मुंबईतील गोरेगाव पश्चिमेकडील स्टेलर शाळालगच्या पदपथावर वास्तव्याला असलेल्या कचरा वेचकांवर शाळेच्या खाजगी बाउंसरने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात मातंग समाजातील महिला, पुरुष सफाई कामगार जखमी झाल्याचे समजते. याप्रकरणी लहूजी शक्ती सेनेचे मुंबई अध्यक्ष प्रा.डी.डी.कांबळे यांनी गोरेगाव पोलीस स्टेशनला लेखी तक्रार केली असून सदर बाॅऊसर आणि स्टेलर शाळेतील ट्रस्टीसह इतरांवर अॅट्रोसिटीनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगर, रोड नंबर ५ येथील असलेल्या स्टेलर स्कूल शाळालगत पदपथावर गेल्या २० ते २५ वर्षांपासून मातंग समाजातील २० कुटुंब वास्तव्याला आहेत. त्यांना येथून हद्दपार करण्यासाठी स्टेलर स्कूल शाळेचे ट्रस्टी सांगण्यावरून येथील नागरिकांना सदर जागा सोडून जाण्यासाठी सतत धमकी दिली जात आहे. परंतु ते याठिकाण्याहून जात नसल्याने त्यांच्यावर सुमारे ५० ते ६० खाजगी बाॅऊसनद्वारे मारहाण करण्यात आल्याची तक्रार प्रा.कांबळे यांनी गोरेगाव पोलिस ठाण्यासह मुख्यमंत्री, समाज कल्याण मंत्री आणि अनुसूचीत जाती आयोगाकडे केली आहे. मारहाण झालेल्या नागरिकांमध्ये एक गरोदर महिलासुध्दा होती, तिलाही हात आणि लाथांनी मारण्यात आले आहे. पुरूष बाउंसरने महिलांनासुध्दा मारले आहे. काही महिलांचा विनयभंगसुध्दा या प्रकारात झाला आहे. तसेच लहान मुला-बाळांनासुध्दा सोडण्यात आलेले नाही, त्यांनाही मारहाण करण्यात आल्याचे व्हिडीओ गोरेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांना देण्यात आले आहेत.
मारहाण झालेल्या महिलांनी सांगितले की, ज्या ठिकाणी आम्ही राहत आहोत, त्या ठिकाणी शाळेच्या गाड्या पार्किंग लावण्यासाठी आम्हाला येथून बेघर करण्याचे षडयंत्र सुरु आहे. यासाठी गोरेगाव पोलीस स्टेशन आणि पालिका पी.दक्षिण विभागसुध्दा शाळा प्रशासनाला मदत करत आहे. यामुळे आम्हाला आता कुणी वाली राहिलेला नाही. याकडे सरकारने लक्ष देवून आमचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे.
0 टिप्पण्या