केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका मशीद रेल्वे स्थानकालगत इमारतीत नागरी निवारा केंद्र सुरू करणार आहे. या प्रस्तावित नागरी निवारा केंद्राची महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी आज (दिनांक २८ फेब्रुवारी २०२५) पाहणी केली. तसेच, संबंधितांना आवश्यक ते निर्देश दिले. मुंबई पोर्ट ट्रस्ट (बीपीटी) च्या मालकीची एक इमारत मशीद रेल्वे स्थानकाजवळ आहे. या इमारतीचे रूपांतर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरी निवारा केंद्रात केले जाणार आहे. निवारा नसलेल्या, बेघर नागरिकांना निवासाची निःशुल्क सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. स्वयंसेवी संस्थेतर्फे (एन. जी. ओ.) या नागरी निवारा केंद्राचे संचलन केले जाईल. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (एन. यू. एल. एम.) अंतर्गत विकसित होणाऱया या नागरी केंद्रात सुमारे ४५० ते ५०० नागरिकांना निवारा उपलब्ध होईल, यादृष्टीने नियोजन केले जात आहे.
या पाहणी दौऱयावेळी उप आयुक्त (शिक्षण) तथा संचालक (नियोजन) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, बी विभागाचे सहायक आयुक्त. शंकर भोसले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक . भूषण गगराणी यांनी निर्देश दिले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नागरी निवारा केंद्राची उभारणी करावी. पाणीपुरवठा, सांडपाणी निचरा व्यवस्था, वीजपुरवठा आदींचे योग्य प्रकारे नियोजन करावे.
0 टिप्पण्या