मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मुंबई मराठी पत्रकार संघ आणि जागतिक मराठी अकादमी आयोजित सोहळ्यात मराठी कवितेचा जागर करण्यात आला. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, अशोक नायगावकर, महेश केळूसकर, शशिकांत तिरोडकर, संकेत म्हात्रे, प्रथमेश पाठक, जितेंद्र लाड, मंगेश विश्वासराव, भगवान निळे, सदानंद खोपकर, अजय वैद्य आणि प्रसाद मोकाशी यांच्यासह अनेक युवा कवींनी, पत्रकारांनी आपल्या कविता यावेळी सादर केल्या.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. आता या भाषेचा दर्जा टिकविण्याचा वसा आपण उचलला पाहिजे. जागतिक मराठी अकादमीच्या माध्यमातून आम्ही हे काम करीत आलो आहोत. मुंबई मराठी पत्रकार संघानेही त्यात आपले योगदान दिले. हे नाते अधिकाधिक दृढ होईल, असा विश्वास मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. तर भारताबाहेर युरोपमध्ये जागतिक मराठी अकादमी आणि मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे मराठी अधिवेशन भरवता येईल का याचा प्रयत्न करूया, असेही ते म्हणाले.
या भाषा दिनाचे औचित्य साधून मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन तसेच कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर यांच्यावर वर्तमानपत्रात आलेले लेख, त्यांच्या मुलाखतींच्या कात्रणांच्या संग्रहाचे प्रदर्शन यावेळी करण्यात आले. या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन रामदास फुटाणे यांच्या हस्ते करण्यात आले. अशोक नायगावकर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, प्रकाश कुलकर्णी, महेश केळुसकर, राजेंद्र हुंजे, आत्माराम नाटेकर आणि प्रसाद मोकाशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक राजेंद्र हुंजे यांनी तर सोहळ्याचे आभार प्रदर्शन आत्माराम नाटेकर यांनी केले.
0 टिप्पण्या