भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त रिपाईच्या वतीने बदलापुरात भारतीय संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाध्यक्ष मा. राजाराम खरात यांच्या नेतृत्वात श्रीकॉम्प्लेक्स, बेलवली, बदलापूर (प) येथून संविधान सन्मान रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. तेथून संविधानाचा जयघोष करीत सदर रॅली बदलापूर एसटी बस स्थानक जवळ शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार घालून. शिवरायांना वंदन करण्यात आले. त्यानंतर सदर सन्मान रॅली बाजारपेठ मार्गाने संविधानाचा जयघोष करीत तसेच संविधानाचा जागर करीत संविधान स्मारक रमेशवाडी येथे पोहोचली, सदर ठिकाणी शाहीर अशोक कांबळे, तसेच शाहीर वाघमारे, मानेश जाधव व शाहीर बनसोडे यांनी त्यांच्या भारदस्त आवाजात संविधान पर गीते तसेच भीम गीते सादर केली. तसेच यावेळी सभेचे देखील आयोजन करण्यात आले होते, सदर सभेच्या अध्यक्षस्थानी अशोक गजरमल होते.. सतीश देशमुख यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या,
त्यानंतर राष्टवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र सरचिटणीस मा. हेमंत रुमणे यांनी सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत या संविधान सन्मान रॅलीला संबोधित केले. या संविधान सन्मान रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अविनाश देशमुख , पत्रकार निलेश पवार, अभिजीत सकट , प्रिया गायकवाड, वंदना भगत यांनी उपस्थित राहून सर्वाना शुभेच्छा दिल्या. तसेच प्रा. अनिल भालेराव यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व जनतेला शुभेच्छा व्यक्त करताना म्हटले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय परिश्रमपूर्वक या संविधानाची निर्मिती केलेली आहे आणि अतिशय उत्कृष्ट असे हे संविधान आपल्या देशाप्रती अर्पित केले आहे.त्यानंतर सदर कार्यक्रमाकरिता निमंत्रित करण्यात आलेले प्रमुख व्याख्याते एड. किशोर कांबळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, व न्याय ही मूल्ये विचारात घेऊन संविधानाची निर्मिती केली आहे. परंतु, या संविधानाची अंमलबजावणी योग्य रीतीने होणे गरजेचे आहे. याकरिता, जनतेने जागरूक राहून त्याबाबत सतर्कता दाखवणे आवश्यक आहे. त्यानंतर मिलिंद सकपाळ यांनी आपले भाषण करीत असताना उत्कर्ष सेवा मंडळाचे सर्व सदस्य व सहकारी यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले, तसेच त्यांचे आभार व्यक्त केले.
त्यानंतर एड. गजानन लासुरे हे आपल्या भाषणाच्या वेळी म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय परिश्रम पूर्वक या संविधानाची निर्मिती केली आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी करणारे लोक जर चांगल्या मनोवृत्तीचे नसतील तर, त्याची अंमलबजावणी योग्य रीतीने होणार नाही आणि त्याचा प्रत्यय सध्याच्या परिस्थितीमध्ये येत आहे. संविधान आपण रोज वाचले पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, ते समजून घेतले पाहिजे, तसेच संविधानाची अंमलबजावणी योग्य रीतीने होते की नाही यावर नजर ठेवणे गरजेचे आहे. तसेच ते पुढे म्हणाले की ज्या-ज्या वेळी अमेरिका यासारख्या देशांमध्ये काही समस्या निर्माण होतात त्या- त्या वेळी भारतीय संविधानाचा आधार घेतला जातो. त्याचा संदर्भ घेतला जातो, यावरून भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित होते.
या कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.के.) पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, महिला मंडळ, युवा उपस्थित होते. सदर कार्यक्रमात संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले, तसेच सर्व उपस्थित नागरिकांना अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्वप्निल शिर्के (भाऊ) व प्रसेनजीत सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली,
0 टिप्पण्या