Top Post Ad

परभणी प्रकरण ... प्रशासनाचा वाढीव खटल्यांचा फास

 संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या निषेधार्थ परभणीत बुधवारी पाळण्यात आलेल्या ' बंद ' च्या प्रकरणात ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते विजयराव वाकोडे यांच्यासहित ५० + सुमारे ४०० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील ४० जणांना अटक करण्यात आली असून अटकसत्र सुरुच राहणार आहे.  या गुन्ह्यांबरोबरच बंदच्या काळात खासगी मालमतेच्या झालेल्या नुकसान, नासधूस प्रकरणात संबंधित मालकांकडून स्वतंत्र तक्रारी दाखल करून घेत कारवाईचा फास आणखी आवळला जाणार आहे. तसा इरादा परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. बंदच्या दिवशी महिलांनी संतापाच्या भरात जिल्हाधिकारी कार्यालयात केलेले आंदोलन हे मर्यादांचे उल्लंघन करणारे होते; त्याचे समर्थन कुणीही करत नाही. पण हिंसक वळण लागलेल्या की, हेतूत: हिंसक वळण लावण्यात आलेल्या बंद मधील हिंसाचार ठळक, गडद करण्यासाठी प्रशासनाने आपला सारा रोख , प्रकाशझोत हा महिलांच्या त्या आंदोलनावरच केंद्रित केलेला दिसत आहे.जिल्हा प्रशासनाच्या या पवित्र्यामुळे मूळ विटंबना प्रकरणातील आरोपी, त्याचे लागेबांधे आणि त्याने घडवलेल्या प्रक्षोभक कृत्यामागील खऱ्या सूत्रधारांचा शोध - तपासाचा मुद्दा आपसुकपणे बाजूला पडण्याच्या मार्गावर आहे. शिवाय, जिल्हाधिकारी कार्यालयातील आंदोलनाच्या प्रकरणात कारवाईची मोठी झळ ही गृहिणी म्हणून कुटुंबाची जबाबदारी शिरावर असलेल्या महिलांना बसण्याची चिन्हे दिसत आहेत.

राज्याच्या मुख्य सचिव पदावर मान. सुजाता सौनिक आणि पोलीस महासंचालक पदावर मान. रश्मी शुक्ला यांच्या रूपाने महिला अधिकारी आहेत. प्रशासनातील सर्वोच्च पदावर असलेल्या त्या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी महिला आंदोलकांच्या या प्रश्नात तातडीने व्यक्तिशः लक्ष घालण्याची गरज आहे. बांगला देशात हिंदुंसहित इतर सर्व अल्पसंख्यांक समाजावर सध्या अत्याचार सुरू आहेत. त्याचा देशभरात सर्वत्र तमाम सर्वधर्मीय बांधव निषेधच करत आहेत. त्यात बौद्ध भिक्खू आणि मुस्लिम समाजही आंदोलने  करत आहे. बांगला देशातील हिंदू समाजाच्या सुरक्षिततेच्या मुद्यावर मंगळवारी परभणीत ' सकल हिंदू समाजा' तर्फे मोर्चा आयोजित करण्यात आला होता.  राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकणारे संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेचे कृत्य घडवण्यासाठी नेमका त्या मोर्चाचा दिवस कसा निवडला गेला? बंदच्या प्रकरणात आंदोलकांवरील पोलीस कारवाईच्या धडाक्यात तपासाचा हा मुद्दा बाजूला पडता कामा नये, तो झाकोळला जाता कामा नये. किंबहुना  महायुती सरकारने विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विटंबना प्रकरणातील हा मुद्दा तपासात अग्रस्थानी राहील, याची दक्षता घेण्याची गरज आहे.

परभणीत संविधान प्रतिकृतीची विटंबना तथाकथित ज्या कुण्या माथेफिरू इसमाने केली, त्याचे ते कृत्य पाहिलेला, त्याबद्दल त्याला जाब विचारणारा आणि नंतर त्या आरोपीला पकडण्यात पुढाकार घेतलेला एक रिक्षाचालक साक्षीदार आहे, अशी माहिती त्यावेळी घटनास्थळी हजर असलेल्या स्थानिक लोकांनी दिली आहे. विटंबनेच्या कृत्याचा त्या रिक्षाचालकाने जाब  विचारल्यावर ,पकडल्यावर त्या माथेफिरू आरोपीने काय सांगितले ... त्याने काय उत्तर दिले?*' त्या ' रिक्षाचालकांचा जबाब  काय सांगतो ?* संबंधित रिक्षाचालकाचा आणि आरोपीला पकडण्याच्या क्षणी तिथे हजर असलेल्या प्रत्यक्षदर्शींचे जाब जबाब परभणीच्या पोलीस अधीक्षकांनी घेतले काय? वस्तुनिष्ठ माहिती मिळवण्यासाठी त्यांनी  खोलात जाण्याचा प्रयत्न केला आहे काय?

  • दिवाकर शेजवळ
  • आंबेडकरवादी भारत मिशन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com