पंढरीनाथ सावंत शिष्यवृत्ती’ सुरू करणार
चतुरस्र पत्रकार असलेले मार्मिकचे दिवंगत माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अभ्यासू पत्रकारांसाठी 'पंढरीनाथ सावंत शिष्यवृत्ती' सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी केली.ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत आणि क्रीडा पत्रकार आणि क्रीडा स्तंभलेखक द्वारकानाथ संझगिरी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी सोमवारी सायंकाळी मुंबई मराठी पत्रकार संघातर्पेâ संघाच्या लोकमान्य सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संदीप चव्हाण बोलत होते. याप्रसंगी मान्यवर पत्रकारांनी या दोन्ही पत्रकारांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांनी पत्रकार म्हणून केलेल्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
संदीप चव्हाण पुढे म्हणाले, 'पंढरीनाथ सावंत शिष्यवृत्ती सुरू करण्याचा ठराव संघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मांडून तो सुरू करण्यात येईल. याशिवाय पत्रकारितेत उल्लेखनीय ठसा उमटवणार्या पत्रकारांचे लेखन हे नव्या पिढीच्या पत्रकारांसमोर उभे राहावे यासाठी दिल्लीत होणार्या साहित्य संम्मेलनात 'वॉल ऑफ रिपोर्टर्स' उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळेस ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी, शिवनेरचे संपादक नरेंद्र वाबळे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रसाद मोकाशी, मावळ मराठाचे संपादक सदानंद खोपकर, हेमंत सामंत, मुंबई मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त देवदास मटाले, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, 'सामना'चे विशेष प्रतिनिधी देवेंद्र भोगले, छायाचित्रकार विजय तारी, पंढरीनाथ सावंत यांच्या स्नुषा सौ. श्वेता श्रीनिवास सावंत यांच्यासह विविध वृत्तपत्रे, चॅनल्सचे पत्रकार मोठ्या संख्येने पंढरीनाथ सावंत, द्वारकानाथ संझगिरी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होते.पंढरीनाथ सावंत हे प्रलोभने लाथाडणारे पत्रकार होते. बाळासाहेब ठाकरेंच्या अतिशय विश्वासातील हे व्यक्तिमत्त्व होते. यामुळे त्यांना खूप काही मिळवता आले असते. परंतु ते कटाक्षाने प्रलोभनांपासून दूर राहिले, यामुळेच ते अवलिया पत्रकार होते, अशा शब्दात ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी यांनी पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना श्रध्दांजली अर्पण केली.
नरेंद्र वाबळे म्हणाले, पंढरीनाथ सावंत, द्वारकानाथ संझगिरी यांनी मराठी पत्रकारितेत दिलेले योगदान हे न विसरता येण्याजोगे आहे. पत्रकारितेला दिशा देण्याचे काम या दोघांनी केले.
उत्कृष्ट आदर्श पत्रकारांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वॉल ऑफ रिपोर्टर्स मुंबई मराठी पत्रकार संघाने सुरू करून त्यांच्या स्मृती जतन कराव्यात, हीच पंढरीनाथ सावंत, द्वारकानाथ संझगिरी यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असे ज्येष्ठ पत्रकार सदानंद खोपकर म्हणाले. प्रत्यक्ष घटनास्थळी, ग्राऊंडवर जाऊन वृत्तपत्र लेखन कसे करावे, याचा आदर्श म्हणजे पंढरीनाथ सावंत, द्वारकानाथ संझगिरी होते. अशा भावना यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी यांनी व्यक्त केल्या.
0 टिप्पण्या