धनंजय मुंडेंचा राजीनामा आरोप सिद्ध होईपर्यंत घेणार नाही हे अजितदादांचं विधान अत्यंत अनैतिक आहे. गुन्हा सिद्ध झाला तर नैतिक राजीनामा घेऊन तुम्ही लोकशाहीवर असा कोणता उपकार करणार? गुन्हा सिद्धच झाला तर कायद्यानं राजीनामा द्यावाच लागेल. लाल बहादूर शास्त्रींचं सोडा. त्यांचं नाव पण घेण्याची लायकी आजच्या राजकीय व्यवस्थेची नाही पण या महाराष्ट्रात काय कमी उदाहरणं आहेत? बॅ. अब्दुल रहेमान अंतुले (मुख्यमंत्री) यांच्यावर सिमेंट घोटाळ्याचा आरोप झाल्याबरोबर त्यांनी राजीनामा दिला. त्यांचा गुन्हा सिद्ध झाला होता का? बॅ. रामराव आदिकांवर (उपमुख्यमंत्री) एअर होस्टेसची छेडखानी केल्याचा आरोप झाला, त्यांनी राजीनामा दिला. गुन्हा सिद्ध झाला होता का? शिवाजीराव पाटील निलंगेकर (मुख्यमंत्री) यांच्यावर मुलीचे गुण परिक्षेत वाढवल्याचा आरोप झाला, त्यांनी राजीनामा दिला. गुन्हा सिद्ध झाला होता का? मनोहर जोशी (मुख्यमंत्री) यांच्या जावयाचं बांधकाम प्रकरण उजेडात आलं, त्यांनी राजीनामा दिला. त्यांचा गुन्हा सिद्ध झाला होता का? अगदी अलिकडे अशोकराव चव्हाण (मुख्यमंत्री) यांच्यावर आदर्शमध्ये आरोप झाला. त्यांनी राजीनामा दिला. गुन्हा सिद्ध झाला होता का? बबनराव घोलप, महादेव शिवणकर, शशिकांत सुतार, सुरेशदादा जैन यांनी आरोप झाल्यावर मंत्रीपदाचे राजीनामे दिले. त्यांचे गुन्हे सिद्ध झाले होते का? कधी? तेलगी प्रकरणी आरोप झाल्यावर भुजबळांना राजीनामा द्यावा लागला होता. गुन्हा सिद्ध झाला होता का?अगदी अलिकडे मविआ सरकारमधून अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध झाला होता का?
0 टिप्पण्या