: परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे यांच्या मृत्यूप्रकरणी, तर बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी परभणीतून निघालेला लाँग मार्च लवकरच मुंबईत धडकणार असून या मोर्चाची मुंबईत ठिकठिकाणी तयारी करण्यात येत आहे. मुंबईतील आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या वरळीमध्ये मंगळवार, २१ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे व संघटनांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.परभणीत संविधानाची विटंबना झाल्यानंतर त्याचेपडसाद उमटल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अनेक तरुणांची धरपकड करण्यात येत होती. या घटनेचे चित्रीकरण करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाला पोलिसांनी अटक करून जेलमध्ये टाकले होते. यावेळी त्याला करण्यात आलेल्या मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाला. तर आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे हे हिंसाचार थांबवत असताना त्यांचाही हृदयविकाराने मृत्यू झाला. या मृत्यूप्रकरणी सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांसह विविध पक्ष संघटनांनी परभणी ते मुंबई असा लाँग मार्च आयोजित. केला आहे. हा लाँग मार्च लवकरच मुंबईतील मंत्रालयावर धडकणार आहे. त्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून बैठका घेतल्या जात आहेत. यासंदर्भात मंगळवारी सायंकाळी ७ वाजता वरळी नाका येथील पंचशील नगर सभागृहात सर्वपक्षीय संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत लाँग मार्चमध्ये सहभागी झालेल्या मोर्चेकऱ्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था व इतर आवश्यक बाबींवर चर्चा केली जाणार आहे.
0 टिप्पण्या