मुंबई महानगरपालिकेच्या एल विभाग हद्दीत असलेली अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली आहे. त्यात अंतर्गत भिंत, अनधिकृत मजले, अनधिकृत बांधकाम यांचा समावेश आहे. हॉटेल्स, विश्रामगृह (डॉर्मेटरी), औद्योगिक परिसरातील बांधकामे यांच्यावर ही निष्कासन कारवाई करण्यात आली. यापुढे देखील ही कारवाई निरंतरपणे सुरू राहणार आहे. महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत, वाढीव बांधकामांवर सातत्याने निष्कासन कार्यवाही सुरू आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक. भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे.
एल विभागात साकीनाका येथील सफेद पूल येथील औद्योगिक परिसरात अनधिकृतपणे उभारलेले हॉटेलसाठीचे वाढीव बांधकाम, अंतर्गत भिंतीचे पाडकाम करण्यात आले. तसेच साकीनाका येथील ९० फूट मार्गावरील दोन विश्रामगृहांचे (डॉर्मेटरी) मजले, साकीनाका (असल्फा मेट्रो स्थानक) येथील १८ खोल्या असलेली इमारत, ४० खोल्या असलेली अनधिकृत हॉटेल इमारत आदींवर निष्कासन कारवाई करण्यात आली. उपआयुक्त (परिमंडळ ५) देविदास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त (एल विभाग) श्री. धनाजी हेर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी ३० कामगार, ३० पोलीस, कार्यकारी अभियंता, सहायक अभियंते, कनिष्ठ अभियंते सहभागी झाले होते. कारवाईसाठी आवश्यक पोकलेन, जेसीबी ही संयंत्रे आणि वाहने पुरविण्यात आली.
0 टिप्पण्या