Top Post Ad

अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीची तिसरी सम्यक साहित्य कला संगीती

अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीची तिसरी सम्यक साहित्य कला संगीती महाड येथील गोपाळ बाबा वलंकर साहित्य नगरी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे संपन्न होत आहे. दोन दिवसीय या संगीतीचे उद्घाटन ज्येष्ठ नाटककार व लेखक विचारवंत प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते झाले. तिसऱ्या सम्यक साहित्य कला संगीतिचे अध्यक्ष प्रा. आनंद देवडेकर यांनी भूषविले. यावेळी अपरान्त प्रबोधिनीचे अध्यक्ष ज.व्ही. पवार, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद टिपणीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

आपल्या उद्घाटनपर भाषणात गज्वी म्हणाले, १९५६ साली बौद्ध झालेल्या साहित्यिकांच्या साहित्याला १९६७ साली दलित साहित्य म्हणावे असे ठरते, माझ्या दृष्टीने हे एक मोठे गट कारस्थान होते. धर्मांतरितांना बौद्ध वाङ्मयातून, संस्कार आणि इतिहासातून दूर ठेवण्याचे दुष्ट लोकांचे हेतू सफल झालेले दिसतात. कला ही कुणाची बटिक नसते आणि बटीक असते ती कला नसते. आज मराठी साहित्यात मनोरंजनाचे फड का बहरतात ?, असा सवाल ही त्यांनी यावेळी केला.
  मराठी साहित्य व्यक्ती विरुद्ध व्यक्ती या एकाच सूत्रात रचले जाते. त्यामुळे मराठी परंपरा सांगते ६४ कला मध्ये चोरी करणे यालाही कला मानले जाते. मराठी साहित्याच्या साडेसातशे वर्षाच्या काळात कला कशाला म्हणावे हेही ठरवता आले नाही. ज्ञानदर्शी वाङ्मयाने वाचणाऱ्याला ज्ञान दिले पाहिजे. जगणं सुखकर करण्याचे सर्व मार्ग उलगडून दाखवले पाहिजे. तथागत बुद्ध आणि बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आजचे पथदर्शक त्यांच्या तत्त्वचिंतनातून ते हेच तर सांगत आले आहेत. याचा बोध आपण घेतला पाहिजे. साहित्य कुणाची बटीक म्हणून कार्यरत आहे ?, असे ते म्हणाले.

यावेळी अपरान्त प्रबोधिनीचे अध्यक्ष ज.व्ही. पवार यांनी संगीतीची वैशिष्ट्ये नमूद केली.तसेच सामाजिक कार्यकर्ते मिलिंद टिपणीस यांनी महाड भूमीविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती नमूद केली. सामाजिक सुधारणा करणे आणि सामाजिक पुनर्रचना करणे या दोन भिन्न बाबी आहेत. त्या समजून घेतल्या पाहिजे. ब्राह्मणी धर्माच्या प्रतिक्रांतीतून शेकडो वर्षापूर्वी छिन्नविच्छिन्न झालेली आमची मूळ बौद्ध आयडेंटिटी धम्म स्वीकारानं आम्हाला पुन्हा प्राप्त झाली आहे, आता आम्ही सोडलेल्या धर्मातील रूढी परंपराच्या सुधारणांच्या फंदात न पडता नव्या धम्माला साजेशा सामाजिक पुनर्बांधणीतून ही बौद्ध आयडेंटिटी प्रस्थापित करण्याची भूमिका जबाबदारीने बजवायला हवी, असे स्पष्ट प्रतिपादन तिसऱ्या सम्यक साहित्य कला संगीतिचे अध्यक्ष प्रा. आनंद देवडेकर यांनी येथे केले .आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. आनंद देवडेकर म्हणाले की, काही आंबेडकरवादी साहित्यिक बोलताना प्रेरणा आंबेडकरी सांगतात आणि प्रवृत्ती मात्र या प्रेरणेच्या विपरीत जोपासतता हा दांभिकपणा झाला. त्या साहित्यिकांनी भारतीय संस्कृतीची शाश्वत मूल्य, बौद्ध धम्म हा जीवनमार्ग आहे, या अर्थाने अंगीकारली आहेत काय? बाबासाहेबांनी दाखवलेल्या या माणूस केंद्रित धम्म मार्गाला साजेशा अर्थात सामाजिक पुनर्बांधणीच्या कामी त्यांच्या साहित्यातिक अविष्काराचा काही उपयोग होतो आहे काय ? असे प्रश्न मला पडतात, असे सांगून आंबेडकरी साहित्य आणि साहित्यिक याविषयी सखोल भाष्य केले.

 


कार्यक्रमाच्या सुरूवातीस संविधान उद्देशिकेचे वाचन अभिनेते अशोक चाफे यांनी केले. स्वागत अध्यक्ष डॉ. संजय खैरे यांनी पाहुण्यांचा परिचय तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक  सरचिटणीस संदेश पवार यांनी आभार प्रदर्शन विश्वास पवार यांनी केले. कार्यक्रमाचे अत्यंत खुमासदार सूत्रसंचालन अभिनेते निलेश पवार यांनी केले. यावेळी सरचिटणीस सुनील हेतकर, संदेश पवार, कोषाध्यक्ष दीपक पवार, रायगड जिल्हाध्यक्ष डॉ.संजय खैरे, मुख्य संयोजक मारुती सकपाळ, सामाजिक कार्यकर्ते व सुरबा नाना टिपणीस यांचे नातू मिलिंद टिपणीस, मुंबईचे अध्यक्ष विश्वास पवार, सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, रत्नागिरीचे अध्यक्ष संजय गमरे, पालघरचे अध्यक्ष भावेश लोखंडे, ठाणेचे कार्याध्यक्ष धम्मकिरण चन्ने आदी उपस्थित होते. 

याप्रसंगी अपरांत संगीति विशेषांक 2025 अध्यक्षांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. तसेच संदेश पवार यांचे 'पुरोगामी महाराष्ट्राचे उजवीकडे वळण ', सुनील हेतकर यांचे परिव्रजा, जनिकुमार कांबळे यांचे  गावू गाणी युगंधराची, अरुण नाईक यांचे बरड  लागलेला दरवाजा , प्रा. डॉ. संजय खैरे यांचे स्पंदन या पुस्तकांचे प्रकाशन प्रेमानंद गज्वी, आनंद देवडेकर व ज. वी पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी चित्र प्रदर्शन लावण्यात आले आहे. त्यामध्ये तरुण चित्रकार योगेश बर्वे,  साव्या लोपेज, शाजन कविता, मित्रा स्वयंदीप, सृजना श्रीधर, बाओ यांचा समावेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील ही चित्र आहेत. तसेच भव्य पुस्तक प्रदर्शन देखील लावण्यात आलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com