मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी बृहन्मुंबई क्षेत्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी माननीय महापौर आयोजित ‘माझी मुंबई’या संकल्पनेवर आधारित ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा सन २०२५’ आयोजित करण्यात आली होती. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ४८ ठिकाणी आयोजित या स्पर्धेमध्ये ८८ हजार ७८९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल महानगरपालिकेच्या उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांनी आज (दिनांक २२ जानेवारी २०२५) घोषित केला. महानगरपालिका मुख्यालयात पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेतून उप आयुक्त डॉ. प्राची जांभेकर यांनी सविस्तर निकालाची घोषणा केली. शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, श्रीमती सुजाता खरे, कला अकादमीचे प्राचार्य. दिनकर पवार व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
ही चित्रकला स्पर्धा चार गटांमध्ये घेण्यात आली. इयत्ता पहिली व दुसरीच्या गटासाठी 'मी आणि फुलपाखरू', 'मी आजीच्या कुशीत', 'मी व माझा मित्र / मैत्रिण', इयत्ता तिसरी ते पाचवीच्या गटासाठी 'आम्ही पतंग उडवितो', 'आम्ही अभ्यास करतो', 'आम्ही राणीच्या बागेत', इयत्ता सहावी ते आठवीसाठी 'आमच्या शाळेची परसबाग', 'आम्ही चौपाटीवर वाळूचा किल्ला बनवितो', 'आम्ही गणपती मिरवणुकीत नाचतो', तर इयत्ता नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'महानगर मुंबई/मेट्रोपॉलिटन सिटी मुंबई', 'महिला सशक्तीकरण, जलसंवर्धन', असे विषय होते.या स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या चित्रकृतींचे प्राथमिक, द्वितीय आणि नंतर अंतिम परीक्षण करुन विजेत्यांची यादी निश्चित करण्यात आली. अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून ल. से. रहेजा कला महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर पवार, सुप्रसिद्ध चित्रकार व कला समीक्षक विजय आचरेकर, सुप्रसिद्ध जाहिरातकार सुनील महाडीक यांनी कामकाज पाहिले. स्पर्धेच्या निकालाचे परीक्षकांनी बंद करून दिलेले पाकीट आजच्या पत्रकार परिषदेत उप आयुक्त डॉ. प्राची जांभेकर यांच्या हस्ते उघडण्यात आले.*स्पर्धेचा निकाल-*
*गट क्रमांक एक (इयत्ता पहिली व दुसरी)* प्रथम क्रमांक हा एम पूर्व विभागातील शिवाजीनगर उर्दू शाळा क्रमांक ७ मधील इयत्ता २ री तील शाझाईन अकीब अहमद खान, द्वितीय क्रमांक जी उत्तर विभागातील धारावी काळा किल्ला मराठी क्रमांक २ मधील प्राची विनोदकुमार जैसवार आणि तृतीय क्रमांक एम विभागातील अंजुमन इ. इस्लाम अल्लाना इंग्लिश प्रायमरी स्कूलमधील इयत्ता पहिलीतील अरीब अहसान यांनी पटकाविला.
*गट क्रमांक दोन (तिसरी व पाचवी)* प्रथम क्रमांक आर मध्य एमएलआरटी गाला पॉयनर इंग्लिश स्कूलधील इयत्ता पाचवीतील मेहरा तपस्या सत्येंद्र, द्वितीय क्रमांक एल विभागातील गैबनशहानगर मनपा शाळा क्रमांक दोनमधील इयत्ता चौथीतील मोमीन सिद्रा मोहम्मद फरहान, तृतीय क्रमांक जी उत्तर विभागातील धारावी काळा किल्ला मराठी शाळा क्रमांक दोनमधील इयत्ता चौथीतील सायरा इसराक खान यांनी पटकाविला.
*गट क्रमांक ३ (पाचवी ते आठवी)* प्रथम क्रमांक एफ दक्षिण विभागातील सर जे. जे. फोर्ट बॉइज हायस्कूलमधील इयत्ता आठवीतील रुद्र दिनेश चिले, द्वितीय क्रमांक सी विभागातील संस्कार अकॅडेमीतील इयत्ता सहावीतील उन्नती एस. शिंदे आणि तृतीय क्रमांक पी दक्षिण विभागातील मिठानगर मुंबई पब्लिक स्कूलमधील इयत्ता आठवीतील यश विनोद मिश्रा यांनी पटकाविला.
*गट क्रमांक ४ (नववी ते दहावी)* प्रथम क्रमांक एम पूर्व विभागातील केसीए सेंट फ्रांसिस इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता ९ वी मधील आदित्य सुरेश गुप्ता, द्वितीय क्रमांक आर मध्य विभागातील बोरिवली मनपा माध्यमिक शाळेतील (राजदा) इयत्ता ९ वी मधील अंकिता विनोद सहानी आणि तृतीय क्रमांक आर मध्य विभागातील सायली इंटरनॅशनल स्कूलमधील ९वी मधील आयुषी विश्वकर्मा यांनी पटकाविला.
प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविणाऱया विद्यार्थ्यांना अनुक्रमे २५ हजार, २० हजार आणि १५ हजार रुपये रक्कम पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहेत. याशिवाय प्रत्येक गटात दहा विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून प्रत्येकी ५ हजार रुपये रक्कम देण्यात येणार आहे. चारही गटात मिळून एकूण ६ लाख ९० हजार रुपयांची पारितोषिके आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे यांनी दिली. पारितोषिक विजेत्यांना लवकरच समारंभपूर्वक पारितोषिक प्रदान करण्यात येतील, अशी माहिती कला अकादमीचे प्राचार्य दिनकर पवार यांनी दिली.
0 टिप्पण्या