्मिक वसंत ऋतूच्या सुवार्तेची घोषणा करीत आहेत.” असे अब्दुल-बहा म्हणतात,
म्हणूनच नव-रुझ फक्त नव्या वर्षाची सुरुवात नसून मानवतेच्या आध्यात्मिक पुनरुत्थानाचा प्रतीकात्मक उत्सव आहे. जसे वसंत ऋतूमध्ये झाडे-पाने नव्याने बहरतात आणि निसर्ग नव्या रंगांनी सजतो, तसाच नव-रुझच्या निमित्ताने मानवी आत्मा नव्या प्रकाशाने उजळतो. हा सण शांतता, ऐक्य आणि नवचैतन्याचा संदेश देतो. नव-रुझच्या निमित्ताने बहाई अनुयायी प्रार्थना, ध्यान, सामाजिक सेवा आणि आनंददायी उत्सवांद्वारे परमेश्वराच्या कृपेची जाणीव करून देतात. उपवासाच्या समाप्तीनंतर येणारा हा सण, केवळ शरीराला नवचैतन्य देत नाही, तर आत्म्याला शुद्धी आणि समर्पणाची अनुभूतीही देतो. नव-रुझ हा सण संपूर्ण मानवतेसाठी एकतेचा संदेश देत, नवीन आशा आणि समृद्धीची दारं उघडतो. असा हा दिवस सर्वांसाठी आनंदमयी असल्याने तो आज बहाई समाजातर्फे साजरी करण्यात आला असल्याचे नर्गिस गौर म्हणाल्या.
0 टिप्पण्या