मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा सांगता सोहळा आणि पारितोषिक वितरण समारंभ महापालिकेच्या बल्लाळ सभागृह येथे संपन्न झाला. या निमित्ताने कवी, साहित्यिक प्रवीण दवणे यांचे 'मराठी भाषेचे अभिजात सौंदर्य' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमास ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, जी.जी. गोदेपुरे, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ उपस्थित होते.
मराठी भाषा ही काल परवा निर्माण झालेली नाही ती पूर्वापार चालत आलेली आहे. चंद्र, सूर्य, तारे, वारे समुद्र तशी मराठी त्यामुळे आपली मराठी भाषा ही कधीच नष्ट होवू शकणार नाही. मातृभाषेवर जो निस्सीम प्रेम करतो तो जगातल्या प्रत्येक भाषेवर प्रेम करतो. मुळातच आपल्या रक्तात मिसळलेली, प्राणवायू सारखी दरवळलेली अशी आपली मराठी भाषा असल्याचे प्रतिपादन प्रवीण दवणे यांनी केले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हे आपले भाग्यच.. भाषा केव्हा निर्माण झाली हे आपल्याला सांगता येणार नाही कारण ती प्रक्रिया आहे. भाषा नेमकी केव्हा निर्माण होते त्याचे कँलेडर नाही. मराठीत बोलायचं असते, बोलावं लागतं याची चर्चा पूर्वी नव्हती, पण पुढे काय बिनसलं. भाषेचे सुद्धा मार्केटिंग करता येते हे क्लृप्तीबाजांना कळलं असावं. त्यामुळे जागतिकीकरणाच्या रेट्यात इंग्रजी भाषेचे महत्व वाढत असताना मराठी भाषेचेही तितकंच टोकाचं आहे हे अधोरेखित करण्यासाठी आधीच्या पिढया कमी पडल्याची खंतही दवणे यांनी व्यक्त केली.मराठीतील नामवंत लेखक हे देखील उत्कृष्ट इंग्रजी बोलणारे होते, पण त्यांनी व्यक्त व्हायला मराठी भाषेचे माध्यम वापरले. याचे कारण म्हणजे यंत्रभाषा, तंत्रभाषा म्हणून इंग्रजीचे महत्व ते नाकारत नव्हते, पण व्यक्त होण्यासाठी आईचीची भाषा सोपी वाटायची. आतल्या आत नसा तुटाव्यात, संवेदना विखुरल्या जाव्यात असं सध्या भाषेचे झाले आहे. आताच्या पिढीची भाषा ही त्रिभंगलेली असल्याचे दवणे यांनी नमूद केले. संवर्धन म्हणजे विकास.. 'सं' हा संस्कारतेचा आहे. नुसतं मराठी बोलणे उपयोगी नाही तर मराठी संस्कृतीतील कलाकृतीचा आनंद घेता आला पाहिजे. मराठी भाषा हरवणं म्हणजे जगण्यातील विद्यापीठ हरवणं आहे. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे चांगली मराठी भाषा ही सुद्धा जगण्याची गरज असल्याचे प्रवीण दवणे यांनी नमूद केले. संत, शाहिरांनी अजरामर केलेली मराठी भाषा, भाषेचे अनेक पैलू, अर्थासह उलगडून दाखवले. गद्य, पद्य, विद्राही साहित्यात वापरले जाणारे मराठी शब्द यांचाही उल्लेख त्यांनी केला. मराठी भाषा ही टिकणारच आहे, पुढची मराठी भाषा ही महाराष्ट्रातील बोलीभाषा आणि ग्रामीण भाषा यामुळे जगणार आहे, समृद्ध होणार आहे. भाषेच्या श्रीमंतीत जगायचं असेल तर घराला वाचनाचा चौरंग हवा, भाषा ही सुंदर असून तिच्याकडे जिव्हाळयाने पहा असेही दवणे यांनी उपस्थितांना सांगितले. आपल्या ठाणे जिल्हयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केल्याबद्दल त्यांनी महापालिकेचे कौतुक केले.
भाषेचा अभिजात दर्जा अभिमानाने मिरवूया - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे
दैनंदिन व्यवहारामध्ये मराठी भाषा समृद्ध करण्यामध्ये माझा किती सहभाग आहे, याची जाणीव जरी प्रत्येकाने ठेवली तरी आपली मायमराठी समृद्ध होणार आहे. मराठी भाषेचा पाया हा संत ज्ञानेश्वरांनी घातलेला आहे, त्यामुळे कायमच आपली मराठी भाषा आब राखणारी आहे. त्यामुळे मराठी भाषेला या राज्य सरकारने जो अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, तो आपण अभिमानाने मिरवूया, या प्रक्रियेमध्ये आपला हातभार सातत्याने लावत राहूया, कळत नकळत, जाणीवपूर्वक आपली भाषा अभिजात करुया असे वक्तव्य जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.
विद्यार्थी गटात कविता वाचन स्पर्धेत प्रगती शिर्के, हर्षिता बिडवई, गद्यवाचन स्पर्धेत तनुजा कदम, दिवाकर खांडेकर, कथाकथन स्पर्धेत हार्दिका गांगोडा, तनया म्हात्रे, वक्तृत्व स्पर्धेत वरूण यादव, चिन्मयी करंजकर हे विजेते ठरले. शिक्षक, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्या गटात, निबंध स्पर्धेत मिलिंद पाटील, डॉ. मुयरी नवथळे, शुभांगी केसवानी, चित्रा पाटसुते, नीता नवले, अमेय कुंभार, माधुरी बागडे, श्रुती सावंत, वर्षा पाटोळे हे विजेते ठरले. शुद्धलेखन स्पर्धेत डॉ. माधवी देवल, डॉ. प्रियांका माळी, प्रशांत म्हात्रे, चित्रा पोळेकर, संध्या नारकर, गोविंद सारंग, गजानन निवळे, वैदेही पाताडे, हर्षाली देसाई हे विजेते ठरले. सुलेखन स्पर्धेत प्रशांत म्हात्रे, डॉ. स्वप्नाली पाडळकर, डॉ. मिताली संचेती, गजानन राऊळ, सागर ढोकरे, प्रफुल्ल गावडे, प्रिया वाळके, महेंद्र कदम, अविनाश दळवी हे विजेते ठरले. तर, वक्तृत्व स्पर्धेत शिवाजी ढगे, पल्लवी मंडलिक, सोपान जाधव हे विजेते ठरले.
0 टिप्पण्या