आपल्याला भरकटवून सरकारवर शेकणाऱ्या मुद्द्यांपासून भाजप पक्ष स्वतः ची सुटका करून घेत आहे. इतरांनी लादलेल्या अजेंड्यावर काम करण्याचे आपण थांबवणार आहोत की नाही ? असा सवाल करून भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकर... आंबेडकर... आंबेडकर असा जप काय करता, असा सवाल तुच्छतेने लोकसभेत केला. त्यातून नवा वाद उभा करून इतर विषयावरील प्रश्न व चर्चा थांबवत त्यांनी अदानीला वाचवले. आणि लोकसभेत अदाणीवरील चर्चेतून भाजपचीही खुबीने सुटका केली. असा स्पष्ट आरोप संविधान तज्ज्ञ, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष डॉ. सुरेश माने यांनी केला. मुंबईतील धारावी येथे बौद्ध, मातंग, चर्मकार कार्यकर्त्यांच्या एका संयुक्त मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
गुरुवार २ जानेवारी रोजी बौद्ध, मातंग, चर्मकार समाजातील कार्यकर्त्यांची एक बैठक मुंबईच्या धारावी येथील बाबुराव माने यांच्या डॉ. मनोहर जोशी कॉलेजमध्ये पार पाडली. उत्तम प्रतिसादामुळे तिला मेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. राष्ट्रीय चर्मकार समाज संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने हे अध्यक्षस्थानी होते. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष, संविधान तज्ज्ञ डॉ. सुरेश माने, प्रा.डॉ. जी. के. डोंगरगावकर, दलित पँथरचे नेते सुरेश केदारे, प्रजासत्ताक जनता परिषदेचे अध्यक्ष प्रबुद्ध साठे यांनी विचार प्रवर्तक मार्गदर्शन यावेळी केले. प्रास्ताविक भाषण या मेळाव्याचे एक निमंत्रक आंबेडकरवादी भारत मिशनचे संयोजक दिवाकर शेजवळ यांनी केले. तर, सूत्रसंचालन चर्मकार संघाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष विलास गोरेगावकर यांनी केले.खास या बैठकीसाठी पुण्याहून आलेल्या प्रबुद्ध साठे यांनी या बैठकीच्या संयोजनामागील अनुसूचित जातींना एकवटण्याचे इप्सित साधण्यासाठी आपण स्वतः आधीपासून कार्यरत झालो आहोत, असे नमूद केले.. आंबेडकरी बौद्ध समाजासह मातंग, चर्मकार आदी अनुसूचित जातींनी आणि जमातींनीही आपल्या न्याय - हक्कासाठी अलग अलग राहून, आपल्या मर्यादित ताकदीवर अपयशी लढे देण्यात काय हशील आहे? किमान व्यापक सामाजिक हिताच्या रक्षणासाठी त्यांची संघटित शक्ती उभी करण्याच्यादृष्टीने ' सामाजिक एकजूट ' साधण्यासाठी धारावीतील ही बैठक पाहिले पाऊल ठरेल. राज्यातील प्रमुख शहरे आणि जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जाती, जमातींच्या ' सामाजिक एकजूट ' परिषदांचे आयोजन करून या मोहिमेला गतिमान करता येवू शकते, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला. मात्र ज्या बाबुराव माने यांनी आमदारकी असताना मनोहर जोशी यांच्या नावाने महाविद्यालय उभे केले त्यावेळी त्यांना कोणत्या महापुरुषांची नावे आठवली नाही का असा सुरही काही मंडळींना यावेळी लावला.
0 टिप्पण्या