Top Post Ad

नमस्ते’ योजनेअंतर्गत मुंबईत २ हजार ४८४ स्वच्छता कर्मचाऱ्यांची नोंदणी

*केंद्र शासनाच्या नॅशनल अॅक्शन फॉर मॅकेनाईज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम (नमस्ते) योजनेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यरत २ हजार ४८४ स्वच्छता कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. याच धर्तीवर देशभरातील विविध महानगरपालिकांमध्ये ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी व्यक्त केले आहे.  केंद्र शासनाच्या ‘नमस्ते’ योजनेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षाविषयक उपकरणांचा संच (पीपीई किट) तसेच ‘आयुष्मान कार्ड’चे वितरण भायखळा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात आज (दिनांक २० फेब्रुवारी २०२५) आयोजित सोहळ्यात करण्यात आले. स्वच्छता उद्योजकता योजनेअंतर्गत यांत्रिक स्वच्छता वाहनांच्या खरेदीसाठी अनुदानासह कमी दराने कर्जास पात्र लाभार्थ्यांना तसेच महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वतीने स्वच्छताविषयक उपकरणांच्या खरेदीसाठी कर्जास पात्र लाभार्थ्यांना स्वीकृतीपत्राचे वाटपही यावेळी करण्यात आले. त्यावेळी डॉ. वीरेंद्र कुमार बोलत होते. 


केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाचे सचिव श्री. अमित यादव, वरिष्ठ आर्थिक सल्लागार श्रीमती योगिता स्वरुप, राष्ट्रीय स्वच्छता कर्मचारी आर्थिक व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रभात कुमार सिंग, महाराष्ट्राच्या सामाजिक व न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. लहुराज माळी यांची यावेळी उपस्थिती होती. 

केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार पुढे म्हणाले, स्वच्छता कर्मचारी स्वत:चे जीव धोक्यात घालून ऊन, वारा, पाऊस, थंडी अशा प्रतिकूल परिस्थितींमध्ये स्वच्छतेचे कार्य करत असतात. त्यांनी हे काम केले नाही तर प्रत्येक कुटुंबीयांना त्यांचे घर, परिसर स्वच्छतेसाठी तसेच आरोग्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतील. मात्र, नागरिकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणूनच, देशभरातील अशा स्वच्छता कर्मचाऱ्यांची तसेच सन्मानासाठी केंद्र शासनाच्या वतीने ‘नॅशनल अॅक्शन फॉर मॅकेनाईज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम’ (नमस्ते) ही योजना राबविण्यात येत आहे. मलनि:स्सारण वाहिन्यांमध्ये उतरुन मानवी पद्धतीने स्वच्छता करण्याऐवजी पूर्णत: यांत्रिक पद्धतीने स्वच्छतेचे काम केले जावे. तसेच, स्वच्छता करताना होणाऱ्या मृत्युचे प्रमाण शुन्यावर आणणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण करुन नोंदणी करण्याचे कामकाज हाती घेण्यात आले आहे. त्यांना सुरक्षाविषयक उपकरणांचा संच (पीपीई किट) तसेच ‘आयुष्मान कार्ड’चे वितरण केले जात आहे. आजवर देशभरातील ६५ हजार ६० कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. पैकी ३२ हजार ७३४ कर्मचाऱ्यांना सुरक्षाविषयक उपकरणांचा संच आणि १५ हजार १५३ कर्मचाऱ्यांना ‘आयुष्मान कार्ड’ वितरित करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २ हजार ४८४ स्वच्छता कर्मचाऱ्यांची या योजनेत नोंदणी करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबतीत केलेली कार्यवाही प्रशंसनीय असून याच धर्तीवर देशभरातील महानगरपालिकांनीही कार्य करावे, अशी अपेक्षाही श्री. वीरेंद्र कुमार यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाचे सचिव श्री. अमित यादव यांनी ‘नमस्ते’ योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. 

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी प्रास्ताविकात म्हणाल्या, बृहन्मुंबई महानगरपालिका ही स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध आहे. ‘नमस्ते’ योजनेसाठी महानगरपालिकेच्या २ हजार ४८४ स्वच्छता कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. तसेच महानगरपालिकेच्या मलनि:स्सारण प्रचालन, मलनि:स्सारण प्रकल्प तसेच घनकचरा व्यवस्थापन आदींच्या माध्यमातून स्वच्छताविषयक विविध उपक्रम राबविले जातात. मुंबईमध्ये व्यापक मलनि:स्सारण वाहिनीचे जाळे असून यांत्रिक पद्धतीने स्वच्छता करण्यावर प्रशासनाचा कायमच भर असतो. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपयोगात असलेली स्वच्छताविषयक उपकरणे तसेच वाहनांची मान्यवरांनी पाहणी केली. तसेच, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्यावर व योजनेवर आधारित चित्रफीतही यावेळी दाखविण्यात आली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com