Top Post Ad

रस्‍ते विकासाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत.....महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश

 विभागातील रस्ते विभागामार्फत सुरु असलेली रस्‍ते विकासाची कामे प्राधान्याने व जलद गतीने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. तसेच, पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत बोरिवली रेल्वे स्‍थानक परिसरातील प्रस्तावित कामाचा पहिला टप्पा पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावा, असे स्‍पष्‍ट निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी दिले आहेत. विकास कामांची गुणवत्‍ता राखण्‍यावर अधिक भर द्यावा, अधिकारी - अभियंत्‍यांनी कार्यस्‍थळास प्रत्‍यक्ष भेटी देऊन पाहणी करावी, असे निर्देश देखील श्री. गगराणी यांनी दिले आहेत

 


     बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी आज (दिनांक २६ डिसेंबर २०२४) बोरिवली येथील आर मध्य विभाग अंतर्गत सुरू असलेल्‍या व पूर्ण झालेल्या विविध विकास कामांची स्थळ पाहणी केली. त्‍यानंतर, आर मध्‍य विभाग कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्‍यावेळी ते बोलत होते. उप आयुक्‍त (परिमंडळ ७) डॉ. (श्रीमती) भाग्‍यश्री कापसे, सहायक आयुक्‍त (आर मध्‍य विभाग) श्रीमती संध्‍या नांदेडकर यांच्‍यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

श्री. गगराणी म्‍हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प हाती घेण्‍यात आला आहे. रस्‍ते विकास कामे दर्जेदार आणि अत्युच्च गुणवत्‍तापूर्ण होण्‍यासाठी महानगरपालिका अधिकारी - अभियंत्‍यांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. विकास कामे सुरू असताना नागरिकांची गैरसोय होता कामा नये, यावर अधिक लक्ष केंद्रीत केले पाहिजे. बोरिवली पश्चिम येथील 'आर.डी.पी-१०' या रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा. पावसाळ्यापूर्वी रस्‍ते विकासाची कामे पूर्ण झाली पाहिजेत, असे निर्देशदेखील श्री. गगराणी यांनी दिले

बोरिवली (पूर्व) भागात पश्चिम रेल्वे परिसरामध्ये पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्‍याच्‍या तक्रारीची दखल घेत महानगरपालिका आयुक्‍त श्री. गगराणी यांनी या परिसरास भेट दिली. पावसाळी पाण्याचा निचरा करण्याकरीता पर्जन्य जलवाहिन्‍या विभागामार्फत प्रस्तावित कामांची माहिती घेतली. पर्जन्‍य जलवाहिनी विभागातर्फे प्रस्तावित केलेल्या कामाचा पहिला टप्पा पावसाळ्यापूर्वी जलद गतीने पूर्ण करावा, असे स्‍पष्‍ट निर्देश श्री. गगराणी यांनी दिले. 

            आर मध्य विभागामार्फत पूर्ण करण्यात आलेल्या गोराई जेट्टी मार्ग, पंगत हॉटेल समोर महात्मा फुले झोपडपट्टी निष्कासनानंतर करण्यात आलेले रस्‍ता रुंदीकरण आणि उद्यान विकसित कामांची महानगरपालिका आयुक्‍त श्री. गगराणी यांनी पाहणी केली. बोरिवली पश्चिम येथे सुरू असलेल्या भारतरत्‍न डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम उद्यानाच्या सुधारणा कामाचे श्री. गगराणी यांनी कौतुक केले. उद्यानातील अॅथलॅटिक ट्रॅक, सुशोभीकरण कामे इतरांसाठी अनुकरणीय असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले. लालजी त्रिकमजी मुंबई पब्लिक स्कूल या शाळेला भेट देत महानगरपालिका आयुक्‍त श्री. गगराणी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.तत्पूर्वी त्यांनी नागरी सुविधा केंद्राला भेट देत नागरिकांसमवेत संवाद साधला. तसेच, नागरी सुविधा केंद्राच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com