Top Post Ad

रस्‍तेनिहाय काम पूर्ण करण्‍याची तारीख निश्चित करावी- महानगरपालिका आयुक्‍तांचे निर्देश

बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सिमेंट कॉंक्रिट रस्ते प्रकल्पाची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे. येत्‍या ७० दिवसात म्‍हणजेच दिनांक ३१ मे २०२५ पूर्वी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामे पूर्णत्‍वास गेली पाहिजेत. त्‍यासाठी सूक्ष्‍म नियोजन (मायक्रो प्‍लानिंग) , रस्‍तानिहाय काम पूर्ण करण्‍याची तारीख निश्चित करणे आवश्‍यक आहे. त्‍याचवेळी महानगरपालिकेच्‍या जल अभियंता, पर्जन्‍य जलवाहिन्‍या, मलनिस्‍सारण विभागांबरोबरच विविध उपयोगिता प्राधिकरण/ संस्‍था यांच्‍याशी सुयोग्‍य समन्‍वय साधून काँक्रिटीकरण कामे मार्गी लावावीत, असे स्‍पष्‍ट निर्देश महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले.   बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  भूषण गगराणी यांनी महानगरपालिका मुख्यालयात रस्ते व वाहतूक विभागाच्या अभियंत्यांची आज  २५ मार्च रोजी बैठक घेतली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)  अभिजीत बांगर यांच्यासह उप आयुक्त (पायाभूत सुविधा)  शशांक भोरे, प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) . गिरीश निकम यावेळी उपस्थित होते. 

  कामे अधिक वेगाने करताना गुणवत्‍तेवरदेखील भर दिला पाहिजे. रस्‍तेकामे सुरू असताना वरिष्‍ठ अभियंत्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी आकस्मित भेट (सरप्राईज व्हिजिट) द्यावी, अधिक गती आणि गुणवत्ता यावर लक्ष केंद्रित करावे, काँक्रिटीकरण झालेल्‍या रस्‍त्‍यांवर खोदकामास पूर्णपणे बंदी घालावी, ज्या रस्त्यांबाबत विहित कालावधीत काम पूर्ण करण्यासंदर्भात अडचणी येत आहेत, अशा रस्त्यांची कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता यांनी बैठकीत रस्तेनिहाय चर्चा केली. त्या संदर्भात समाधानकारक तोडगा, उपाययोजना याविषयी रस्तेनिहाय मार्गदर्शन करण्यात आले. साधारणतः अभियंत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जल अभियंता, मलनिःसारण प्रकल्प या विभागाच्या वाहिन्या, इतर प्राधिकरण, उपयोगिता संस्थांच्या (Utility Agency) वाहिन्या यांमुळे काही प्रमाणात रस्ते कामांना विलंब होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी सदर विभाग, उपयोगिता संस्था यांना कामे पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित करण्यात यावा व रस्ता उर्वरित कालावधीत पूर्ण होईल, याची दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले.

कोणत्याही परिस्थितीत दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत सध्या सुरु असलेले काम पूर्ण करणे अनिवार्य राहील. लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक यांच्याकडून जी माहिती मिळत आहे, त्यानुसार इतर काही समस्या जसे की, बॅरिकेड्सचा अभाव, अस्ताव्यस्त पडलेला राडारोडा (Debris), पर्जन्य जलवाहिन्यांमधील राडारोडा / सिमेंट मिश्रीत पाणी अशा काही तक्रारी आल्या असून त्यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात, महानगरपालिका आयुक्‍त श्री. गगराणी म्हणाले की, वरिष्ठ अभियंत्यांनी रस्ते कामांना भेट देवून आकस्मिक पाहणी करावी. विशेषतः कामे सुरु असताना रात्रीच्यावेळी भेटी द्याव्यात. रेडीमिक्स काँक्रिट प्लांट, प्रत्यक्ष कार्यस्थळ यांना भेटी देवून निरीक्षणे नोंदवावीत. केवळ तांत्रिकदृष्ट्या उपस्थित न राहता सक्रिय सहभाग दर्शवावा. पूर्ण झालेल्या काँक्रिट रस्त्यांवर खोदकामास मनाई आहे, याबाबत मध्यवर्ती संस्था (Central Agency) आणि विभाग कार्यालय (Ward Office) यांनी दक्षता घ्यावी. बांधणी पूर्ण झालेल्या रस्त्यांवर कोणत्याही परिस्थितीत खोदकामास परवानगी दिली जाणार नाही, असे  गगराणी यांनी नमूद केले.

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्त  बांगर म्हणाले की, ज्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे, त्या रस्त्यांना थर्मोप्लास्ट, झेब्रा क्रॉसिंग, कॅट आईज, चौकांमध्ये पिवळ्या थर्मोप्लास्ट रंगाचे ग्रीड बसविणे इत्यादी कामे पूर्ण करावीत, जेणेकरुन त्या रस्त्यांची उपयुक्तता खऱ्या अर्थाने साध्य होईल, तसेच परिसराच्या सौंदर्यात भर पडेल. ७०१ किलोमीटरचे रस्ते हे प्रकल्प रस्ते आहेत. ज्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण पावसाळ्यापूर्वी होणार नाही, अशा रस्त्यांवर खड्डे झाले तर, त्या रस्त्यांवरील खड्डे भरण्याची जबाबदारी प्रकल्प कंत्राटदाराची आहे. त्यासाठी आतापासूनच कंत्राटदारांनी मास्टिक कुकर आदी संयंत्रासह मनुष्यबळाची जुळवाजुळव करावी. पाऊस सुरु होण्यापूर्वी रस्ते वाहतूकयोग्य असावेत, असे निर्देश बांगर यांनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com