प्रस्थापित व्यवस्थेला जाब विचारणारे आणि समस्त मानव समाजाच्या कल्याणाचा विचार मांडणारे साहित्य म्हणजे आंबेडकरी साहित्य होय. दिशा, प्रबोधन, मानवी मूल्य आंबेडकरी साहित्यात आहेत. तेव्हा जागतिकीकरणाच्या काळात डॉ. आंबेडकरांचा मानवी मूल्यांचा विचार हा अतिशय महत्त्वाचा व निर्णायक ठरणार आहे, असे मत उद्घाटक डॉ. प्रदीप आगलावे यांनी येथे व्यक्त केले.lप्रज्ञाबोधी साहित्य अकादमी, ठाणे व महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथे राज्यस्तरीय आंबेडकर साहित्य संमेलन कल्याण येथील बुद्धभूमी, अशोक नगर फाऊंडेशन येथे रविवारी संपन्न झाले. यावेळी डॉ. बालचंद्र खांडेकर साहित्य नगरीतील संमेलनाचे उद्घाटन करताना डॉ.आगलावे बोलत होते.
यावेळी आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक निरंजन पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषण केले. डॉ आंबेडकर यांनी आखून दिलेल्या सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनाच्या नव्या दिशेने जाण्यास उपेक्षितांच्या जीवनाची मानसिकता घडविण्याचे कार्य आंबेडकरी साहित्य करते. जे साहित्य चळवळ मूल्याधीष्ठित नैतिक तत्त्वाने संस्कारित होते. तिलाच भविष्य असते. ज्या साहित्याला चळवळीची पार्श्वभूमी आणि मानवी विचारांची धार असेल तेच साहित्य प्रभावी ठरते असेही ते म्हणाले.
यावेळी प्रमुख पाहुणे आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ म्हणाले की, समाजाचे अंतरंग साहित्यात उमटत असतात. इतकेच नव्हे तर साहित्याचा प्रभाव समाजावर पडतो. अशाप्रकारे साहित्य आणि समाज यांचा परस्पर संबंध आहे.या संमेलनात बुद्धभूमी फाउंडेशनचे प्रमुख भदंत गौतमरत्न महाथेरो आणि मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत डॉ. चंद्रशेखर भारती यांनी केले. प्रास्ताविक प्रा. युवराज मेश्राम आणि संचालन शुभांगी भोसले यांनी केले. संमेलन यशस्वी करण्यासाठी राजेंद्र पवार, उमेश गोटे इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या