पोलिसांच्या खाद्याला खांदा लावून काम करण्यासाठी होमगार्डची नेमणूक करण्यात आली आहे. ही जबाबदारी होमगार्ड नेहमीच पार पाडत आहेत. निवडणूक कालावधिमध्ये सर्व होमगार्ड यांना कायमस्वरूपी दोन महिने कर्तव्यावर नेमण्यात आले होते. मात्र आदेशाचे पालन न करता, या कालावधीमध्ये गैरहजर राहिलेल्या सुमारे ४८७ होमगार्डना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. निवडणूक कालावधीमध्ये मोठ्याप्रमाणात राज्यातून वाढीव बंदोबस्त मागवण्यात आला होता. यावेळी अधिक होमगार्ड यांना विविध ठिकाणी बंदोबस्ताचे काम नेमून दिले होते. यावेळी सर्वांनी कर्तव्यावर हजर राहून पोलीस प्रशासनाच्या कामात मदत करण्याच्यासंदर्भात वरिष्टांनी सूचना देखील दिल्या होत्या,
तसेच निवडणूक कालावधिमध्ये तयार करण्यात आलेल्या बंदोबस्त स्किममध्ये होमगार्ड याचा देखील समावेश केलेला होता. मात्र, गैरहजर राहिल्यामुळे इतरांवर या कामाचा भार आला. दरम्यान अशा कर्तव्यावर हजर न राहणाऱ्या होमगार्डना सार्वत्रिक विधानसभा निवडणूक कर्तव्य बंदोबस्त -२०२४ करीता गैरहजर असलेल्या कारणास्तव होमगार्डच्या विरुध्द लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ व होमगार्ड अधिनियम १९४७ कलम ६-ख,(१-क) अन्वये, या होमगार्डच्या सेवेची आवश्यकता नसल्याने सेवासमाप्त करण्यात येत असल्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र याचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी या होमगार्डकडून करण्यात येत आहे. याबाबत लवकरच शासनाला निवेदन देऊन ही मागणी करण्यात येईल. तसेच प्रसंगी सर्व होमगार्ड एकत्रित येऊन आझाद मैदानात लाक्षणिक धरणे आंदोलन करतील असे आगतराव कोळेकर यांनी प्रजासत्ताक जनताशी बोलतांना स्पष्ट केले.
0 टिप्पण्या