मुंबई महानगरातील हवेची गुणवत्ता या विषयाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यांनी आज ३० डिसेंबर बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. मुंबईतील प्रदुषणात होत असलेल्या वाढीबाबत उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्रसंगी कठोर पावले उचलली जातील, असे स्पष्ट मत यावेळी आयुक्तांनी व्यक्त केले.
हिवाळ्यात वाऱ्याचा कमी वेग आणि कमी तापमान यामुळे नैसर्गिक वायुवीजन कमी. त्यासमवेतच थंडीच्या कालावधीत कोरडे वारे आणि ढगाळ हवामान या कारणांमुळे वायू प्रदूषणात वाढ. होत आहे. वातावरणातील बदलांमुळे मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर याचा परिणाम होत आहे. म्हणून हवेतील प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत असून मुंबईतील नैसर्गिक हवामानाच्या स्थितीनुसार प्रदूषणाचे प्रमाण कमी-जास्त होत आहे. त्यासोबतच वाहनांचे उत्सर्जन, बांधकामांच्या ठिकाणी निर्माण होणारी धूळ तसेच स्थानिक हवामान या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून धुकेसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. या सर्व बाबींचा विचार करता वायू प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांमध्ये अल्पकालीन व दीर्घकालीन अशा दोन्ही प्रकारच्या उपाययोजनांची आखणी करण्यात येत असून प्रसंगी कठोर उपाययोजना करण्यात येतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.मुंबई महानगर प्रदेशात (MMR) विविध ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी एकूण ४५ वायू गुणवत्ता संनियंत्रण यंत्रे स्थापन. त्यात बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील (BMC Area) २८ यंत्रांचा समावेश. या यंत्रांद्वारे वास्तविक - वेळेतील हवेची गुणवत्ता मोजली जाते. ज्यामुळे वायू प्रदूषित ठिकाणे ओळखणे आणि योग्य उपाययोजना राबविण्यास मदत होणार. वातावरणीय बदलांमुळे हवेच्या दर्जात होणारे बदल, त्यातून जनजीवनावर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेता, महानगरपालिकेकडून प्रमाणित कार्यपद्धतीसह उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर भर देण्यात येणार. महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी एकत्रित येऊन वायू प्रदूषण आणि वातावरणीय बदलाचे परिणाम ओळखून त्यावर एकसंघपणे कार्यवाही सुरू करणे. त्यात, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, इमारत प्रस्ताव विभाग, रस्ते व वाहतूक विभाग आणि प्रशासकीय विभाग कार्यालय (वॉर्ड) यांचा प्रामुख्याने समावेश असेल.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने २८ मुद्यांची सविस्तर मार्गदर्शक सूचना व प्रकल्पांसाठी पर्यावरण व्यवस्थापन योजनांमध्ये बांधकाम प्रकल्पांद्वारे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी २८ मुद्यांची सविस्तर मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये बांधकामाधीन इमारतीला चोहो बाजूंनी हिरवे कापड / ज्युट / ताडपत्रीने पूर्णपणे झाकून बंदिस्त करणे, बांधकाम प्रकल्पाभोवती किमान २५ फूट उंचीचा पत्रा / धातूचे आच्छादन, सातत्याने पाणी फवारणी, मिस्टिंग संयंत्राचा वापर, राडारोड्याची शास्त्रोक्त साठवण व ने-आण, हवेच्या गुणवत्तेचे निरिक्षण करणारे संवेदक (सेन्सर) लावणे आणि वाहनांची चाके धुण्याची सुविधा यांचा प्रामुख्याने समावेश होणे आवश्यक आहे. याशिवाय, प्रकल्प प्रवर्तक / इमारत विकासक आणि स्थापत्य प्रकल्प (यांत्रिकी व विद्युत) कंत्राटदारांना पर्यावरण व्यवस्थापन योजना (ईएमपी) तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नोव्हेंबर २०२४ पासून आजपर्यंत महानगरपालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून एकूण ८७७ बांधकाम प्रकल्पांची पाहणी. २८ मुद्यांची मार्गदर्शक सूचना, 'ईएमपी'चे पालन होत आहे की नाही, याची सातत्याने तपासणी करण्यात येत आहे. ज्यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या बांधकाम प्रकल्पांना प्रारंभी लेखी सूचना (intimation). नंतर ‘कारणे दाखवा नोटीस’ आणि 'काम थांबवण्याची नोटीस’.देण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे २८६ ठिकाणी 'काम थांबवण्याची नोटीस देण्यात आली असून सदर कार्यवाही सातत्याने सुरु राहणार असल्याचेही आयुक्त म्हणाले.
