Top Post Ad

निवडणूक आयोग विरोधात ठाणे काँग्रेसचे निषेध आंदोलन

   नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या कृत्यांविरोधात, लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कार्यालयाच्या ठिकाणी आज शनिवारी तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. 25 जानावारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार  ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष अॅड. विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश कार्याध्यक्ष मो. नसीम खान, प्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्मा आदींच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करत हे निषेध आंदोलन करण्यात आले. यात हिंदूराव गळवे, राहुल पिंगळे यांच्यासह सर्व प्रदेश पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, महिला काँग्रेस पदाधिकारी, युवक काँग्रेस पदाधिकारी, सर्व प्रभाग अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष आणि सर्व काँग्रेस कार्यकर्ते या आंदोलनात सहभाग झाले होते.

महाराष्ट्रात नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि निवडणुकीचे निकाल पाहता ते अनाकलनीय, आश्चर्यकारक, अविश्वसनीय व काहीतरी गडबड असल्याचे दिसले. राज्यातील राजकीय परिस्थिती ही सत्ताधारी भाजपा युतीच्या विरोधात होती. सहा महिन्यापूर्वीच लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पानिपत झाले होते व महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते, अवघ्या सहा महिन्यात हे चित्र पूर्णपणे पालटले जाऊ शकते यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. मतदारयाद्यांमध्ये घोटाळा करण्यात आला, याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करुनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, त्यानंतर निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्याच्या अंतरात तब्बल 50 लाख मतांची वाढ कशी झाली? मतदानादिवशी संध्याकाळी 5 वाजता जाहिर केलेली मतदानाची टक्केवारी व निवडणूक आयोगाने दुसऱया दिवशी सकाळी जाहीर केलेली टक्केवारी यातमध्ये मोठी तफावत आहे. यातही 76 लाख मतदान वाढलेले दाखवले आहे. सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेल्यांची व्यवस्था होती. त्यामुळे मतदारयाद्यातील घोळ, रात्रीच्या अंधारात वाढलेले 76 लाख मतदान याचे पुरावे निवडणूक आयोगाने द्यावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली असता आजपर्यंत ही माहिती देण्यात आलेली नाही.  

25 जानेवारी हा 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून साजरा केला जात आहे. या दिवसाचे औचित्य साधून काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभाराचा पर्दापाश करत आहे. निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा न करता निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेण्याचे आपले कर्तव्य पार पाडावे तसेच लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांचा आदर, सन्मान तसेच विश्वास कायम ठेवून विश्वासार्हता अबाधित राहिल याकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे अशी विनंती यावेळी करण्यात आली. यानंतर काँग्रेस कार्यालयात. प्रदेश कार्याध्यक्ष मो. नसीम खान यांनी   पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, निवडणुका या निष्पक्षपाती व पारदर्शकपणे घेणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्यच आहे, ही संवैधानिक संस्था स्वायत्त आहे पण मोदी सरकारने सर्वच संवैधानिक संस्थामध्ये हस्तक्षेप केला आहे. सध्याचे निवडणूक आयुक्त राजीवकुमार हे भाजपाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या निष्पक्षपातीपणे व पारदर्शकपणे झालेल्या नाहीत असा आरोप केला. लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान व त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यात घोटाळा करण्यात आला असे सांगून निवडणूक आयोगाचा कारभार संशयास्पद असल्याचे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com