Top Post Ad

पुण्यातील 11 उमेदवारांचे मतपडताळणीसाठी अर्ज दाखल

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासह पुण्यातील 11 उमेदवारांनी मतपडताळणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. बारामतीमध्ये अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यात लढत झाली. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. ईव्हीएम मशीन आणि मतमोजणीवर आक्षेप घेत युगेंद्र यांनी मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज केला आहे. याबाबत युगेंद्र पवार म्हणाले की, जनतेचा निर्णय आम्ही मान्य करतोय आणि केला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला हा अधिकार दिलाय की, 5% ईव्हीएम तुम्ही चेक करू शकता किंवा 5% बूथ चेक करू शकता. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये संभ्रमाच वातावरण आहे, संशयाच एक वातावरण आहे. त्याच्यामुळे जी आमची लिगल टीम आहे, जो आमचा पक्ष आहे. कार्यकर्ते आहेत आणि आम्ही स्वतः आम्हाला सगळ्यांना वाटलं की चेक करायला काय हरकत आहे. तो अधिकार ही आम्हाला सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्याच्यामुळे आज आम्ही ते चेक करण्याची मागणी तिथं केली आहे. असे सांगत आपण मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज केल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले.

  तसेच सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील दोन मतदान केंद्रातील दोन मशिनची पडताळणी करण्यात यावी असा अर्ज करत महेश कोठेंनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे. या पडताळणीसाठी ९४ हजार ४०० रुपयांचे चलनही त्यांनी भरले आहे. सोलापुरात पराभूत उमेदवारापैकी तुतारीचे उमेदवार महेश कोठेनी अर्ज भरून रोख रक्कम ही भरली आहे. आमदार होण्यासाठी अर्ज भरताना १० हजार रुपये डिपॉझिट प्रशासन घेतंय, मात्र फेर मतमोजणीसाठी एका ईव्हीएम मशीनसाठी ४० हजार आणि जीएसटी घेतला जात आहे. म्हणजे फेर मतमोजणीसाठी जवळपास दहा लाख रुपये भरावे लागत आहेत. हा कुठला न्याय? असा सवाल महेश कोठे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची रविवार १ डिसेंबर रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत गटनेते आणि मुख्य प्रतोद पदाबाबत निर्णय घेण्यात आला.  या बैठकीत आमदार जितेंद्र आव्हाड, नवनिर्वाचित आमदार रोहित पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांच्यावर मोठी जबादारी सोपवण्यात आली आहे. पक्षाच्या गटनेतेपदी आमदार जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे. तर आमदार उत्तम जानकर आणि आमदार रोहित पाटील यांची मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com