मुंबई महानगरातील हवेची गुणवत्ता बहुतांशी सुधारली आहे. वातावरणीय बदलांमुळे वायू प्रदूषणात वाढ आढळून आल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने बांधकामांसंदर्भात कठोर पावले उचलली होती. त्याचा सकारात्मक परिणाम होवून वायू प्रदूषण नियंत्रणात आल्याने मुंबईत भायखळा, बोरिवली पूर्व या भागांमध्ये बांधकामांवर लावण्यात आलेली सरसकट बंदी आता हटवण्यात आली असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली . मात्र अल्पावधीतच हा निर्बंध हटवल्याने मुंबईमध्ये चर्चेला उधाण आले आहे. लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे हे निर्बंध मागे घेण्यात आले असा सूरही आता मुंबईकरांनी लावला आहे
असे असले तरी, यापुढेही मुंबई महानगरातील हवेच्या गुणवत्तेवर महानगरपालिकेची यंत्रणा अत्यंत बारकाईने लक्ष ठेवणार आहे. महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, आवश्यक ती सर्व कार्यवाही बांधकाम प्रकल्पांना, विकासकांना करावीच लागेल. कोणत्याही प्रकारचे उल्लंघन आढळून आले आणि वारंवार सूचना देऊनही निकषांची पूर्तता केली नाही तर अशा विशिष्ट बांधकाम प्रकल्पांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल, आवश्कतेनुसार त्या विशिष्ट बांधकाम प्रकल्पावर निर्बंध लादण्यात येईल, असे सुस्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत
0 टिप्पण्या