मराठी माणसांविषयी गरळ ओकणारा अखिलेश शुक्ला या परप्रांतियाने शेजारी राहणाऱ्या देशमुख कुटुंबीयांना गुंड आणून मारहाण केली. महिलांना देखील मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. शेजाऱ्यांना गुंडामार्फत लोखंडी रॉडने मारहाण केल्याची ही घटना बुधवारी संध्याकाळच्या सुमारास घडली होती. मराठी रहिवाशांना मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्ला याच्याविरोधात सोसायटीमधील रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेत शुक्लाला अटक करण्याची मागणी केली. या प्रकरणाचे शुक्रवारी विधानसभेत तीव्र पडसाद उमटल्यानंतर शरण आलेल्या अखिलेश शुक्लाला पोलिसांनी अटक केली. मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला याच्यासह त्यांचे दोन सहकारी सुमित जाधव आणि दर्शन बोराडे यांना पोलिसांनी काल अटक केली. तर आज अखिलेशची पत्नी गीता शुक्लासह विवेक जाधव, पार्थ जाधव या दोघांना ताब्यात घेण्यात आले. मारहाण प्रकरणी एकूण सहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून आणखी चार आरोपींचा शोध सुरु आहे.
अखिलेश शुक्ला हा आयएएस अधिकारी असल्याचे सांगून स्थानिक रहिवाशांना धमकावत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. शुक्लाच्या खासगी गाडीत अंबर रंगाचा दिवा होता. मात्र, त्याचा हाच रुबाब उतरवत कल्याण खडकपाडा पोलिसांनी अखिलेश शुक्लाची खाजगी गाडी जप्त केली. या गाडीमधून अंबर दिवाही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तर कल्याण आरटीओने अखिलेश शुक्ला वापरत असलेल्या गाडीला साडेनऊ हजार रुपयांचा दंड आकारला आहे. कोणताही अधिकार नसताना गाडीवर अंबर दिवा वापरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. कल्याण उपप्रादेशिक परिवहन महामंडळाने अखिलेश शुक्लाची खासगी गाडी ताब्यात घेतली. इन्शुरन्स आणि पीयूसी संपूनही त्याची गाडी चार वर्ष वापरात असल्याचे समोर आले आहे.एमटीडीसी विभागात अधिकारी पदावर काम करणाऱ्या शुक्लाची संपत्ती प्रमाणाहून अधिक असल्याचा आरोप करत त्याची चौकशी केली जावी, अशी मागणीही स्थानिक रहिवाशांनी केली आहे. तसेच देशमुख कुटुंबीयांवरील गुन्हा मागे घेण्याचीही मागणी केली जात आहे. या प्रकाराची दखल हिवाळी अधिवेशनातही घेण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिलेश शुक्लाला तात्काळ निलंबित करण्याची घोषणा केली होती.
सदर प्रकरणी ज्या मराठी व्यक्तीला मारहाण झाली त्या व्यक्तीचं नाव अभिजीत देशमुख असं आहे. अभिजीत देशमुख यांनी आरोपी अखिलेश शुक्लाकडे पिस्तुल होतं, असा धक्कादायक दावा देखील केला आहे. तसेच पोलीस ठाण्यातही लांडगे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली. आम्हाला पहाटे 5 वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून घेतलं पण गुन्हा दाखल करून घेतला नाही, असा आरोपही अभिजीत देशमुख यांनी केला आहे. शुक्ला हा परप्रांतिय ब्राह्मण असल्याची माहिती मिळत आहे.
महाराष्ट्र, मुंबई ही मराठी माणसाची आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने येथे देशभरातील टॅलेंट येथे येत असते आणि ते येथे शांततेने राहतात. उत्तर प्रदेशातून आलेले अनेक मराठी भाषा उत्तम पणे बोलतात, अनेक मराठी सण साजरे करतात. मात्र, अशा काही लोकांमुळे या सामाजिक सलोख्याला गालबोट लागते, एखाद्याला काय खायचे याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. पण अशा प्रकारे रोखण्याचा कोणालाही अधिकार नाही. या आधारावर भेदभाव मान्य नाही. देशातील वैविध्य टिकले पाहिजे, आपली जबाबदारी आहे. क्षेत्रिय अस्मिता म्हणजे मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, त्यावर घाला घातल्यास सहन करणार नाही, त्याच्यावर कारवाई करणार, - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
0 टिप्पण्या