Top Post Ad

शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना होणार रंगमंचाची ओळख

विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच कलेची, नाटकाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा, यासाठी नरिमन पॉईंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) तर्फे ‘कनेक्शन इंडिया फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये मुंबईतील १६ शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहा शाळांचा समावेश आहे. या निमित्ताने महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आतापासूनच रंगमंचाची ओळख होणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये या १६ शाळांसह मुंबईतील महाविद्यालये, सेवाभावी संस्था देखील सहभागी होत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या फेस्टिव्हलमध्ये यूके येथील नॅशनल थिएटरदेखील सहभागी झाले आहे. 

नरिमन पॉईंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) तर्फे नाट्यसृष्टीशी निगडित विविध महोत्सव, कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. यंदा ‘एनसीपीए’मध्ये दिनांक १६ जानेवारी २०२५ पासून १९ जानेवारी २०२५ तसेच दिनांक २३ जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२५ या कालावधीत ‘कनेक्शन इंडिया फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये मुंबईतील १६ शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये पाच सेवाभावी विविध संस्था, पाच खासगी शाळांबरोबरच महानगरपालिकेच्या सहा शाळांचे विद्यार्थी कलागुण सादर करणार आहेत. 

या फेस्टिव्हलमध्ये आज (दिनांक १६ जानेवारी २०२५) महानगरपालिकेच्या पी उत्तर विभागातील गोविंदनगर मुंबई पब्लिक स्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘बॅक इन द डे’ का कार्यक्रम सादर केला. तसेच शनिवार दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी के पश्चिम विभागातील डी. एन. नगर मुंबई पब्लिक स्कूल शाळेचे विद्यार्थी ‘पूरवैय्या’, दिनांक १९ जानेवारी रोजी एफ दक्षिण विभागातील अभ्युदय नगर मुंबई पब्लिक शाळेचे विद्यार्थी ‘सुपरग्ल्यू’, दिनांक २३ जानेवारी रोजी जी दक्षिण विभागातील सीताराम मील कंपाऊंड मुंबई पब्लिक शाळेचे विद्यार्थी ‘एपिक’, दिनांक २४ जानेवारी रोजी पी उत्तर विभागातील चिंचवली मुंबई पब्लिक शाळेचे विद्यार्थी ‘रिमोट’ आणि दिनांक २६ जानेवारी रोजी एच पूर्व विभागातील खेरवाडी मुंबई पब्लिक शाळेचे विद्यार्थी ‘एज इज रिव्होल्टिंग’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. 

या नाटकांतून सुख-दु:खाच्या रंगछटांसह यश आणि वातावरण बदल आदी विषयांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. नाटकांचे दिग्दर्शन कसे करावे, नेपथ्याची मांडणी, कलागुणांना वाव देणे, सांघिक प्रयत्न आणि उत्तम सादरीकरण आदी विषय विद्यार्थ्यांना या फेस्टिव्हलमध्ये शिकायला मिळणार आहेत. तसेच ही नाटकं पाहण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील ५० विद्यार्थ्यांना दररोज विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. साहजिकच नाटकांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांसह इतरही विद्यार्थ्यांना नाटक कसे घडते, याची माहिती आणि प्रात्यक्षिक पाहायला मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com