Top Post Ad

मालमत्‍ताकर भरणा सहजसोपा व सुलभ व्‍हावा यासाठी अधिक प्रयत्‍न गरजेचे

      मुंबईकरांना पुरविल्‍या जाणा-या नागरी सेवा-सुविधांच्‍या विकासासाठी कर उत्‍पन्‍न गरजेचे आहे. महानगरपालिकेचा आर्थिक रोख प्रवाह (कॅश फ्लो) सुरळीत ठेवण्‍याकामीदेखील मालमत्‍ताकराची भूमिका महत्‍त्‍वपूर्ण ठरते आहे. मुंबई महानगराची भौगोलिक रचना, लोकसंख्‍येची घनता, दाट लोकवस्‍ती विचारात घेता मालमत्‍ताकर निर्धारण व संकलन ही आव्‍हानात्‍मक बाब आहे. त्‍यावर मात करत करनिर्धारण व संकलन विभागातील अधिकारी - कर्मचारी चांगली कामगिरी करत आहे. मात्र, अंदाजपत्रकीय उद्दिष्ट्य गाठणे म्‍हणजे कामगिरी नव्‍हे, नागरिकांना मालमत्‍ताकराची देयके नियमितपणे वेळेवर मिळावीत, करभरणा अधिकाधिक सहजसोपा व सुलभ व्‍हावा यासाठी अधिक प्रयत्‍न करावेत, अशी अपेक्षा महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी व्‍यक्‍त केली. झोपडपट्टी भागातील व्‍यावसायिक मालमत्‍तांचा शोध घेऊन त्‍यांना करकक्षेत आणावे, असे निर्देशदेखील गगराणी यांनी दिले.  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याच्या अधिकारी आणि कर्मचा-यांसमवेत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज (दिनांक १३ जानेवारी २०२५) संवाद साधला. भायखळा (पूर्व) येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात झालेल्‍या या कार्यक्रमास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन)  विश्वास शंकरवार, सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन). गजानन बेल्लाळे आदी  उपस्थित होते.


 महानगरपालिका आयुक्त  भूषण गगराणी म्‍हणाले की, मालमत्‍ताकर हा महानगरपालिकेच्‍या उत्‍पन्‍नाचा प्रमुख स्रोत आहे. आजमितीला बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या करनिर्धारण व संकलन खात्‍याकडे २ लाख ४३ हजार ९८९ मूळ मालमत्‍तांची नोंद आहे.  त्‍यात निवासी आणि अनिवासी (व्यावसायिक) मालमत्तांचा समावेश आहे. शहर विभागात जुन्‍या मालमत्‍तांचा विकास होऊन उत्‍तुंग इमारती तयार होत आहेत. तसेच, उपनगरांमध्‍येदेखील नवीन मालमत्‍तांमध्‍ये वाढ होत आहे. मालमत्‍तांचे मूल्‍यांकन करण्‍यासाठी महानगरपालिकेने टप्‍पे निश्चित केले आहेत. त्‍याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. कर आकारणीमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी सर्व नवीन बांधकामे, विद्यमान बांधकामे आणि मालमत्तेतील बदल, जर काही असतील तर, याची माहिती इमारत प्रस्‍ताव, इमारत व कारखाने विभागाकडून उपलब्ध करून घेतली पाहिजे. त्‍यासाठी महानगरपालिकेच्‍या विविध विभागांमध्‍ये समन्‍वय साधणे अत्यावश्यक आहे, असेदेखील. गगराणी यांनी नमूद केले.

 मालमत्‍ताकर ऑनलाईन पद्धतीने भरण्‍याची प्रक्रिया बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने सोपी, सुलभ केली असली तरी त्‍यात आणखी सुधारणा करण्‍यास वाव आहे. नेट बँकिंग, एनईएफटी, आरटीजीएस, यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे नागरिक कर भरणा करू शकतात. मात्र, आणखी सोपे पर्याय महानगरपालिकेने उपलब्‍ध करून दिले पाहिजेत. नागरिकांना नागरी सुविधा केंद्रावर प्रत्‍यक्ष जाण्‍याची आवश्‍यकता भासणार नाही, अशी यंत्रणा उपलब्‍ध करून देण्‍याची सूचना श्री. गगराणी यांनी केली. आर्थिक वर्षाच्‍या अखेरीस, मालमत्‍ता कराचे उद्दिष्ट्य गाठण्‍यासाठी धावाधाव करण्‍यापेक्षा आर्थिक वर्षाच्‍या प्रारंभीच कालबद्ध कार्यक्रम निश्चित करायला हवा, असेदेखील  गगराणी यांनी स्‍पष्‍ट केले.

 देशातील इतर महानगरपालिकांच्‍या तुलनेत बृहन्‍मुंबई महानगरपालिकेची मालमत्‍ता कर संकलन उल्‍लेखनीय आहे. करनिर्धारण व संकलन खात्‍याच्‍या अधिकारी - कर्मचा-यांचे मुंबईकर नागरिकांप्रती वागणूक चांगली असल्‍याचा प्रतिसाद आहे. करनिर्धारण व संकलन खात्‍याच्‍या अधिकारी - कर्मचा-यांनी अधिक चांगल्या कामगिरीची नोंद करावी, अशी अपेक्षा महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी व्‍यक्‍त केली.

या संवाद कार्यक्रमात करनिर्धारण व संकलन खात्‍याने केलेली कर वसुली, स्‍थावर व जंगम मालमत्‍ता जप्‍ती व अटकावणी कारवाई, कर भरण्‍यासाठीची जनजागृती, थकीत मालमत्‍ता कर वसुलीची कार्यवाही, महसूल वाढीचे नवीन स्रोत, कर वसुलीत येणा-या अडचणी कामकाजात सुलभता व सुसूत्रता येण्‍याकरिता उपाययोजना आदीं विषयांवर चर्चा झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com