Top Post Ad

जगाला चिरंतन प्रेरणा देणाऱ्या गांधीजींचा शोध : ‘महात्मा गांधी आणि जग’

 भारतासारख्या लोकशाही देशात आज हिंसा मोठ्या प्रमाणावर होत आहेत. देशातील अनेक नेत्यांचे वर्तन बिघडले आहे.  खोटेपणा,मुजोरपणा ,फसवणूक ,अत्याचार, अहंभावना ,सरकारी संपत्तीची लुट, स्त्री वर होणारे अत्याचार, ढोंगीपणा,धार्मिक उन्माद, दंगली, अपहरण ,हिंसक हत्यारांचा होणारा वापर, बुवाबाजी, निवडणुकीतील   अनैतिकता ,प्रलोभनानी केलेला नैतिक ऱ्हास  इत्यादीमुळे  वातावरण गढूळ झालेले आहे.  अशावेळी आजही गांधीजी यांच्या विचार व आचार यांची देशाला गरज जाणवत आहे. भारतातील तथागत बुद्ध, महात्मा गांधी यांचे अहिंसा विचार आजच्या काळात आवश्यक आहेत. कायद्याचे राज्य चालवण्याची जबाबदारी घेतलेले लोक हेच जर आपल्याच लोकांचे शोषण करून वर धाक दाखवून नेते होत असतील तर परिस्थिती गंभीर आहे. संवाद व्यवहार हा विचाराने झाला पाहिजे पण विचाराऐवजी हत्यार दाखवून इतरांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबून टाकण्याचा प्रयत्न देशातील अनेक घटनात झालेला आहे.   

   या पार्श्वभूमीवर देशात आदर्श मुले ,आदर्श तरुण,लोकशाही मुल्यांचा आदर करणारे व जबाबदारी घेऊन देश चालविणारे तरुण घडविण्याची आवश्यकता जास्त प्रमाणात जाणवत आहे. अशा वेळी शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या या मुलांना आपला अहिंसेचा वारसा ,लोकशाहीचा वारसा,सहिष्णुतेचा वारसा, बुद्धीप्रामाण्यवादी, वारसा आवर्जून शिकविण्याची गरज आहे.  ज्यांच्या नैतिक व अहिंसावादी चळवळीने देशाला स्वातंत्र्य मिळाले  अशा महात्मा गांधी यांना अनेकदा इथल्या धर्मांध प्रवृत्तीने दूर करण्याचा प्रयत्न केला तरी गांधीजी मरत नाहीत,मरणार नाहीत. गांधीजींच्या  विचारात माणसे जोडण्याची,हिटलरी प्रवृत्तीविरुद्ध अहिंसा मार्गाने एकत्र येऊन न्यायासाठी स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह करण्याची, आपले आचरण चांगले ठेवण्याची ,खेड्यातील उद्योगी संस्कृतीला किंमत देण्याची, आपल्या मातीचा आदर करण्याची, जी शक्ती आहे ते त्यांचे वेगळेपण आहे. संस्कृती जतनात ‘ ईश्वर जन जो तेणे कहिये जो पीड.पराई जाने रे’ हे आवश्यक आहे. ईश्वराचे खोटे स्तोम निर्माण करून वाद निर्माण करण्यापेक्षा गांधीजी हिंसक गोष्टीना विरोध करतात. आज कट्टा ,घोडा ,पिस्तुले ,आणि खून हे भारतातील माध्यमांची चर्चा झाली आहे. अहिंसा विचार घेऊन सुख समाधानाने रहावे .एकमेकाला सुख द्यावे असे शिकविणाऱ्या या देशात उन्माद संस्कृती पिढ्या बिघडवत आहेत. 

या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य मिळाले तरी  गांधीजीनी  सत्तेची कोणतेही पदे न स्वीकारता जे अहिंसा,एकोपा देशाला आवश्यक आहे.हे आयुष्यभर सांगितले. केवळ भारताचे नेते नाहीत तर जगातल्या अनेक नेत्यांची प्रेरणा आहेत,ती का आहेत, हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळेच गांधीजी यांची जगभरात काय ख्याती होती, गांधीजीनी अनेकांची मने चांगुलपणाकडे कशी नेली, देश फुटत असताना देखील हिंदू मुस्लीम  ऐक्य यासाठी कसे प्रयत्न केले, कृष्णवर्णीय लोकांच्यावर होणारे अत्याचार ,व त्यांचे  राज्यकर्त्यांचे अमानवी कायदे स्वातंत्र्य कसे हिरावून घेतात ,शेवटच्या माणसापर्यंत स्वातंत्र्याचा प्रकाश पोचला पाहिजे हा विचार जगात कसा पोचला हे शोधून देणारे  एक पुस्तक गांधीवादी  उल्हासदादा पवार यांनी लिहिलेले आहे ‘महात्मा गांधी आणि जग. हा ग्रंथ   पुणे येथील तनया -ईशां प्रकाशन पुणे यानी ८ ऑगस्ट २०२२ रोजी प्रकाशित केला आहे. सदर ग्रंथ १४० पेजेसचा असून आर्ट पेपरवर  रंगीत छपाई करण्यात आलेली आहे. ग्रंथाचे मुखपृष्ठावर गांधीजी  यांचा हसरा असा चांगला फोटो घेतलेला आहे. सदर ग्रंथ वाचल्यानंतर जाणवले की ग्रंथशीर्षक सार्थ ठरवणारा असा हा ग्रंथ आहे. 

