मेजॉरिटीची मौनी ममता' हा अग्रलेख आणि वर्तमानपत्रातील कुंभमेळ्यात झालेल्या चेंजराचेंगारी संबंधीच्या बातम्या वाचल्या. १९५४ साली नेहरू पंतप्रधान असताना कुंभमेळ्यात अशीच दुर्घटना झाली होती, त्याचा दोष नेहरुंवर टाकण्यासाठी मोदींनी एका निवडणुकीत जोरदार भाषण केले होते. त्यात कुंभमेळ्यात हजारो भाविकांच्या मृत्यूनंतरही नेहरूंनी बातम्यांची कशी दडपादडपी केली होती. नेहरूंचे अंकित असलेल्या त्यावेळच्या माध्यमांनीसुद्धा बातम्या देणे कसे टाळले होते, याचे रसभरीत वर्णन केले आणि निवडणुकीत येनकेन प्रकारेण यश मिळवण्याच्या उद्देशाने लोकांमध्ये काँग्रेस द्वेष वाढेल याची तजवीज केली.
पण मोदी महाशय हे विसरतात की, त्याकाळी सीसी कॅमेरे नव्हते, सॅटॅलाइट टीव्ही नव्हते, ड्रोनही नव्हते आणि कुंभमेळासुद्धा एवढा मोठा नव्हता. तरीही नेहरूंनी ताबडतोबीने मृतांच्या नातेवाईकांना भेटून त्यांची सांत्वना केली होती. मोदी ज्याचे कौतुक करतात त्या आजच्या कुंभमेळ्यात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते आहे. लोकांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक सोयी उपलब्ध आहेत. तरीही या कोटीच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या लोकांची संख्या आणि आर्थिक उलाढालीच्या कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर तेच मोदी आज मौनी अमावस्येला घटना घडल्यावर मौनात जातात. या दुर्घटनेतील मृतांचे खरे आकडे लपवण्याची त्यांच्यावर वेळ आलेली आहे. नेहरूंच्या नावाने बोटे मोडत त्यांनी जे भाषण केले आहे तेच आज त्यांच्यावर उलटत तंतोतंत खरे ठरत आहे.
मोदी काय किंवा योगी काय, या कोणीही अजूनही मृतांच्या आप्तेष्टांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केल्याची बातमी नाही. मोदींचे हुजरे तर म्हणत आहे की, अशा मोठ्या इव्हेंटमध्ये चेंगराचेंगरीसारख्या छोट्याछोट्या घटना घडतच असतात. त्यात विशेष ते काय? म्हणजे मेलेल्या माणसांच्या बद्दल यांची ही संवेदनाशीलता! हा तर असवेदनाशीलतेचा कळसच झाला. या कुंभमेळ्यात व्हीआयपी लोकांसाठी कडेकोट बंदोबस्त, तर सामान्य माणसांसाठी पूर्ण बजबजपुरी आणि अव्यवस्था!! अशा या कुंभमेळ्याचे बाजारीकरण करून याचा इव्हेंट करणाऱ्या मोदींना याची लाज वाटेल काय?
प्रा.चद्रभान आझाद
0 टिप्पण्या