Top Post Ad

महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विशेष विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व त्यासमवेत क्रीडा, कला, सांस्कृतिक क्षेत्रातील प्रगती देखील कौतुकास्पद आहे. बालकोत्सवासारख्या उपक्रमांमधून त्याचे प्रतिबिंब पाहायला मिळते. दिव्यांग व विशेष विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून मनाला भिडणारे सादरीकरण झाले. इतर विद्यार्थ्यांइतकेच आपणही सरस आहोत, हे त्यांनी दाखवून दिले, याचा मला अभिमान वाटतो. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विशेष विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येतील, जेणेकरुन त्यांच्यातील कलागुणांना आणखी वाव मिळेल, असे भावनिक उद्गार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी काढले. 


महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये नृत्यकला व संगीत याबद्दल आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे दरवर्षी 'बालकोत्सव' चे आयोजन करण्यात येते.  बालकोत्सव २०२४ – २०२५ अंतर्गत 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अंतिम लोकनृत्य स्पर्धा व पारितोषिक वितरण' तसेच 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब पथनाट्य स्पर्धा' तील प्रथम तीन क्रमांक सादरीकरण आणि संयुक्त पारितोषिक वितरण समारंभ भायखळा (पूर्व) स्थित अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात आज (दिनांक २४ जानेवारी २०२५) संपन्न झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी हे बोलत होते.  

उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुजाता खरे यांच्यासह विविध अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक व नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.

या सोहळ्याची सुरुवात विशेष मुलांनी सादर केलेल्या ‘I am able, give me time’ या प्रेरणादायी पथनाट्याने झाली. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी विविध राज्यांतील आठ लोकनृत्यांचे सादरीकरण केले. या सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. 

लोकनृत्य स्पर्धेमध्ये, के पश्चिम विभागातील मुंबई पब्लिक स्कूल कामा मार्ग उर्दू शाळेचा ‘चरी नृत्य’ (राजस्थानी नृत्य) गट प्रथम क्रमांकाचा विजेता ठरला. एफ उत्तर विभागातील मुंबई पब्लिक स्कूल काणे नगर सीबीएसई शाळेचा ‘रेंगमा नागालँड नृत्य’ गट द्वितीय तर मुंबई पब्लिक स्कूल मेघराज शेट्टी उर्दू शाळेचा ‘डांगी नृत्य’ गट हा तृतीय क्रमांकाचा विजेता ठरला. 

पथनाट्यांमध्ये, अशोक वन मराठी शाळेने ‘एकच ध्यास –  गुणवत्ता विकास’ हे पथनाट्य सादर केले. मुंबई पब्लिक स्कूल विक्रोळी पार्कसाईटने ‘सायबर सुरक्षा – काळाची गरज' या विषयावर तर बापूराव जगताप मार्ग उर्दू शाळेने 'भारतीय संविधान – देशाची शान’ या पथनाट्याचे सादरीकरण केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com