ट्रंप पुन्हा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. नाट्यमय निर्णय अपेक्षित होतेच. त्यातील एक,पॅरिस करारातुन अमेरिकेने बाहेर पडणे, हा चिंताजनक निर्णय असला तरी यात धक्का बसण्यासारखे काही नाही. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर ट्रंप यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक हवामान संघटना आणि इतर संस्थांचा निधी थांबवला होता. जागतिक हवामान संघटनेची पृथ्वीवर जवळपास साडेतीन हजार केंद्र आहेत जेथे तापमान व हवामानाची क्षणोक्षणी नोंद घेतली जाते. या संस्था सत्य सांगण्याचे वैज्ञानिक ब्रीद पाळत होत्या. परंतु आर्थिक नाड्या आवळल्यावर त्यांच्या वागण्यात फरक पडला.
सन २०१७ मधे तापमानवाढ अपरिवर्तनीय झाली आहे. पॅरिस करार जगात पाळला जात नव्हताच. तो अंमलात आला अशी कल्पना केली तरी त्या उपायांनी तापमानवाढ व हवामान बदल रोखता येणार नाही अशी स्थिती पृथ्वीवर निर्माण झाली आहे. या समस्येचा पृथ्वीच्या दृष्टीकोनातून विचार हवा.
आपण मानव एक सजीव आहोत. प्रत्येक सजीवाने जन्म घेताना पृथ्वीशी, अस्तित्व देणाऱ्या तत्त्वाशी एक अलिखित करार केलेला असतो. त्या कराराप्रमाणे त्या सजीवाने पृथ्वीच्या विरोधात वर्तन करायचे नसते. आधुनिक माणुस सोडून इतर सर्व सजीव हा करार पाळतात. अस्तित्वात रहायचे तर, पॅरिस करारापेक्षा हा शरीरातील सुमारे चाळीस लाख कोटी पेशी चालवणारा निसर्गाचा करार पाळणे आवश्यक आहे.
दिल्लीत भारत मंडपममधे मोटारींचे विक्री - प्रदर्शन भरले. वीजेवर चालणाऱ्या मोटारींची माॅडेल हे नवे आकर्षण आहे, ते कार्बन उत्सर्जन कमी करते व पर्यावरणस्नेही असते असा गोड गैरसमज आहे. कार्बनमधे वाढ करणार असल्याने पॅरिस करारात हे प्रदर्शन बसत नाही आणि एकही मोटार निर्माण होणे, ती वापरली जाणे हे पृथ्वीच्या करारात बसत नाही.
पॅरिस करार पाळला नाही तर काही शिक्षा नाही परंतु पृथ्वी करार पाळला नाही तर पृथ्वीवरून उच्चाटन आहे. ते वेगाने चालू आहे. लाॅस एंजेलिसमधे तथाकथित विकसित जगातील सर्वात श्रीमंत, प्रकाशझोतातील व्यक्तींची आलिशान घरे जळत आहेत तरी विकसित देश तापमानवाढ व हवामान बदलाच्या संकटाला तोंड देऊ शकतात हा भ्रम पक्का आहे.
आपला
ॲड. गिरीश राऊत
निमंत्रक
भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ
दि. २२ जानेवारी २०२५.
0 टिप्पण्या