          महात्मा गांधीजी यांचा प्रभाव जगभरात कसा पडलेला आहे याची उपयुक्त माहिती देणारा हा ग्रंथ असून आवश्यक तेथे सचित्र फोटो घेतलेले आहेत. सदर ग्रंथ देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना समर्पित करण्यात आलेला आहे. जेष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हासदादा पवार हे लेखक असल्याने त्यांनी जगभरातील गांधीजी यांचा प्रभावाचे शोधन केले आहे. महात्मा गांधी यांचे जीवनातील महत्वाच्या  घडामोडीशी निगडीत चिंतन ,त्यांच्या जीवनाशी निगडीत अनेक संदर्भांची अतिशय सोप्या व ओघवत्या भाषेत मांडणी केल्याने वाचकांना खिळवून ठेवत,जिज्ञासा तृप्त करीत अगदी अखेरच्या पानापर्यंत वाचावासा वाटणारा हा ग्रंथ आहे. महात्मा गांधी एक नीतिमान,शांतीप्रिय तरीही ,स्वातंत्र्याचे हक्क सर्वाना मिळावेत म्हणून अहिंसेच्या मार्गाने सत्याग्रह करणारे नेते होते. त्यांचा विचार गौतम बुद्ध यांच्याप्रमाणेच जगाच्या हितासाठी आवश्यक आहे. म्हणूनच गांधीजी यांचा मूल्य विचार जगातील अनेक देशांनी स्वीकारला.त्यांचे पुतळे जगभर दिसतात. जगातील सर्व संग्रहालयात गांधीजी यांची नोंद घेतली आहे.अमेरिका,इंग्लंड,जर्मनी,दक्षिण आफ्रिका या देशातील अनेक नेत्यांनी मानवतेसाठी  गांधीजी हेच कसे उपयुक्त आहेत हे दाखवून दिले आहे..या बाबतची जगभरातील माहिती लेखकाने सोप्या भाषेत दिलेली आहे.

डॉ.सदानंद मोरे यांची प्रस्तावना या ग्रंथास असल्याने या ग्रंथाची यथोचित ओळख त्यांनी करून दिली आहे. युनोने २ ऑक्टोबर हा गांधी जयंती दिवस हा ‘अहिंसा दिवस ‘ म्हणून जाहीर केला. जगातील लेखक, नेते, महिला ,वंचित घटक ,युवा शक्ती, संशोधक ,शिक्षण तज्ञ यांना गांधीजी प्रेरणादायक आहेतच., हो मी चिन्ह ,नेल्सन मंडेला ,मार्टिन ल्युथर किंग ,बराक ओबामा , जोसेफ बायडन हे गांधीजींचे ऋण कसे मान्य करतात, अल्बर्ट आईन स्टाईन ,सर बर्नाड शो,रोमन रोलंड ,यांच्या मनात गांधीजी बद्दल आदर का? महिलांनी देखील सत्याग्रह का करावा, कोणतेही काम वाईट नसते,घरातल्या कामात मदत करणारे गांधी,स्त्री स्वातंत्र्याचा आदर करणारे गांधी, सशस्त्र क्रांतीला विरोध करणारे गांधी, ‘चले जाव’ या दोन शब्दांनी सारा देश जागृत करणारे गांधी, स्वातंत्र्य मिळाले तरी त्याच्या आनंदात मश्गुल न होता माणसात सद्भावना राहावी म्हणून प्रयत्न करणारे गांधी, अरुणा आसफ अली यांचे योग्य शब्दांनी मन परिवर्तन करणारे गांधी, देशाला जागतिक पातळीवर दूरदृष्टी देणारे गांधीजी, दोन महायुद्धे झाली तरी अहिंसेचा पुरस्कार करून जगात शास्वत राहिलेले गांधी, जगातील अनेक विद्यापीठात अभ्यासक्रमाचा विषय झालेले गांधी ,आजही  दहशतवाद व अफू यांची  विक्री  करून  आतंकवादी अफगानिस्तानसारख्या देशात गांधीजी यांचे गीत गाणारे पाचशे विद्यार्थी, 

