"खरंच देशाची आर्थिक स्थिती इतकी वाईट आहे का?" नव्यानं निवडून गेलेले त्यावेळचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी अर्थमंत्रालयातून आलेली आठ पानांची नोट वाचली आणि कॅबिनेट सेक्रेटरी नरेश चंद्रांना विचारलं..
चंद्रांनी उत्तर दिलं "नाही… याहूनही खूप वाईट आहे"
नरसिंहरावांचं टेन्शन वाढलं...
लै बेक्कार काळ होता दोस्तांनो.. भारतीय अर्थव्यवस्थेनं पार जीवच सोडलावता.. शेवटच्या घटका ! त्यात तिकडं आखाती युद्धाला सुरुवात झाल्यामुळं तेलाच्या दरांचा भडका उडवलावता. पण नरसिंहराव लै धोरणी आणि हुशार माणूस. त्यांनी ओळखलं की आर्थिक पेच सोडवण्यासाठी अर्थमंत्रीपदावर कुणी ऐरागैरा थातूरमातूर खासदार किंवा पक्षाच्या मर्जीतली बिनडोक खासदारीण बसवून चालणार नाही. नाहीतर पुढच्या अनेक पिढ्यांना त्याचे दुष्परीणाम भोगायला लागतील.
..त्यांनी तातडीनं 'अर्थव्यवस्था' या विषयातील अशा अभ्यासू-तज्ञ-बुद्धिमान व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली, जो राजकारणाबाहेरचा असेल.. त्यावेळी त्यांना समजलं की भारतात एक असा अर्थतज्ञ प्राध्यापक आहे, ज्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता आहे.. रावांनी खोलात जाऊन त्याची माहिती काढली.. त्यानंतर त्यांना आशा वाटली, की या भयाण परीस्थितीत देशाला तारू शकेल असा एकच अत्यंत अभ्यासू-प्रतिभावान-खतरनाक माणूस आहे, वन ॲन्ड ओन्ली डॉ. मनमोहन सिंग !
पण गडी राजकारणाबाहेरचा. शिक्षक. तयार होईल का? ते काम पी.सी. अलेक्झांडर यांनी केलं. सिंग तयार झाले. हा 'होकार' पुढे देशाच्या उत्कर्षात खूप महत्त्वाचा ठरणार आहे असा थोडासाही अंदाज कुणाला आला नसंल !
मनमोहन सिंग यांनी पदावर आल्यापासूनच कामाचा धडाकाच लावला.. पहिल्या झटक्यात मनमोहनसिंगांनी निधड्या छातीनं पत्रकार परीषद घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेचं भयाणभेसूर चित्र, न लपवता उघडपणे सर्वांसमोर मांडलं. निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षानं काही अत्यावश्यक वस्तूंची यादी देऊन हे दर शंभर दिवसांत स्थिर करून मागे नेऊ असं आश्वासन दिलंवतं.. मात्र सिंग यांनी स्पष्ट सांगीतलं, "हे शक्य नाही. आपल्याकडं अशी कुठलीही जादूची छडी नाही."
झालं ! काँग्रेस पक्षात भूकंपच झाला. सगळे म्हणायला लागले “अहो पी.एम्, काय बोलतायत हे? इतकं खरं बोलायचं असतं व्हय जनतेशी??" ...पण पी.व्ही. नरसिंहराव हलक्या कानाचे आणि कच्च्या गुरूचे चेले नव्हते...त्यांनी लै दूरचा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भल्याचा विचार करून या माणसाची निवड केलीवती.
१९९१ च्या पहिल्याच अर्थसंकल्पीय भाषणाची सुरूवात मनमोहनसिंग यांनी व्हिक्टर ह्यूगो याच्या वाक्यानं केली, "ज्या विचारांची वेळ आली आहे, त्याला जगातली कुठलीही ताकद रोखू शकत नाही."
त्यानंतर देशात जी हवा आली भावांनो, ती याआधी कधीच आली नव्हती. मरणाच्या दारात असलेली आपली अर्थव्यवस्था फक्त रूळावरच आली नाही, तर तिनं बुलेट ट्रेनच्या दहापट वेग पकडला. आज जगभर इकॉनॉमीचे शिक्षण देणार्या युनिव्हर्सिटीजमध्ये मनमोहन सिंगांना 'भारताच्या आर्थिक क्रांतीचा जनक' म्हणून ओळखलं जातं मित्रांनो... भारताला जगाची दारं उघडून देणार्या जागतिकीकरणाची सुरूवात करताना १९९१ ते १९९६ या काळात त्यांनी घेतलेले अभूतपूर्व निर्णय जगभर अभ्यासले जातात ! मनरेगा सारख्या अफलातून निर्णयांनी प्रत्येक हाताला काम मिळालं..गोरगरीबांच्या घराघरात चूल पेटली...
आज सुमारांच्या सद्दीचा काळ आहे. अक्कलशून्य, वाचाळ थापड्यांचा थयथयाट सुरू आहे. अर्थव्यवस्था शेवटच्या घटका मोजतेय. खरंतर देशाला पुन्हा अशा तारणहाराची गरज असताना मनमोहनसिंगांचं जाणं खुप चटका लाऊन गेलं. देशानं कायम अभिमान बाळगावा असे बुद्धीमान, संवेदनशील, मितभाषी, प्रामाणिक, सत्यवचनी, कर्तृत्ववान आणि जगात आदराचे स्थान असलेले आजवरचे शेवटचे पंतप्रधान गेले…
अलविदा… द ग्रेट मनमोहनसिंग !
0 टिप्पण्या