दीर्घकालीन धोरणे राबवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा विविध शासकीय यंत्रणा आणि भागधारकांशी समन्वय. यामध्ये रस्त्यांची गुणवत्ता सुधारणे, मेट्रोच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक सेवा वाढविणे आणि शाश्वत नागरी वाहतुकीला प्रोत्साहन देणे यासारख्या बाबी अंतर्भूत आहेत. वायू प्रदूषणाच्या मूळ कारणांवर तोडगा काढण्यासाठी 'मुंबई वायू प्रदूषण शमन आराखडा' (एमएपीएमपी) अंमलबजावणी करण्यात येत आहे. आराखड्याचा भाग म्हणून विभागस्तरावर धूळ नियंत्रणासाठी मिस्टिंग संयंत्रे तसेच पाण्याचे स्प्रिंकलर, रस्त्यांच्या सखोल स्वच्छतेसाठी यांत्रिक स्वच्छता यंत्रे, जेटिंग हे पाण्याच्या टँकरसह उपलब्ध करण्यात येत आहेत. रस्त्यावरील धूळ आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक विभागासाठी ४ यानुसार सुमारे १०० धूळ शोषण संयंत्रे खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) सूचनेनुसार, लाकूड / कोळसा आधारित एकूण ३५६ पाव भट्ट्यांना (Bakery) एका वर्षाच्या आत स्वच्छ इंधनावर (Clean Fuel) रूपांतरित केले जाणार आहे. प्रदूषणकारी ७७ बेकरी बंद करण्याच्या दृष्टीने कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या लाकूड-आधारित ४१ स्मशानभूमींना पीएनजी / विद्युत यासारख्या स्वच्छ इंधनावर रूपांतरित करण्यात आले आहे. २२५ स्मशानभूमींना स्वच्छ इंधनावर रूपांतरित करण्याची महानगरपालिकेची योजना आखण्यात आली आहे.
सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक पर्यावरणस्नेही बनविण्याकामी 'बेस्ट' उपक्रमासाठी २ हजार १०० सिंगल डेकर आणि २०० डबल डेकर इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात येत आहेत. पैकी आतापर्यंत २९९ सिंगल डेकर व ५० डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. बांधकामाच्या राडारोड्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याकामी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कोकणीपाडा - दहिसर आणि शीळ फाटा, कल्याण येथे प्रत्येकी ६०० मेट्रिक टन प्रती दिन क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. वायू प्रदूषणासंबंधी तक्रारी नोंदविण्यासाठी फेब्रुवारी, २०२३ पासून 'मुंबई एअर ऍप' उपलब्ध. या ऍपवर आतापर्यंत ४१२ तक्रारी प्राप्त. पैकी ३५० तक्रारींचा निपटारा. तर, २६ तक्रारी या महानगरपालिका कार्यक्षेत्राबाहेरील. अन्य ३६ तक्रारींवर कार्यवाही सुरु आहे. दिनांक ०४ नोव्हेंबर २०२३ ते १० डिसेंबर, २०२४ या कालावधीत उघड्यावर कचरा जाळण्याच्या ३५२ घटनांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. रस्त्यावरील धूळ आटोक्यात आणण्यासाठी ५ हजार लीटर क्षमतेचे ६७ टँकर्स आणि ९ हजार लीटर क्षमतेचे ३९ टँकर्स दररोज वापरात. याद्वारे दिनांक १३ नोव्हेंबर २०२३ ते २० डिसेंबर २०२४ रोजीपर्यंत म्हणजे मागील वर्षभरात सुमारे ५ हजार ८२० किलोमीटर लांबीचे रस्ते पाण्याने धुतले. हवेतील धूळ नियंत्रणासाठी रस्त्यावर मिस्टींग मशीनचा वापर करून त्याद्वारे दिनांक १३ नोव्हेंबर २०२३ ते २० डिसेंबर २०२४ रोजीपर्यंत म्हणजे मागील वर्षभरात सुमारे ३ हजार ३११ किलोमीटर लांबी होईल, इतक्या अंतराच्या फेऱया मारण्यात आल्या. वायू प्रदूषणाचे स्रोत ओळखून उत्सर्जन सूची अद्ययावत करण्यासाठी डिसेंबर २०२४ मध्ये 'ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया' (एआरएआय) यांची नियुक्ती करण्यात आली.
घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी दिनांक २५ डिसेंबर २०२४ पासून घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत विशेष स्वच्छता मोहीम आखण्यात आली. रस्त्यावरील धूळ यंत्राद्वारे हटवणे, राडारोडा (डेब्रीज) च्या वाहतुकीवर विशेष कारवाई, दंडात्मक कारवाई, धूलिकण प्रतिबंधासाठी पाण्याची फवारणी, रस्ते स्वच्छता यांचा समावेश आहे.
दिनांक २५ डिसेंबर पासून आतापर्यंत १,२५२ किमी. लांबीचे ६३४ रस्ते पाण्याने स्वच्छ करण्यात आले असून यासाठी पाण्याचे ४८० टँकर, मिस्टिंग मशीन, फायरेक्स मशीन्स यांचा वापर करण्यात आला. रस्त्याच्या कडेला असणारी ३४२ टन धूळ, माती स्वीपिंग मशीन्सद्वारे संकलित करण्यात आली तर वर्दळीच्या व प्रमुख रस्त्यांवर विभागवार एकूण २४ मिस्टिंग संयंत्रांद्वारे सूक्ष्म धूलिकण नियंत्रित करण्यात आले. १६ मेकॅनिकल स्वीपर व इ-स्वीपरद्वारे रस्त्यावरील धूळ संकलन करण्यात आले. राडारोडा विल्हेवाटीसाठी ४४८ डंपर, इ-स्वीपर, मेकॅनिकल स्वीपर, लिटर पीकर मशीन सारखी विविध संयंत्रे यांचा वापर होत आहे. ३० डिसेंबर २०२४ पर्यंत, रस्त्याचा कडेला साठवलेला ९३९ टन बांधकामाचा राडारोडा उचलण्यात आला. २४ वॉर्डनिहाय भरारी पथकांमार्फत अनधिकृत डेब्रिज वाहतुकीवर प्रतिबंध. रुपये २,१३,००० इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अवैध डेब्रीजवर लक्ष ठेवण्यासाठी विभागांत ३५० पेक्षा अधिक क्लीन अप मार्शल तैनात ठेवण्यात आले आहेत.
सातत्याने वायू गुणवत्ता निर्देशांक २०० पेक्षा अधिक राहिल्यास कठोर पावले उचलली जात आहेत. विविध उपाययोजना राबवूनदेखील वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) जर सातत्याने २०० पेक्षा जास्त जात असेल तर त्या परिसरातील कारणीभूत उद्योग आणि बांधकामे Graded Response Action Plan (GRAP- 4) अंतर्गत बंद करण्यात येतील. प्रदूषणकारी रेडीमिक्स काँक्रिट वाहनांवर कार्यवाही करण्याचे निर्देश सहपोलिस आयुक्त (वाहतूक) यांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळामार्फत रेडीमिक्स काँक्रिट प्रकल्प, स्टोन क्रशर, हॉट मिक्स प्लांट हे बंद केले जातील.
वायू प्रदूषण टाळण्यासाठी शासन आणि प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांमध्ये नागरिकांचे सहकार्य व सहभाग देखील मोलाचा आहे. नागरिकांनी वैयक्तिक स्तरावर पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करणे हितावह आहे. शक्य तितक्या प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, खासगी वाहनांचा वापर कमी करणे, उघड्यावर कचरा जाळू नये, यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. वायू गुणवत्ता निर्देशांक, वाईट ते अतिधोकादायक असलेल्या दिवसांमध्ये धावणे, जॉगिंग व कठोर शारीरिक व्यायाम / श्रम टाळावेत. वायू प्रदूषणाच्या कालावधीत फटाके फोडणे टाळावे. सिगारेट, बिडी आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये. घरामध्ये स्वच्छता करताना झाडू मारणे ऐवजी ओल्या फडक्याचा वापर करावा. बंद घरामध्ये डासांच्या कॉइल, अगरबत्ती जाळणे टाळावे. निरोगी आहार फळे, भाज्या आणि पाणी इत्यादींचे सेवन करावे. श्वसनाचा त्रास, चक्कर येणे, खोकला, छातीत अस्वस्थता किंवा वेदना असल्यास जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अथवा नजीकच्या महानगरपालिका दवाखाना / रुग्णालयात भेट द्यावी. प्रदूषण कालावधीत घराबाहेर जायचे असल्यास डिस्पोजेबल मास्कचा वापर करावा, असे आवाहनही मुंबईतील नागरिकांना आयुक्त गगराणी यांनी यावेळी केले.
0 टिप्पण्या