रविवारची सकाळ…चोहीकडे पसरलेले कोवळे उन अन् गारवा…मुंबईतील उद्याने आणि मैदानांच्या परिसरात चित्ररंगात मग्न झालेले सृजनशील विद्यार्थी…कधी पेन्सिलचा आधार तर कधी खोडरबराची खंबीर साथ…त्यात रंगांची होणारी उधळण…अन् त्यातून आकाराला येणारी ‘माझी मुंबई’ संकल्पनेवर आधारित निरनिराळ्या रंगसंगतीने सजलेली उत्तमोत्तम चित्रे…अशा मनमोहक आणि आल्हाददायक वातावरणात मुंबईतील विविध मैदाने आणि उद्यांनांमध्ये ८८ हजार ७८९ विद्यार्थ्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे 'माननीय महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेत’ सहभाग घेत आपल्या कल्पनाशक्तीला वाव दिला.
मुंबई महानगरातरील ४८ उद्याने व मैदानांवर आज (दिनांक १२ जानेवारी २०२५) सकाळी ८ ते ११ या वेळेत एकाचवेळी पार पडलेल्या या स्पर्धेसाठी यंदा 'माझी मुंबई' ही संकल्पना निवडण्यात आली होती. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय येथे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी भेट देवून स्पर्धेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी श्री. गगराणी आणि सौ. गगराणी यांनी देखील हातात कुंचला घेत चित्रात रंग भरले. तसेच ग्रँट रोड ( पश्चिम ) येथील ऑगस्ट क्रांती मैदानात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षणाधिकारी (प्राथमिक). राजेश कंकाळ, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुजाता खरे, कला विभागाचे प्राचार्य दिनकर पवार आदींसह सहकारी कला निदेशक, केंद्रप्रमुख शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षणासह विद्यार्थ्यांमध्ये मुंबई महानगराविषयीची आत्मीयता वाढावी, या महानगराविषयी प्रेम रहावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका विविध उपक्रम राबवित असते. त्याच अनुषंगाने शिक्षण विभागही दरवर्षी 'माननीय महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा' घेत असते. यंदा या स्पर्धेचे १६ वे वर्ष आहे.
चित्र काढण्यासाठी लागणारे पेन्सिल, पेपर, रंग, मार्कर, खोडरबर हे साहित्य घेऊन आज सकाळपासूनच मुंबईतील उद्याने आणि मैदानांमध्ये चिमुकल्यांची वर्दळ सुरू होती. त्यांना सोडण्यासाठी आलेल्या पालकांचीदेखील मोठी गर्दी जमली होती. सकाळी ८ वाजता मुलांना चित्र काढण्यासाठी विषय देण्यात आले. तेव्हापासून ११ वाजेपर्यंत विद्यार्थी चित्र काढण्यात मग्न होते. स्पर्धेत सहभागी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख अशी चित्रे रेखाटली.
यंदाच्या चित्रकला स्पर्धेसाठी 'माझी मुंबई' ही संकल्पना निवडण्यात आली होती. बृहन्मुंबई महानगरपालिका शाळा, महानगरपालिका क्षेत्रातील खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ४ गट तयार करण्यात आले होते. इयत्ता पहिली व दुसरीच्या गटासाठी 'मी आणि फुलपाखरू', 'मी आजीच्या कुशीत', 'मी व माझा मित्र / मैत्रिण', इयत्ता तिसरी ते पाचवीच्या गटासाठी 'आम्ही पतंग उडवितो', 'आम्ही अभ्यास करतो', 'आम्ही राणीच्या बागेत', इयत्ता सहावी ते आठवीसाठी 'आमच्या शाळेची परसबाग', 'आम्ही चौपाटीवर वाळूचा किल्ला बनवितो', 'आम्ही गणपती मिरवणुकीत नाचतो', तर इयत्ता नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'महानगर मुंबई/मेट्रोपॉलिटन सिटी मुंबई', 'महिला सशक्तीकरण, जलसंवर्धन', असे विषय होते. वरिल विषयांना विद्यार्थ्यांना चित्ररुपाने साकारले.
या स्पर्धेत प्रत्येक गटाला तीन विषय देण्यात आले होते. स्पर्धेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे. तर द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्याला २० हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र तसेच तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्याला १५ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे. उत्तेजनार्थ ५ हजार रुपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र १० विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या