१९४७ पूर्वी आपण स्वातंत्र्याची पहिली लढाई लढलो, आता मिळालेलं स्वातंत्र्य आपल्याला वाचवायचे असेल तर, मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यावाचून आपल्याला गत्यंतर नाही. त्यानंतर, भाजपाला अगदी दोन तृतीयांश जरी मतं मिळाली तरी, आमची हरकत नाही; मात्र, अशी बनावटगिरी आणि भोंदुगिरी आम्ही यापुढे खपवून घेणार नाही. आमच्या जनमताचा अनादर चालवून न घेण्यासाठीच ‘धर्मराज्य पक्षा’ने नो “बॅलेट पेपर... नो इलेक्शन” या घोषणेखाली, स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरु केली असल्याचे उद्गार पक्षाध्यक्ष राजन राजे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना काढले.
आगामी सर्व प्रकारच्या निवडणुका यापुढे ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने जनजागृती मोहीम सुरु करण्यात आली असून, ठाणे शहराच्या विविध भागात ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे राजे म्हणाले. दरम्यान पत्रकार परिषदेनंतर, लगेचच ठाणे रेल्वे स्थानक परिसरात घेण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, मतपत्रिकेद्वारेच निवडणुका घेण्यात याव्यात यासाठी आपले मत नोंदवले. या जनजागृती मोहिमेअंतर्गत, पक्षाच्या वतीने मतपेटी तयार करण्यात आली असून, त्यात नागरिकांकडून आपले मत कोणाला... ईव्हीए की, मतपत्रिकेला? यासाठी प्रतीकात्मक मतदान घेण्यात आले.
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात, भाजपा-महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. जर, त्यांचा विजय इतकाच “न भूतो” व ऐतिहासिक होता; तर, त्यांच्या तथाकथित कार्यकर्त्यांखेरीज, रस्तोरस्ती सर्वसामान्य जनतेचा उत्स्फूर्त आनंदोत्सव का दिसला नाही? असा परखड सवाल उपस्थित करुन, ही तर सर्वसामान्य जनतेच्या मतांची थेट चोरी असून, आपली फसवणूक होतेय आणि हीच फसवणूक भविष्यात पुन्हा होऊ द्यायची नसेल तर, दिलीश्वरांना आणि गुजराथी लॉबीला धडका देण्यासाठी ईव्हीएम मशीन अरबी समुद्रात फेकून देण्याशिवाय गत्यंतर नसल्याचा जोरदार घणाघात राजन राजे यांनी केला.
यासंदर्भात आम्ही विविध राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांना भेटून, ही संकल्पना त्यांच्या गळी उतरवणार आहोत. ज्यांना पटेल ते आमच्यासोबत येतील, न पेक्षा आम्ही “एकला चालो रे” याप्रमाणे, भारतीय स्वातंत्र्याच्या आणि लोकशाहीच्या दृष्टीने जपणूक करण्यासाठी अधिक आक्रमकपणे ‘ईव्हीएम’ला प्राणपणाने विरोध करु. “नो बॅलेट पेपर... नो इलेक्शन” ही आमची घोषणा असून, मतपत्रिकेवरील मतदानाचा हक्क पुन्हा मिळवण्यासाठी, येत्या २६ जानेवारी-२०२५ रोजी, प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त, रात्री ठीक ९ वाजता, फक्त पाच मिनिटांसाठी सर्वांनी आपल्या घरातले अथवा कार्यालयातले लाईट्स बंद ठेवून, ‘ईव्हीएम’वरील मतदानाचा तीव्र निषेध व्यक्त करण्याचे आवाहनदेखील राजन राजे यांनी यावेळी केले.
निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय, देशातील नागरिकांची अत्यंत लाजिरवाणी व क्रूर चेष्टा करतायेत. दिलेली मतं ‘ईव्हीएम’मध्ये दीडत नव्हती म्हणून, ‘व्हीव्हीपॅट’ आणलं; परंतु, मतं मोजली कुठली? तर, ‘ईव्हीएम’मध्ये न दिसणारी. मतपत्रिका मोजणे हे, एव्हरेस्ट शिखर चढण्याएवढे किंवा एखादा भलामोठा डोंगर खोदण्याएवढे अवघड काम आहे का? असा थेट प्रश्नदेखील राजन राजे यांनी यावेळी उपस्थित केला. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हे, राज्यघटनेचे रक्षक असताना, ही न्यायपीठे मात्र, सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालची मांजरं झालीयेत, अशी जोरदार टीकादेखील राजन राजे यांनी केली.
0 टिप्पण्या