गांधीजी याना  गुरु मानणारे,बांगला देश स्वातंत्र्यासाठी लढा देणारे मुजीबर रहमान .जागतिक युवा महोत्सवात युवाशक्तीला भावलेले व्यक्तिमत्व गांधीजी, रशिया आणि चीनसारख्या कम्युनिष्ट देशात  पुतळा स्वरुपात उभा असलेले अहिंसक गांधीजी, जगावर ज्यांनी युद्ध लादले अशा इटली आणि जर्मनी या दोन्ही देशांनी आज केलेला गांधीजींच्या अहिंसेचा गौरव,पोस्टाच्या  तिकिटात स्टँप रूपाने विविध देशात पोचलेले गांधी, भारतच सदैव अहिंसेचा पुरस्कार करू शकतो या विषयी जगाला वाटणारे अप्रूप, भव्य ग्रंथालयातून गांधीजीच्या ग्रंथाचे होणारे वाचन, गांधीजीच्या कार्याचा जगातील सामान्यातील सामान्य लोकावर झालेला पडलेला प्रभाव, गांधीजींच्या मुळे कृषी,उद्योग या क्षेत्रात जगात झालेले बदल, त्यांचे चारित्र्य ,व्यक्तिमत्व याचा प्रभाव पडून जगातील अनेक नेत्यांनी स्वतः ला ‘गांधी’ म्हणून घेणे , नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसुफजाई  तसेच कैलास सत्यगिरी यांना हिंसाचार विरुद्धच्या लढ्यात अहिंसेचे महत्व पटवून दिल्याने आलेले महत्व, अहिंसेचा अर्थ अजून कळत नसेल पण हिंसेचा अनर्थ कळून चुकलाय या बाबतची मते, इत्यादी एक नव्हे अनेक बाबी या ग्रंथात अतिशय सोप्या शब्दात वाचनीय अशा झाल्या आहेत. म्हणूनच हा ग्रंथ केवळ ग्रंथ नसून गांधीजी यांच्या मुल्य विचारांचे ,नैतिकतेचे ,दृष्टीकोणाचे,आचाराचे,जगावर पडलेले प्रतिबिंब आहे. असा हा ग्रंथ  सर्व शिक्षक,सर्व विद्यार्थी ,सर्व पालक ,भारतीय नागरिक यांना  उपयुक्त आहे. त्यामुळे किरकोळ एकदोन शब्द काही ठिकाणी शुद्ध स्वरुपात नसले तरी आशय आणि विवेचन या अंगाने पाहता हा ग्रंथ  आपले वेगळेपण सिद्ध करतो. 

जगाला चिरंतन प्रेरणा देणारया  महात्मा गांधीजींचा  शोध नव्याने ‘महात्मा गांधी आणि जग’ या ग्रंथात घेतला आहे. गांधीजीपेक्षा धर्मासाठी लढणारे विषमतावादी  हेच कसे श्रेष्ठ  होते  अशी सांगणारी अनेक पुस्तके बाजारात आणून ,किंवा समाजमाध्यमात गांधीजी यांना  कमी लेखून,हिंसेचे,भेदाचे तत्वज्ञान पुस्तकात आणून  जाणीवेने विद्यार्थ्यांच्या मनात द्वेषबीजे भरणाऱ्या पुस्तकापेक्षा ही अशी पुस्तके भारतीयांना अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहेत. कुठे साधे राहून देश जागृत  करणारे,सत्य आणि अहिंसा मार्ग घेऊन माणसांचा द्वेष न करता प्रवृत्तीचा द्वेष करणारे  निर्मळ गांधीजी आणि कुठे अनैतिक वागून, देशाची जमीन ,धनसंपत्ती  आपलीच म्हणून उपभोगणारे, जनतेला धमकवणारे, हुकुमशाही वर्तन करणारे,सतत थापा मारणारे नेते? शील बिघडलेल्या या काळात भारतीयत्व,सहिष्णुता,अहिंसा,साधन शुचिता, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी देखील नैतिक अहिंसक मार्ग निवडणारे गांधीजी हे देशाचा नव्हे तर जगाचा मानदंड कसे होते, जगाला त्यांच्यापासून काय प्रेरणा मिळाल्यात हे वाचण्यासाठी ‘महात्मा गांधी आणि जग’ हा ग्रंथ आपल्या प्रत्येकाच्या घरी असायला हवा. सर्वांनी तो वाचायला हवा.

 जगाला चिरंतन प्रेरणा देणाऱ्या गांधीजींचा  शोध  : ‘महात्मा गांधी आणि जग’ - 
प्रा.डॉ.सुभाष वाघमारे  ९८९०७२६४४० 
( मराठी विभाग प्रमुख, छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा )  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com